तांबड्या भोपळ्यासाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन निवडावी. रेताड जमिनीत हे पीक लवकर येते. खारपड व चोपण जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू 6.0 ते 7.0 च्या दरम्यान असावा. उन्हाळी हंगामात हलक्या जमिनीत पाण्याचा ताण असल्यास फळे तडकण्याची शक्यता असते.
उष्ण व दमट हवामानात हे पीक चांगले येते. या पिकासाठी सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस आवश्यक असते. 18 अंश सेल्सिअस पेक्षा कमी व 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान गेल्यास पिकाच्या वाढीवर आणि प्रजनन क्रियेवर वाईट परिणाम होतो. भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकासाठी पोषक ठरतो. कडक थंडीमध्ये तांबड्या भोपळ्यास फळधारणा होत नाही. तर जास्त पाऊस आणि दमट हवामानामुळे केवडा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो.
लागवडीचा हंगाम : उन्हाळी व खरीप हंगामात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात येणार्या पितृपंधरवडा आणि नवरात्र उपवासासाठी या भाजीला प्रचंड मागणी असते. त्यावेळी या पिकाला बाजारपेठेत भरपूर भाव मिळत असल्याने या कालावधीपूर्वी या पिकाची काढणी होईल अशा बेताने या पिकाची लागवड जानेवारी ते मार्च व खरीप हंगामातील लागवड जून ते जुलै मध्येे करावी.
पूर्वमशागत व लागवड : तांबड्या भोपळ्याची लागवड ज्या जमिनीत करायची आहे. त्या जमिनीची खोल नांगरट करावी व जमीन तापू द्यावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. पहिल्या नांगरणीनंतर हेक्टरी 25 ते 30 मे. टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. त्यानंतर तीन मीटर अंतरावर 60 सें.मी. रूंदीच्या सर्या पाडाव्यात व जमिनीच्या उतारानुसार पाच ते सहा मीटर अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट टाकावेत. पाटाच्या उताराच्या बाजूने एक ते सैवाएक मीटर अंतरावर 50 सें. मी. व्यासांची आळे करून घ्यावेत व त्या आळ्यात दोन ते तीन बिया टोकून नंतर पाणी द्यावे. पेरणीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजवून घ्यावे. तसेच बियांना पेरणीपूर्वी तीन ग्राम थायरम चोळावे किंवा प्रति किलोग्राम बियाण्यास तीन ग्राम ट्रायकोडर्मा पावडर चोळून लावावी. नंतर लागवड करावी. तीन बाय एक अंतरावर लागवडीसाठी तीन ते चार किलोग्राम बियाणे पुरेसे होते.
वरखते : तांबड्या भोपळ्यात प्रति हेक्टरी 100 किलोग्राम नत्र, 50 किलोग्राम स्फुरद आणि 50 किलोग्राम पालाश घ्यावे. संपूर्ण शेणखत, स्फुरद आणि पालाश तसेच एक ते तीन नत्राचा हप्ता लागवडी आधी द्यावा. उरलेले नत्र अनुक्रमे एक व दोन महिन्यांनी समप्रमाणात द्यावे. सुरूवातीच्या काळात खुरपणी करून तण काढून आळे स्वच्छ ठेवावे. त्यामुळे वेल लवकर व जोमाने वाढून भरपूर फळे मिळू शकतात. प्रत्येक आळ्यांत दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची काढून टाकावीत. वेल पसरवून सर्व जमीन व्यापल्यानंतर आंतरमशागतीची जरूरी राहत नसली तरी मोठे तण असल्यास उपटून टाकावे.
रोग व्यवस्थापन : तांबडा भोपळा या पिकावर भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याचे योग्य नियंत्रण केल्यास होणारे नुकसान टाळता येते.
भुरी : पानांच्या दोन्ही बाजूंना पिठासारखी पांढरी बुरशी वाढते नंतर ती वेलीवर सर्व ठिकाणी पसरते. रोगाचे प्रमाण वाढले की पाने पिवळी होऊन गळून पडतात. त्यासाठी कॅलिक्झिन पाच मिली किंवा वेटेबाल सल्फर 25 ग्राम यापैकी कोणतेही एक औषध 10 लिटर पाण्यातून फवारावे.
केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : विषारी लसीमुळे होणारा रोग, रोगट वेलीस पाने लहान राहतात व त्यावर हिरवे पिवळे पट्टे दिसतात. रोगट पाने करपून गळून पडतात. कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्राम किंवा कार्बेान्डीयम 10 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे किंवा 0.5 टक्के बोर्डेामिश्रण फवारावे.
करपा : पानाच्या वरच्या भागावर कोनात्मक पिवळे ठिपके आढळतात. कालांतराने ठिपक्याचा आकार वाढून पान करपते रोगाची तीव्रता जास्त असल्यास वेली करपतात. याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (डायथेन एम-45) 25 ग्रॅम 20 लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. आवश्यक असल्यास दुसरी फवारणी 10 दिवसांनी करावी.
फळसड : लहान फळे करपतात व गळतात. काही फळे अर्धवट सडून पडतात. याच्या नियंत्रणासाठी फळाचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. लाल भोपळ्याच्या खाली वेलीची पाने ठेवावीत.
कीड व्यवस्थापन : तांबड्या भोपळ्यावर फळमाशी, मावा, तांबडे भुंगेरे यासारख्या किडींचा उपद्रव होतो. योग्य नियंत्रणाने होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
मावा : रसशोषक कीड, पाने आकसतात. त्याच्या अंगातून गोड चिकट द्रव पाझरतो. त्यामुळे पानांचे प्रकाश सश्लेषणाचे कार्य थंडावते. त्यासाठी डायमेथोएट 30 इ. सी. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
फळमाशी : माशी कोवळ्या फळांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर आलेली अळी फळाला भोक पाडून आत शिरते व तेथे राहून गाभा किडवते. त्यामुळे फळ बेढव दिसते. त्यासाठी मॅलॅथिऑन 50 इ.सी. किंवा एन्डोसल्फान 35 इ.सी. 20 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
पाणी व्यवस्थापन : इतर वेलवर्गीय भाज्यांप्रमाणेच तांबड्या भोपळ्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. विशेषत: फुले येऊ लागल्यापासून फळांची वाढ पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी देणे आवश्यक आहे. पीक वाढीच्या काळात उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळी हंगामातील पिकास पाऊस नसल्यास दोन आठवड्यांच्या अंतराने पाणी द्यावे.
संजीवकाचा वापर : तांबड्या भोपळ्यात नर व मादीचे फुले वेगवेगळी असतात. संजीवकाचा उपयोग करून मादी फुलांचे प्रमाण वाढवून अधिक उत्पादन मिळविता येते. तांबड्या भोपळ्यात नर फुलातील परागकण मादी फुलावरील स्त्री केसरावर टाकल्यास फळधारणेचे प्रमाण वाढते. मॅलिक हायड्राझाईड (एम. एच.) 50 ते 100 पीपीएम द्रावणाची पहिली फवारणी वेल दोन पानांवर असताना आणि दुसरी फवारणी त्यानंतर सुमारे एक आठवड्याने करावी. त्यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढून उत्पादन वाढते.
काढणी व उत्पादन : फळ पूर्ण पक्व झाल्यानंतरच काढावे. फळांचा रंग बदलतो. पिवळसर किंवा नारंगी पिवळा होतो. त्यानंतर फळ देठासह मोडावे व सावलीमध्ये साठवणीसाठी ठेवावे. तडकलेले किंवा सडलेले फळे बाजूला काढावीत. पिकलेले फळे घरी साठवून ठेवता येतात व जरूरीनुसार पाहिजे तेव्हा बाजारात पाठविता येतात. तांबड्या भोपळ्याचे जातीनुसार हेक्टरी सरासरी 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते.
प्रजक्ता मेटकरी, फलटन, जि. सातारा.
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर !
शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitra magazine चे फेसबुक पेज लाईक करा 👇👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03