वेलवर्गीय भाजी जरी निसर्गात: जमिनीवर कोरडवाहू स्थितीत वाढत असली तरी योग्य मांडव उभारणी, खत-पाणी व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण व संजीवकाचा वापर केल्यास आधुनिक तंत्रज्ञानानुसार उत्पादन व दर्जात लक्षणीय वाढ होऊन व्यापारी तत्त्वावर यशस्वी लागवड करता येते.
वेलवर्गीय भाजीपाला पिके पावसाळ्यातही घेता येत असली तरी विशेष करून उन्हाळी हंगामाकरिता जास्त उपयुक्त असून भारतासारख्या उष्ण कटिबंधात राहणार्या लोकांसाठी निसर्गाने दिलेले वरदान आहे. भारतात कोकणासारख्या समुद्र किनार्या लगतच्या प्रदेशात त्यांची वर्षभर लागवड केली जाते. वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने काकडी, कारले, दोडका, घोसाळी, लाल भोपळा (काशीफळ अथवा डांगर), दुधी भोपळा, पडवळ, कलिंगड, खरबूज इत्यादींचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे अजूनही काही पिके दुर्लक्षित अवस्थेत आहेत. उदा. तोंडली, पडवळ, कोहळा, दिलपसंत इत्यादी, सर्व पिके एकाच कुळातील असून ती उष्ण व कोरड्या हवामानात तसेच पाणी टंचाईच्या भागात वाढतात. विशेष म्हणजे ही पिके बांधाच्या कडेला अथवा परसबागेत कुंपणाच्या बाजूने थोड्याशा जागेत लागवड करता येतात. या पिकांचे थोड्याशा जमिनीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते.
टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकांना मिळणार्या दरांमध्ये असलेली अस्थिरता वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नसते. त्याचप्रमाणे लाल भोपळा, कोहळा या पिकांची साठवण क्षमता दोन ते तीन महिने असल्यामुळे लांबवरच्या वाहतुकीसाठी तसेच अधिक काळपर्यंत साठवण्यासाठी या भाज्या उपयुक्त आहेत. तर काकडी, कलिंगडे व खरबूज ही पिके मे महिन्यात पक्व होत असल्यामुळे तसेच त्यांच्यातील थंडाव्याच्या गुणधर्मामुळे ती लोकप्रिय ठरतात. त्यांना बाजारातही भरपूर मागणी असते. या सर्व पिकांत औषधी गुणधर्म असून, मानवाला कडक उष्णतेपासून संरक्षण देऊन शीतलता प्रदान करतात. विशेष करून कारली मधुमेहासाठी, दुधी भोपळा व पोटाच्या विकारासाठी तर लाल भोपळा व खरबूज अ, जीवनसत्त्वासाठी उपयुक्त आहेत. या सार्या पिकांचे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे वेलवाढ, नर व मादीची वेगवेगळी फुले व खोलवर जाणारी मुळे तसेच या सर्व पिकात परागीकरण हे कीटकांच्या सहाय्याने होते. परंतु या पिकांना थंडी व धुके मानवत नसल्यामुळे रब्बी हंगामात त्यांची लागवड होत नाही.
परागीभवनासाठी मधमाशीपालन : वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नर व मादी फुले वेगवेगळी असतात. त्यामुळे फलधारणेसाठी परपरागीभवन होणे गरजेचे असते. या परपरागीभवनासाठी मधमाशा व भुंग्यासारखे कीटक मदत करतात. पिकांमध्ये कीटकनाशकांचा बेजबाबदारपणे वापर केल्यास उपयुक्त किटक नष्ट होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्य तो टाळावा. त्याचप्रमाणे मधमाशांच्या पेट्या पिकाजवळ असल्याच परागीभवन खात्रीलायकरित्या होते. त्यामुळे एकूण उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. परंतु काकडीवर्गीय वनस्पतींच्या परागामध्ये असलेल्या द्रव्यामध्ये कडवट चवीचे गुणधर्म असल्यामुळे मिळणारा मध वापरता येत नाही. तरीही त्यापासून मेणाचे उत्पादन मिळते व मधाचा अन्य ठिकाणी उपयोग करता येतो.
संजीवकाचा वापर : बहुतेक वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये वेलीची शाकीय वाढ म्हणजे पाने व खोडाची वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात होते. परिणामी उत्पादनात फरक पडतो. यासाठी वेलींवर संजीवके फवारल्यास वेलाची उत्पादक वाढ जास्त होते. रोपांची उगवण झाल्यावर जेव्हा त्याला खरी पाने येतात तेव्हा 250 पीपीएम तीव्रतेचे इथ्रेल या संजीवकाची फवारणी केल्यास मादी फुलांची संख्या वाढते. फळधारणा झाल्यानंतर फुलांची व फळांची अकाली गळ होवू नये यासाठी पिकांवर 100 पीपीएम एन.ए.ए. या संजीवकाची फवारणी करावी.
पारंपारिक पद्धतीला पर्याय : पारंपारिक लागवड पद्धतीत बियांची उगवण झाल्यानंतर रोपांची विरळणी करणे किंवा नांग्या भरणे या कामाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचप्रमाणे बियांची उगवण होईपर्यंत तणांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच उगवणीपर्यंत लागणारे पाणी बर्याच मोठ्या क्षेत्रावर पसरून वाया जाते. याला पर्याय म्हणून वेलवर्गीय पिकांची रोपे पिशवीमध्ये तयार करून त्याची पूनर्लागवड करता येते. पिशवीमध्ये 15 ते 20 दिवसांची रोपे शेतामध्ये निर्धारीत अंतरावर लावता येतात. फक्त अशी रोपे लावताना त्यांच्या मुळाला धक्का न पोचवता पिशवी मातीपासून हलकेच दूर करून रोपे मुळाभोवतीच्या मातीसह लावणे आवश्यक असते. रोपवाटिकेत सूक्ष्म द्रव्य खते व संजीवके यांची फवारणी करून घेता येते. त्याचप्रमाणे रोपे तयार करण्याचे व स्थलांतराचे इतरही फायदे मिळतात.
वेलींसाठी ताटी पद्धत : कारले, दोडका, दुभोपळा, घोसाळी, पडवळ या वेलवर्गीय पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी ताटी पद्धतीने लागवड चांगली आहे. या पद्धतीमध्ये फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा व सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाल्याने फळांचा रंग एकसारखा आणि चांगला राहतो. फळांची काढणी, औषध फवारणी ही कामे सुलभ होतात. वेल मांडवापर्यंत पोचवण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे या पिकांत लवकर निघणार्या पालेभाज्यांसारखी आंतरपिके घेता येतात.
हेही वाचा :
उन्हाळी काकडी लागवडीतून मिळवा फायदाच फायदा !
तांबड्या भोपळ्याची अशी करा लागवड
दुधी भोपळा लागवडीतून मिळावा फायदा
आधुनिक लागवड पद्धत : वेलवर्गीय पिकांना आधार देण्यासाठी सहा बाय तीन फुटावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. त्यासाठी रिजरच्या सहाय्याने सहा फूट अंतरावर आडवे पाट काढावेत. सर्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकांना दहा फूट उंचीचे आणि चार इंच जाडीचे डांब शेताच्या वाटेच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंनी दहा गेजच्या तारेने ताण द्यावेत. नंतर प्रत्येक आठ ते दहा फुटावर आठ फूट उंचीचे 1.5 इंच जाडीचे बांबू किंवा 2.5 इंच जाडीच्या लाकडी बल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात. लावलेल्या वेलामध्ये उभे केलेले बांबू आणि कडेने लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर 16 गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून चार फूट उंचीवर व तिसरी तार 12 गेज जाडीची जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलीची दोन फूट उंचीपर्यंतची बगलफूट व तणावे काढून वेल सुतळीच्या सहाय्याने ताटीवर चढवावेत. ही पद्धत कमी खर्चाची आहे.
डॉ. मोहन पाटील, श्याम शिंदे, नारायण चव्हाण, उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा