भेंडी हे आपल्या भागातील महत्त्वाचे भाजीपाला पीक असून, या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. भेंडी या पिकाचे सुमारे २० प्रकारचे किटक व अकीटकवर्गीय शत्रुपासून नुकसान होते. त्यामुळे उत्पादनात सुमारे ६० टक्के एवढी घट येते.
भेंडी या पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरीमाशी, फुलकिडे, ठिपक्याची बोंडअळी व घाटेअळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. भेंडीची लागवड आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने केल्यास आपल्याला त्याचे भरपूर उत्पन्न घेता येते. भेंडीचे उत्पन्न कमी येण्याच्या अनेक कारणापैकी त्यावर होणार्या किडींचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे भेंडीपिकावर एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते.
तुडतुडे : ही भेंडी वरील प्रमुख कीड आहे. या किडींची अंडी निमुळत्या आकाराची लांबट आणि फिक्कट पिवळसर रंगाची असतात. पिल्ले पांढुरके फिक्कट हिरवट असून तिरपे चालतात. पूर्ण वाढ झालेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व सुमारे दोन मिमी लांबीचे फिक्कट हिरवट रंगाचे, समोरील पंखावरील वरच्या भागात एक काळा ठिपका असतो. हिवाळ्यात पिढीचे प्रौढ काही अंशी साधारण फिक्कट लालसर दिसतात. या किडीचे पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषण करतात. रस शोषण करताना त्यांच्या तोंडाद्वारे विषारी लाळ झाडाच्या पेशीत सोडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात. जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर पाने विटकरी लाल रंगाचे कडक आणि चुरडल्यासारखे दिसतात. ढगाळ वातावरणामध्ये या किडींचा चा प्रादुर्भाव होत असतो आणि जर जोराचा पाऊस असेल तर त्यांच्या संख्येत घट होते.
शेंडे व फळे पोखरणारी अळी : ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्णतामान या किडीला पोषक असते. उन्हाळ्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. सुरूवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्यामध्ये पोखरते आणि आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मूलल होतो, खालच्या दिशेने लोंबन वाळतो. झाडाला कळ्या येण्यास सुरूवात झाल्यानंतर हीच अळी पुढे कळ्या, फुले व फळे ह्यामध्ये शिरून त्यातील पेशी खाते. ते एका कळीवरून दुसर्या कळीवर व एका फळावरून दुसर्या फळावर जातात आणि त्यांचे नुकसान करतात. एक अळी अनेक कळी, फुले व फळांचे नुकसान करू शकते. पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडते, तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही आणि अशी फळे विकण्याच्या दृष्टीने उपयोगी नसतात.
तंबाखुवरील पाने खाणारी अळी : ही अळी तंबाखूवरील पाने खाणारी अळी या नावाने जरी ओळखली जात असली तरी बहुवनस्पतीबक्षक किड आहे. ह्या किडीला पतंग मध्यम आकाराचा व बळकट बांध्याचा असतो. साधारणत: त्याची लांबी १८ ते २२ मिमी असून पंखाचा विस्तार ३५ ते ४० मिमी असतो. पुढील पंख फिक्कट करड्या किंवा गडद पिंगट रंगाचे असून त्यावर नागमोडी पांढर्या रेषा असतात. मागील पंख पांढरे असून मान व पाठ फिक्कट पिंगट रंगाची असून शरीर गुळगुळीत असते. शरिरावर काळ्या खुणा असतात व छातीवर पट्टा असतो. पूर्ण वाढ झालेली अळी ४० मिमी लांब असते. ही अळी दिवसा झाडाखाली येऊन मातीत लपून राहते व रात्रीच्या वेळेस पिकावर आक्रमण करते. प्रादुर्भाव जास्त असल्यास संपूर्ण झाड पर्णहीन होऊ शकते. या किडीची मादी कोवळ्या पानाच्या खालच्या भागावर तसेच झाडाच्या कोवळ्या भागावर पुंजक्याने अंडी घालते. प्रत्येक पुंजक्यात अनेक अंडी असून प्रत्येक पुंजका तपकिरी केसाने झाकलेला असतो. एक मादी जवळपास २०० ते ४०० अंडी देते. ही अंडी वर्तुळकार असून पांढर्या रंगाची असतात चार ते पाच दिवसानंतर अंड्यातून अतिशय लहान काळपट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. त्या रात्री लागवड केलेल्या भेंडीच्या शेतातील झाडांची पाने खातात.
मावा : ही कीड भेंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रस शोषण करते. याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते व झाडाच्या अन्न तयार करण्याच्या विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.
पांढरी माशी : ही कीड विविध भाजीपाला पिकावर व इतर पिकावर आढळून येते. या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात प्रौढ किटकांच्या शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. ह्या द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा येते. परिणामी झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर परिणाम होतो. याशिवाय ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.
फुलकिडे : फुलकिडे हे भेंडी पिकावरील प्रमुख किड आहे. या किडीचे प्रौढ लहान असून लांबोळ्या आकाराचे असतात. हे कीड उघड्या डोळ्यांनी इकडे तिकडे फिरतांना सहज दिसून येतात. या किडचा लपून राहण्याचा स्वभाव असल्यामुळे त्याचा प्रादुर्भावाचे लक्षण झाडावर दिसल्यानंतर त्या किडीचे अस्तीत्व जाणवते. या किडीचे पिल्ले आणि प्रौढ आपल्या तोंडाने झाडाच्या कोवळ्या पेशी विशेषत: फुले खरचटतात व त्यातून येणारे द्रव शोषूण घेतात. परिणामी फुले वाळून जावून ते गळून पडतात. त्यामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनात लक्षणीय घट येते.
असे करा भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील. पिकाची फेरपालट करावी. किडग्रस्त भेंडी तोडून नष्ट करावी. ठिपक्याची अळी व घाटेअळी यांचे कामगंध सापळे शेतामध्ये प्रति हेक्टरी पाच या प्रमाणात लावावे. पांढर्या माशीसाठी पिवळे किंवा चिकट दहा सोपळे लावावेत. किटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी किटक जसे ढालकिडा, क्रोयसोपा, सिरपिड माशी, कोळी भक्षक, ढेकूण इत्यादी व परोपजीवी किटक जसे ट्रायकोग्रामा, रोगास बॅक्रॅान इत्यादीनचे संरक्षण होईल. त्यामुळे हानीकारक किडीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होईल. ठिपक्याची अळी व घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५० हजार प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावेत. पांढरी माशी व लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या दोन अळ्या प्रति झाड सोडावेत. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएनपीव्ही २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा. ठिपक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकाचा वापर फक्त किडीची आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानंतरच करावा. ठिपक्याची अळी व घाटेअळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४८ टक्के चार मिली फोझॅलोन ३५ टक्के ३० मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी तीन मिली दहा लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
बी. बी. गायकवाड किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर ! #शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitramagazine चे फेसबुक पेज लाईक करा !