कापसावरील लाल्या रोग हा मुळात अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आलेली विकृती आहे. मात्र त्याची तीव्रता रोग व किडींच्या प्रादुर्भावासोबत वाढत जाते. बीटी कपाशीवर अधिक बोंडे टिकून राहतात. त्यामुळे बीटीला जास्त प्रमाणावर अन्नद्रव्याची गरज लागते. मात्र झाडाची बरीचशी शक्ती बोंडे वाढविण्यासाठी खर्ची पडत असल्याने बर्याचदा पिकाच्या शेवटच्या अवस्थेत ती रोग व किडींना लवकर बळी पडते. बिगर बीटी वाणांच्या तुलनेत बीटी कपाशीवर लाल्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
ही आहेत लाल्याची संभाव्य कारणे
- हलक्या व निचरा न होणाऱ्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड आणि काही ठिकाणी आढळून येणारी धुई (धुके).
- शेतात ओलावा नसल्यामुळे जमिनीतील नत्र व इतर अन्नद्रव्ये व्यवस्थितरित्या शोषून घेवू न शकणे.
- नायट्रोजन, मॅग्नेशियम व बोरॉन या अन्नद्रव्याची कमतरता.
- पिकांच्या वाढीच्या अवस्थेत रस शोषण करणार्या किडी विशेषत: तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व कोळी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव
- दहिया रोगाचा आणि पानावरील ठिपके या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव

- लक्षात घ्या सर्वेक्षणातील काही नोंदी
- लाल्यासंदर्भात काही भागात सर्वेक्षण करण्यात आले त्यातून असे आढळून आले की, ज्या शेतकर्यांनी पीक 65 ते 70 दिवसांचे असतानापासून मॅग्नेशियम सल्फेट व दोन टक्के डी. ए. पी. च्या दोन ते तीन फवारण्या घेतल्या आहेत. तेथे या रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळून आला.
- ज्यांनी नत्राची मात्रा व्यवस्थितरित्या विभागून तीन ते चार वेळा दिलेल्या आहेत तेथे देखील तुलनात्त्मकदृष्ट्या प्रादुर्भाव कमी होता.
- काही ठिकाणी रसशोषण करणाऱ्या किडी जसे तुडतुडे पांढरीमाशी, फुलकिडे व कोळी यांचा प्रादुर्भाव तसेच पानावरील ठिपके व दहिया हे रोग देखील लाल्यासोबत आढळल्याने पाने लाल पडून वाळण्याचे व गळण्याचे प्रमाण वाढले.
- ज्या शेतकऱ्यांनी रसशोषण करणार्या किडींचे योग्य नियंत्रण केले आणि पानावरील ठिपक्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक स्ट्रेप्टोसायक्लीनच्या व दहिया रोगासाठी कार्बेडाझीमच्या फवारण्या (60 ते 70 दिवसांपासून दोन ते चार फवारण्या) घेतल्या आहेत तसेच नत्राच्या मात्रा विभागून दिलेल्या आहेत तेथे ही विकृती कमी प्रमाणात आढळून आली आहे.

- लाल्याचे नियंत्रणासाठी अशी घ्या काळजी
- लाल्याच्या नियंत्रणासाठी जमिनीचे पृथ:करण करून योग्य ती खताची मात्रा द्यावी.
- पेरणीपूर्वी जमिनीतून मॅग्नेशियम सल्फेट 10 कि. ग्रॅ. झिंक सल्फेट व बोरॉन प्रत्येकी पाच कि. ग्रॅ. प्रति हेक्टर द्यावे.
- पीक 55 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट (40 ग्रॅम किंवा 10 लिटर पाण्यात) च्या दोन ते तीन फवारण्या. दोन टक्के डीएपी किंवा दोन टक्के युरियाच्या दोन ते तीन फवारण्या.
- पानावरील ठिपक्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोईड 30 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन एक ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे.
- दहिया रोगासाठी कार्बेडाझीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे. खताच्या योग्य व विभागून मात्रा या बाबी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये नत्राची मात्रा तीन ते चार वेळेत विभागून द्यावी.
- रसशोषण करणाऱ्या किडींमध्ये फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल पाच टक्के प्रवाही 20 मिली, पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 15 मिली किंवा असिफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 20 ग्रॅम., आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी असिटामेप्रिड 20 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी दोन ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम 20 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
अशा प्रकारे काळजी घेतल्यास बी. टी. कापाशीचे उत्पादन घेणार्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागणार नाही. त्यामुळे बी. टी. कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी वरील बाबींचा विचार करून कापसाचे व्यवस्थापन करावे.
डॉ. बी. बी. भोसले, डी. डी. पटाईत, व्ही. व्ही. भेदे, कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

- https://www.facebook.com/shetimitramagazine03

- 👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇