आडसाली हंगामासाठी फुले 265, को 86032 किंवा को व्हीएसआय 9805 या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. या पद्धतीमुळे उसाची जोमदार वाढ होते.
महत्त्वाची माहिती : असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन
उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची मशागत करून सपाट केल्यानंतर रिजरच्या साह्याने भारी जमिनीत 120 ते 150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100 ते 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. पट्टा पद्धतीसाठी 2.5 – 5 किंवा 3 – 6 फूट अशा जोड पद्धतीने लागवड करावी. पट्टा पद्धतीचा आंतरपीक आणि ठिबक सिंचन संचनासाठी चांगला उपयोग होतो. पॉवर टिलरचा वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर 120 ते 150 सें.मी. (चार ते पाच फुटांपर्यंत) ठेवावे.
बेणे प्रक्रिया : ऊस बेणे लागवडी पूर्वी 100 लिटर पाण्यात डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 265 मिली मिसळून 10 मिनिटांसाठी बुडवून ठेवून बेणे प्रक्रिया करावी. तसेच ॲसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक अनुक्रमे 10 किलो आणि 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या 30 मिनिटे बुडवून नंतर लागण करावी त्यामुळे नत्र खतामध्ये 50 टक्के तर स्फुरद खतामध्ये 25 टक्के बचत होते.
फायद्याची माहिती : जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व
1) लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
2) लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
3) लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास चार फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवावे किंवा पाच फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांतील अंतर 1.5 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील.
महत्त्वाची गोष्ट : कमी का येते ? सुरू उसाचे उत्पादन !
पट्टा पद्धतीने ऊस लागवड (2.5 फूट x 5 फूट किंवा 3 फूट x 6 फूट) : जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
आडसाली उसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 50 ते 60 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडावीत. स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा 6ः1 या प्रमाणात वापर करावा.
वाचनीय लेख : सुरू ऊसातील आंतरपिके
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनीज सल्फेट आणि पाच किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रतिहेक्टरी)
1.लागणीच्या वेळी: नत्र (युरिया) 40 (88) + स्फुरद (सिं.सु.फॉ.) 85 (530) + पालाश (म्यु.ऑ.पो.) 85 (140)
2. लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी: नत्र (युरिया)160 (350) + स्फुरद (सिं.सु.फॉ.) 85 (530) + पालाश (म्यु.ऑ.पो.) 85 (140)
3. लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी: नत्र (युरिया) 40 (88)+ स्फुरद (सिं.सु.फॉ.) 85 (530) + पालाश (म्यु.ऑ.पो.) 85 (140)
4. बांधणीच्या वेळी: नत्र (युरिया)160 (350) + स्फुरद (सिं.सु.फॉ.) 85 (350) + पालाश (म्यु.ऑ.पो.) 85 (140)
5. को 86032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खतमात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रतिहेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची 25 टक्के जादा मात्रा द्यावी.
आंतरपिके : या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला ही आंतरपिके घेता येतात. ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.
आंतरमशागत व तणनियंत्रण : उसाच्या उगवणीनंतर शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करून आवश्यकतेनुसार तणांचे नियंत्रण करावे. लागणीनंतर तीन महिन्यांनी बाळबांधणी करावी. पीक 4.5 ते 5 महिन्यांचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर कुळव चालवून आंतरमशागत करावी. रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.
डॉ. दादासाहेब खोगरे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता. कडेगाव जि.सांगली. (मो. 9370006598)
नक्की वाचा : असे करा आडसाली ऊस लागवडीचे नियोजन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1