कडधान्य लागवडीत मटकी हे महत्त्वाचे पीक आहे. कमी कालावधीत येणारे हे पीक असून, उत्तम नियोजन केल्यास आणि अधुनिक तंत्राचा वापर केल्यास याचे चांगले उत्पादन घेता येते. जसजसा पेरणीस उशीर होत जाईल त्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट होत जाते. त्यामुळे मटकीची पेरणी वेळेवर करणे महत्त्वाचे असते.
महाराष्ट्रात मटकी हे पीक कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आरोग्यदृष्या मटकीचे महत्त्व जास्त असल्याने मटकीचे आहारातील महत्त्व वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मटकी हे महाराष्ट्रात सर्वत्र घेतले जाणारे पीक आहे. सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर व औरंगाबाद या जिल्ह्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
जमीन व हवामान : या पिकास उष्ण हवामान मानवते. हलकी व मध्यम प्रकारची जमीन या पिकास योग्य असते. आम्लयुक्त जमिनीत व अती पाऊसमान असणार्या भागात हे पीक चांगले येत नाही.
पेरणी : खरीप हंगामात पावसाळा सुरू होताच या पिकाची पेरणी करावी. अवर्षणग्रस्त भागामध्ये पाऊस पडण्यापूर्वी जूनच्या दुसर्या पंधरवाड्यात पेरणी केल्यास त्यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. जूनच्या तिसर्या आठवड्यात केलेल्या पेरणीमुळे चार क्विंटल तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या पेरणीपासून तीन क्विंटल उत्पादन मिळते. या पिकाची पेरणी दुचाडी पाभरीच्या सहाय्याने ३० सें.मी. अंतरावर करावी. यासाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. खते या पिकासाठी १० ते १५ किलो नत्र व २० ते ३० किलो स्फुरद प्रति हेक्टर पेरणीच्या वेळीच द्यावे.
खत व्यवस्थापन : मटकी या पिकाला हेक्टरी २० ते २५ किलो नत्र व ४० ते ५० किलो स्फुरदाची मात्र दिल्यास उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत : पीक एक महिन्याचे होण्याच्या आत एक कोळपणी करावी व तणांचे नियंत्रण करावे.
सुधारित वाण : पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. यामध्ये नंबर ८८ हा वाण नागपूर येथे निवड पद्धतीने १९५६ मध्ये प्रसारित करण्यात आला. हा वाण १२० दिवसात तयार होतो. संपूर्ण विदर्भासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. अलीकडेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सोलापूर केंद्रावरून १९८९ साली पश्चिम महाराष्ट्रासाठी एम.बी.एस.२७ हा १३० ते १३५ दिवसात तयार होणारा वाण प्रसारित करण्यात आला. त्यापासून हेक्टरी ६ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. तसेच नं. ८८ (महाराष्ट्र), बाळेश्वर-१२ (गुजरात), ज्वाला (राजस्थान), जडिया (राजस्थान) इत्यादी वाण आहेत.
आंतरपीक : मध्यम ते हलक्या जमिनीत मटकीचे सलग पीक घेण्यापेक्षा २:१ या प्रमाणात मटकीचे बाजरीत आंतरपीक घेतल्यास बाजरीच्या उत्पादनात विशेष घट न येता मटकीपासून हेक्टरी चार क्विंटल उत्पादन मिळते. अशा जमिनीत बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्यापेक्षा मटकी घेणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर असल्याचे राहुरी येथील प्रयोगावरून दिसून आले.
पीकसंरक्षण : या पिकास रोपावस्थेत व वाढीच्या कालावधीत मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या पाना-फुलातील रस शेषणार्या किडींपासून नुकसान पोहोचते, तसेच पाने खाणार्या अळ्या, केसाळ अळी, पाने गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, पांढरी माशी, वाळवी आणि भुंग्यापासून नुकसान पोहोचते. पीक फुलोर्यात असताना व शेंगा लागणीचे कालवधीत शेंगा पोखरणार्या अळींपासून नुकसान होते.
रस शोषणार्या किडींचे नियंत्रणासाठी ५० टक्के प्रवाही मॅलेथिऑन ५०० मिली अथवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ५५० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारणी करावी. केसाळ अळ्या अथवा पाने गुंडाळणार्या अळ्यांचे नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी अथवा बी.एच.सी. १० टक्के भुकटी अथवा मिथील पॅराथिऑन दोन टक्के भुकटी अथवा एन्डोसल्फान ४ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो प्रमाणे धुरळावी. शेंगा पोखरणार्या अळींचे बंदोबस्तासाठी ३५ टक्के प्रवाही एन्डोसल्फान एक लिटर अथवा ३६ टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५५० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून शेंगा लागणीच्या वेळेस पहिली फवारणी करावी.
केवाडा : मटकी पिकावर मुख्यत्वे केवडा व भुरी हे रोग आढळून येतात. केवडा हा रोग अतिसुक्ष्म विषाणूंपासून होतो. पानावर हळदीसारखे गर्द पिवळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. पानांचा आकार लहान राहतो. रोग मोठ्या प्रमाणावर आल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते.
भुरी : भुरी हा बुरशीजन्य रोग असून कधी कधी मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. रोगग्रस्त झाडांच्या पानांवर वरील बाजूस पांढरे चट्टे दिसतात. काही दिवसांनी या चट्ट्यांचा आकार वाढून पाने पिवळी पडून गळून जातात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारी गंधकाची भुकटी हेक्टरी १२५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
काढणी : पीक काढणीस तयार होताच उपटून काढावे किंवा जमिनीलगत विळ्याने कापून खळ्यावर आणून उन्हात चांगले वाळवावे व नंतर काठीने झोडपून अगर बैलांच्या सहाय्याने तुडवून मळणी करावी. ऊफणणीनंतर भुसा अलग करावा. धान्यास एक ते दोन दिवस चांगले ऊन देऊन नंतर साठवण करावी. चांगले पीक आल्यास सात ते आठ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
बी. बी. जोशी, डॉ. ए. बी. रोडगे, अखिल भारतीय शुष्क कडधान्य संशोधन प्रकल्प अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा