केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात भाषण करताना गीय गायीचं व्यावसायिक महत्त्व पटवून दिलं. गीर ही मुळची ब्राझील देशातील गायीची प्रजाती आहे. ही गाय एकाच वेळी 62 लीटर दूध देते. त्यामुळे भारतातही भविष्यात या गायींचा पशूपालनाचा व्यवसाय केला जाणार असल्याची शक्यता गडकरी यांनी वर्तवली. केंद्र सरकारने यासाठी गीर गायींचं वीर्यदेखील भारतात आणल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
गायी, म्हशींच्या पालनपोषणाचा खर्च परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी हल्ली आपली गुरं-ढोरं विकण्याचा निर्णय घेतात. मात्र, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार गायी आणि म्हशींच्या पशूपालनाच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळावा यासाठी नवी योजना राबवणार आहे. नितीन गडकरी यांनी याबाबतच माहिती दिली.
“आमची गाय फक्त दोन लीटर दूध देते. पण जगात याबाबत रिव्ह्यूलेशन झालं आहे. ब्राझीलची गीर गाय एकाचवेळी 62 लीटर दूध देते. त्या गाईचं वीर्य आम्ही भारतात आणलं. त्यानंतर टेस्ट्यूब बेबी संकल्पनेनुसार गायीचं वासरु जन्माला आलं. त्यासाठी प्रयोगशाळाही निर्माण झाल्या आहेत. राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदारही या प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी आले होते”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
“बेटी बचाओ अभियानासारखं आमचं अभियान आहे. आता म्हशीला रेडा होणार नाही. आता म्हशीला म्हैसच होणार आणि गायीच्या पोटी गायच जन्माला येईल”, अशी माहिती त्यांनी दिली.
दोन लीटर दूध देणारी गाय 20 ते 25 लीटर दूध देईल : “आम्ही फक्त यावरच थांबलो नाही. आम्ही दोन लीटर दूध देणाऱ्या गायीचा गर्भ बदलवला. त्यामुळे यापुढे जन्माला येणारी गाय 20 ते 25 लीटर दूध देईल. जेव्हा 25 लीटर दूध मिळेल तेव्हा लोक कशाला गाय विकतील? सर्व गाव समृद्ध आणि संपन्न होतील.”, असा दावा गडकरींनी केला.
“या सर्व योजनेची फिल्म बनवली जाईल. शेतकऱ्यांना ती फिल्म दाखवली जाईल. त्यांना सांगितलं जाईल, तुमची जी गाय दोन लीटर दूध देते तिने 25 लीटर दूध द्यावं, यासाठी तुम्ही हे करा. त्याबाबतचं अभियान सुरु होईल”, असं गडकरी यांनी सांगितलं.
प्रत्येक गावात एका गायीचं ऑपरेशन : केंद्रीय दुग्ध विकास मंत्री गिरीराज यांना मी दहा हजार मेटनरी क्लिनिक होतील, असं सांगितलंय. प्रत्येक गावात एका गायीचं ऑपरेशन होईल. ज्याप्रकारे हृदयाचं ऑपरेशन होतं, अगदी तसंच प्रत्येक गावात एका गाईचं ऑपरेशन होईल. याशिवाय जर्सी गाय देखील लवकरच देशी बनेल”, असंदेखील त्यांनी सांगितलं.
शेणापासून पेंट तयार करणार : “शेणापासून पेंट तयार करायचं, ही नवी योजना आहे. शेणापासून ऑईलपेंट आणि डिस्टम्बर तयार केलं जाणार. विशेष म्हणजे मार्केटमध्ये जितके पेंट आहेत त्यापेक्षा हे पेंट चांगलं आहे. मी स्वत: माझ्या घरी हे पेंट लावलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्हीदेखील हे पेंट वापरा. आता तर या पेंटसाठी वेटिंगलिस्ट सुरु झालीय. विशेष म्हणजे 550 रुपयांचं पेंट अवघं 225 रुपयांत मिळेल”, अशी माहिती त्यांनी दिली.
पेंटसाठी शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार : “प्रत्येक गावात एक 15 लाखांची पेंटची फॅक्ट्री असावी, असं माझं स्वप्न आहे. पेंटसाठी जे शेण असेल त्याला 5 रुपये किलो भाव मिळणार. माझ्या घरी 25 जनावरं आहेत. गाय, बैल, म्हैस आहेत. मला त्यातून कमीतकमी 300 किलो शेण मिळेल. त्यातून मला 1500 रुपये दररोजचे मिळतील. जर फक्त 1500 रुपये शेणाचे मिळतील तर 30 दिवसात तब्बल 45 हजार रुपये फक्त शेणातून मिळतील. ज्याच्याकडे दोन-तीन गाय, म्हैस आहेत त्यांना आठ-दहा हजार रुपये महिन्याचे फक्त शेणापासून मिळतील. मग कोण गरीब राहील? सगळ्यांना रोजी रोटी मिळेल”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.