कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.
अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणार्या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस – पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.
लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.
कलिंगडाचे महत्त्व : उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे. कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण : पाणी -९३%, शर्करा पदार्थ – ३.३%, प्रथिने – ०.२%, तंतुमय पदार्थ – ०.२%, खनिजे – ०.३%, चुना – ०.०१%, स्फुरद – ०.०९%, लोह – ०.००८%, जीवनसत्त्व ‘क’ – ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व ‘ब’ -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व ‘ई’ – १ मि. ग्रॅ. असते.
कालिंगडाच्या जाती : कालिंगडाच्या अधिक उत्पादन देणार्या आणि संकरीत अश्या अनेक जाती आहेत. त्यातली शुगर-बेबी ही २-२” किलो वजनाची फळे देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक बियांची ११-१३ % साखर उतारा असणारी ही जात विक्री योग्य आहे.फक्त ७५ ते ८० दिवसात ही फळे तयार होतात. अरका माणिक ही लंबवर्तुळाकार पांढरट पट्टे असणारी ५ ते ६ किलो वजनाची फळे, गर्द लाल, रवेदार आणि १२ ते १५ % साखर असणारी ही जात वाहतुकीस आणि साठवणूकिस योग्य आहे. ही १०० दिवसांत तयार होते. असाही यामोटो ही जपानी जात ४ ते ७ किलो वजनाची फळे देणारी, ९० दिवसांत तयार होणारी, गर गोड, बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.
या सुधारित जातींप्रमाणेच काही खाजगी कंपनीच्या संकरीत जाती भरपूर आहेत. त्या जातींचा अनुभव लक्ष्यात घेऊन लागवड करावी. महिको, नामधारी, अमर सीड्स अश्या खाजगी कंपन्यांच्या या अनेक जाती उपलब्ध आहेत. या संकरीत जातींची फळे सरासरी ४ ते ८ किलो वजनाची असून एकरी ३० ते ४० टन उत्पादनक्षम असतात. अर्का ज्योती ही संकरीत जात भारतीय फळबाग संशोधन संस्था, बंगलोर येथे विकसित केली आहे. या जातीची फळे साधारणत: ६ ते ८ किलो वजनाची असून, आकाराने गोल असतात. फळावर हिरवे गर्द पट्टे असतात. अर्का माणिक या जातीची फळे मोठी, आकाराने गोल, हिरव्या रंगाची असतात.
संकरित कलिंगड जाती :
सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.
ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य. नोन्यु कंपनीचे किरण कलिंगड लांबट लहान ते मध्यम आकाराचे असल्याने घेणार्यालाही परवडत असल्याने याला वजनावर ८ ते १५ रू. किलो भाव मिळत असल्याने शेतकर्यांच्या पसंतीस उतरले आहे. याचा गर लालभडक, मधूर गोड चवीचा असल्याने याला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. नामधारी कंपनीच्या २९५, २९६, ४५० या जातींची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी नवीन व चांगल्या वाणांनी नेहमी मागणी करतात.
पूर्वमशागत : जमीन पूर्वमशागत करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि २ किंवा २” मीटर अंतरावर ट्रॅक्टरने सरळ सर्या सोडाव्यात आणि सरीच्या एका बाजूस पोटात ६० ते ९० सें. मी. अंतरावर ओंजळभर उत्तम कुजलेले शेणखत आणि १० ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि थोडेसे फोरेट मिसळून या मिश्रणाचे ढीग टाकावेत. याच वेळी मूठभर १९:१९:१९ हे मिश्र खत ही त्यात टाकावे. या टाकलेल्या ढीगाच्या ठिकाणी कुदळीने कुदळून छोटासा आळे सारखा आकार द्यावा. आणि मग या आळयात २” ग्रॅम कार्बेंन्डाझिम किंवा १ ग्रॅम बावीस्टीनची प्रक्रिया केलेल्या कलिंगडाच्या ३ बिया विखरलेल्या स्थितीत टोकाव्यात आणि हलकेसे पाणी द्यावे. ठिबक असल्यास अति उत्तम. दोन तीन पाण्यावर बिया उगवल्यानंतर कमजोर रोपे काढून जोमदार अशी १-२ रोपे ठेवावीत. रूट ट्रेनर मध्ये वाढवलेल्या रोपद्वारे लागवड केल्यास अति उत्तम. लागणीच्या वेळी खत दिल्यानंतर १५-२० ग्राम सुफला द्यावा.
लागवडीच्या पद्धती :
सरी किंवा आळे पद्धतीने लागवड : लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून प्रती हेक्टरी १५-२० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून दोन वखर पाळया द्याव्यात. लागवड साधारणत: सरी पद्धतीने, आळे पद्धतीने किंवा गादी वाफा पद्धतीने करू शकतो. सरी पद्धतीने लागवड केल्यास १८०-२०० सें.मी x ५०—६० सें.मी अंतरावर लागवड करावी. सरीच्या दोन्ही बाजूस ५०—६० सें.मी अंतरावर लहान आळी करून एका आळ्यामध्ये सरळ वाणाच्या ४ किंवा संकरीत जातीच्या २ बिया टोकाव्यात. प्रती हेक्टरी साधारणत: सरळ वाणाचे २.५-३ किलो, तर संकरीत जातींचे ७५०-८७५ ग्रॅम बी पुरेसे होते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिया कार्बेंन्डाझिम १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणात ३ तास भिजून घ्याव्यात. बियांचे आवरण टणक असल्याने उगवण क्षमता वाढवण्यासाठी त्याच बिया नंतर ओलसर पोत्यात गुंडाळीत १२ तास ठेऊन नंतर लागवडीसाठी वापरतात.
गादीवाफे पद्धतीने लागवड : गादी वाफयावर लागवडीसाठी मशागतिनंतर ६० सेंमी रुंद व १५-२० सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमद्धे १८०-२०० सेंमी अंतर ठेवावे. गादीवाफा तयार करत असताना साधारणत: युरिया १०९ किलो (नत्र ५०किलो ) सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो ( स्फुरद ५०किलो) आणि मुरेट ऑफ पोट्याश ८३ किलो ( पालश ५०किलो) रासायनिक खतांची मात्रा प्रती हेक्टरी पायाभूत स्वरुपात द्यावी. गादीवाफ्यावर मधोमध ठिबकची लॅटरल पसरावी. त्यानंतर १२० सेंमी (४ फुट ) रुंदीचा २५-३० मायक्रान जाडीचा मल्चिंग पेपर पसरावा. मल्चिंग पेपर लावताना तो ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग पेपरला रोपे लागवडीपूर्वी किमान एक दिवस आधी बाजूस ५०-६० सेंमी अंतरावर छिद्रे करून घ्यावीत. त्यामुळे आत तयार झालेली उष्ण हवा निघून जाईल. रोपे तयार करून किंवा थेट गादीवाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करू शकतो.
टोकन पद्धतीऐवजी रोपवाटिका : टोकण पद्धतीमध्ये उगवण क्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा: बी टोकावे लागते.पर्यायाने खर्चात वाढ होते.शक्यतो रोपे कोकोपीट ट्रे मध्ये तयार करून लागवड करावी. रोपे तयार होण्यासाठी २०-२५ दिवसांचा कालावधी लागतो. लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : प्रती हेक्टरी अर्धे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश रासायनिक खतांची मात्रा लागवडीच्या अगोदर वाफे बनवताना पायाभूत स्वरुपात द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा ( ५० किलो नत्र / युरिया १०९ किलो ) लागवडीनंतर १, १.५ आणि २ महिन्याने प्रती हेक्टरी तीन समान हप्त्यामध्ये विभागून द्यावी. उत्पादन वाढीसाठी विद्रव्य खते फवारणीद्वारे देता येतात. त्याचे नियोजन साधारपणे खालील प्रमाणे करावे.
पीक १५ दिवसाचे झाले असतं १९:१९:१९ ची २-३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. पहिल्या फवारनिनंतर ३० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये ( ग्रेड नं. २- फेरस २.५ %, झिंक ३%, कॉपर १%, बोरॉन 0.5% ) 2.5-3 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत असताना ००:५२:३४ ची ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करू शकतो. फुलोरा अवस्थेत ००:५२:३४ सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉन ची उपलब्धता होऊ शकते. बोरॉन च्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते. फळे पोसत असताना १३:००:४५ या विद्रव्य खताची ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
फूल व फळ व्यवस्थापन : पाण्याची अनियमित वेळ व मात्रा यामुळे फूल व फळाची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. फळ लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा टन बसू देऊ नये.पाणी दुपारच्या वेळी देऊ नये.
रोग व्यवस्थापन : कलिंगडावर काला करपा, पानावरचे ठिबके, भुरी, केवडा हे रोग येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम, १० ग्रॅम कार्बेंन्डाझिम ३० लिटर पाण्यातून फवारावे. फुलकिडे, मावा, पांढरी माशी, नागअळी फळमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी १० मी ली कार्बोसल्फान १० लिटर पाण्यातून फवारावे. ४% निंबोळी अर्क फवारावा. कामगंध सापळे वापरावे.
फळाच्या देठजवळचे केस वाळणे, डबडब असा आवाज, रंग बदलणे, करकर असा आवाज, रंग बदलणे ही फळ तयार झाल्याची लक्षणे असतात. जातीनिहाय १८-२५ टनपर्यंत उत्पादन मिळते. दर चांगलाच मिळतो.
प्रा. व्ही. डी. वाघमारे वनस्पती शास्त्र विभाग मो. ९९२१००८२९१
प्रा. एस. एम. राठोड उद्यान विद्या विभाग मो. ९४०३१९९९३७
रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय, नाव्हा, ता. जि. जालना ४३१२०३