ज्वारी पिकांवर विविध प्रकारचे रोग पडतात. त्यामध्ये काणी केवडा, अर्गट व तांबेरा इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात. या रोगांमुळे ज्वारी पिकांमध्ये 30 ते 50 टक्के नुकसान होते. योग्यवेळी आणि योग्यपद्धतीने नियंत्रण केल्यास नक्कीच या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविता येते. ज्वारी पिकांवर विविध प्रकारचे रोग पडतात. त्यामध्ये काणी केवडा, अर्गट व तांबेरा इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात. या रोगांमुळे ज्वारी पिकांमध्ये 30 ते 50 टक्के नुकसान होते. म्हणून या रोगावर नियंत्रण करणे गरजेचे असते.
काणी : ज्वारी पिकांमध्ये काणी या रोगाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. दाणे काणी, मोकळी काणी, झिपरी काणी किंवा केसाळ काणी, लांबट काणी,
दाणे काणी : हा रोग स्पोरिस्पोरिअम सोरघाय नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाला दाणे काणी, आखुड काणी इत्यादी नावाने ओळखले जाते.
लक्षणे : या रोगाचा प्रादुर्भाव कणसातील दाण्यांवर झालेला दिसून येतो. रोगग्रस्त दाणे काणीच्या बुरशीने भरलेले असतात. हळूहळू सर्व दाण्यांमध्ये या रोगाचा प्रसार होऊन संपूर्ण कणसावरती या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळून येतो. दाण्यांमधील बुरशीही पांढरी ते पिवळसर तांबट रंगाची असते. या रोगांमुळे उत्पन्नामध्ये साधारणत: 25 टक्के इतकी घट होते.
मोकळी काणी : हा रोग स्पोरिस्पोरिअम क्रृएन्टम या नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : रोगग्रस्त झाडे लवकरच फुलोरा अवस्थेत येतात. व त्यांना जास्त प्रमाणात फुटवे फुटलेले असतात. फुलोर्यात आलेल्या कणसामध्ये या बुरशीची वाढ होऊन ते कणीस झाडू सारखे दिसते. कणसामध्ये बुरशीची 3 ते 18 मिमी इतकी मोकळी वाढ झालेली दिसून येते. रोगग्रस्त कणसे काळसर रंगाची दिसतात. व त्यांची वेडी-वाकडी वाढ झालेली दिसून येते.
झिपरी काणी : हा रोग स्पोरिस्पोरिअम रिलियानम नावाच्या बुरशीमुळे होतो. झिपरी काणी या रोगास केसाळ काणी असेही म्हणतात.
लक्षणे : रोगग्रस्त झाडावरील कणीस संपूर्ण बुरशीने भरले जाते. सुरवातीला कणसामधील बुरशीची पांढरे व नंतर काळसर वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर ही बुरशी तपकिरी व गडद काळ्या रंगाची दिसून येते. रोगग्रस्त झाडावरील कणीस साधूच्या वाढलेल्या जटासारखी दिसून येते. म्हणून या रोगास झिपरी किंवा केसाळ काणी असे म्हणतात.
लांबट काणी : हा रोग टॉलिपोस्पोरिअम इव्हरेनबर्जी नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : या रोगाचा प्रसार वार्यामार्फत किंवा बीयांणकामार्फत होत असतो. हवेमार्फत किंवा बीयाणांमार्फत ही बुरशी झाडांच्या कणसामध्ये प्रवेश करते. व नंतर या बुरशीची काळी पावडर हळूहळू संपूर्ण दाण्यांवर व कणसांवर पसरते.
या बुरशीची वाढ लांबट व लंबवर्तुळासारखी असते. तसेच रोगग्रस्त दाणे हे या बुरशीने आच्छादलेले असतात. सुरवातीस ही बुरशी पिवळसर रंगाची व नंतर काळपट रंगाची दिसते. लांबट काणीच्या बुरशीची वाढ ही दाणे काणी या बुरशीपेक्षा जास्त झालेली आढळून येते. व परिणामी उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते.
काणी रोगाचे एकत्रित नियंत्रण : उन्हाळ्यांमध्ये जमिनीची खोल नांगरट करून घ्यावे. पिकांची फेरपालट करावी. पी. जे. 7 के, पी, जे, 23 के, नांन्दीयाल, फेटेरिता, मिलो इत्यादी रोगप्रतिकारक वाणांची लागवड करावी. पेरणी पूर्व बियाण्यास तीन ते चार ग्राम थायरम किंवा सल्फर (गंधक) इत्यादी बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी.
पिकांमधील व बांधावरील तणांचा नाश करावा. रोगग्रस्त झाडे ओळखून त्यावरील कणसाला पोलिथीन किंवा कागदाच्या पिशवीचे बांधून रोगग्रस्त झाडे अलगद उपटून वेगळी करावे.
केवडा (डाऊनी मिल्डयू) : केवडा हा रोग पेरेनोस्न्लेरोस्पोरा सोरबाय, नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : सुरवातीच्या काळात पानावरील पृष्ठभाग पिवळा पडून पाने टोकाकडे झुकलेली दिसतात. रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटते. केवडा रोगाची बुरशी पानाच्या खालील बाजूने वाढते. व पाने पिवळी पडतात. पानावरती पांढर्या रंगाच्या पट्ट्या आढळून येतात. व नंतर पानांवर सुरकुत्या पडून पाने वाळून जातात. या रोगामुळे कणसाची चांगली वाढ होत नाही. व परिणामी उत्पादानामध्ये घट होते.
नियंत्रण : केवडा रोग येऊ नये म्हणून, पिकांची फेरपालट करणे आवश्यक असते. पेरणीसाठी स्वच्छ व चांगले प्रतीचे बियाणे निवडावे. पेरणीपूर्व मेटालॅक्झील या बुरशीनाशकाची पावडर पाच ते सहा किलो ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडे शोधून त्यावरील रोगग्रस्त पाने कापून नष्ट करावी. शेतामधील व बांधावरील तणांचा नाश करावा. रिडोलिम एम. झेड या बुरशी नाशकाची सहा ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.
अरगट : हा रोग स्फॅसेलिया सोरघाय या नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : अरगट हा रोग ज्वारीच्या फुलोर्यावर दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यानंतर फुलोर्यामधून मधासारख्या चिकट पदार्थाचे स्त्रवन होते. या मधासारख्या चिकट पदार्थामुळे असंख्य किटक व मुंग्यांचे आकर्षण फुलोर्याकडे होते. व यांच्यामार्फत अरगट या रोगाचा प्रसार होतो. फुलोरा किंवा कणसामधून मधासारख्या चिकट पदार्थाचे स्त्रवन होऊन कणीस काळे पडते. व दाण्यामध्ये बुरशी प्रवेश करून कणसामध्ये दाण्याऐवजी बुरशीची वाढ झालेली दिसून येते. तसेच ज्वारीच्या ताटाखाली म्हणजे जमिनीवर खोडाच्या भोवती चिकट पदार्थाचे ठिपके पडलेले दिसून येतात.
नियंत्रण : अरगट रोगाचे नियंत्रण करण्यासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणामध्ये ज्वारीचे बी पेरणीपूर्वी बुडवून बीजप्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडे वेळीच उपटून अलगद नष्ट करावी. खतांचा समतोल वापर करावा. पिकांची फेरपालट करावी. ज्वारीची पेरणी लवकर करावी. रोगाची लागण झाल्यास झायरम किंवा कॅम्टन या बुरशी नाशकाची 0.2 टक्के या प्रमाणात फवारणी करावी.
तांबेरा : (रस्ट) : हा रोग पक्सीनीया पुरपुरिया या नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : पाण्याच्या खालच्या बाजूस गोल, तांबट, तांबूस, जांभळट, पुरळ दिसून येतात. पानांच्या शिरांला हे तांबूस रंगाची समांतर असलेले आढळून येतात. आपण या पानाच्या खालच्या बाजूस हात फिरवला असता आपल्या हाताला हे पुरळ चिकटतात. असे पुरळ खोडावर व कणसावर दिसून येतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळतात.
नियंत्रण : सी. एस. एच.-5 एस. पी. व्ही-13, एस. पी. व्ही-81 इलसी रोगप्रतिकारक वाणाची लागवड करावी. रोगग्रस्त झाडे व पाने नष्ट करावीत. झिंक सल्फेटची 0.5 टक्के याप्रमाणात फवारणी करावी. सल्फर या बुरशीनाशकाची 25 किलो पावडर प्रति हेक्टर या प्रमाणात धुरळणी करावी.
प्रा. कानिफनाथ बुरगुटे कृषी महाविद्यालय, आळणी, उस्मानाबाद. मोबा. 8390622799