सुगंधी वनस्पतींना जगभर मागणी चांगली आहे. अशा मागणी, वनस्पतींची लागवड करूनच पूर्ण करता येईल. कोकणाला सुगंधी वनस्पती नवीन नाहीत. कोकण हे सुगंधी वनस्पतींचे माहेर घर आहे. पावसाळ्यात कोकणाच्या डोंगरावर, जंगलात भरपूर वनस्पती वाढताना दिसतात. काही वनस्पतींचा लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान फायदेशीर ठरते. वनस्पतीमध्ये सुंगधी द्रव्ये उडनशील तेलाच्या स्वरूपात असतात. जास्त तापमानात तेलाचे प्रमाण कामी होते. आपल्या राज्यातील हवामान सुगंधी वनस्पती लागवडीस फारसे अनुकूल नसले तरी कोकणातील नारळाच्या बागेत डोंगर उतारावर गवती चहा या सुगंधी वनस्पतीची लागवड करता येईल.
गवती चहा ही ग्रामीणी कुळातील बहुवार्षिक सुगंधी पीक आहे. सर्दी, पडशासाठी औषधी वनस्पती म्हणून लागवड करतात व त्यापासून काढलेल्या तेलाला भरपूर मागणी आहे. पानांमध्ये ०.२५ ते ०.५० टक्के तेलाचे प्रमाण असते. या तेलामध्ये सिट्रल (७५.८५ टक्के) असते. म्हणून या तेलाचा उपयोग व्हिटॅमिन ‘ए’ च्या गोळ्या तयार करण्यासाठी उपयोग करतात. याचबरोबर तेलाचा साबण, केसांची तेले, अत्तर, औषधे, सौंदर्य प्रसाधने निर्मितीत उपयोग करतात.
जमीन : कोकणातील लालसर जमिनीत हे पीक चांगली होते व जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.
हवामान : गवती चहा हे पीक समशीतोष्ण हवामानातील पीक आहे. पिकाच्या वाढीस उष्ण व दमट हवामान भरपूर सम प्रमाणात पडणारा पाऊस लागतो.
पूर्वमशागत : गवती चहाची लागवड करावयाच्या जमिनीची पूर्व मशागत चांगली नांगरून उभ्या किंवा आडव्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. पिकाच्या वाढीसाठी आठ ते दहा टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर ९० सें. मी. अंतर ठेवून मिसळावे.
लागवड : गवती चहाची लागवड करावयाच्या जमिनीची पूर्व मशागत चांगली करावी म्हणजे वाढ जोमाने होते. फुटवे लावताना दोन फुटव्यामध्ये ६० सें. मी. अंतर सोडावे.
खते : लागवडीसाठी तयार केलेल्या जमिनीत ५० कि. नत्र, ५० पालाश व ५० किलो स्फुरद लागवडीच्या वेळी व प्रत्येक कापणीनंतर ५० कि. प्रति हेक्टरी नत्राची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन : गवती चहास पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पावसाळ्यात या पिकास पाणी देण्याची आवश्यकता नसते व उन्हाळ्यात दर १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
कापणी : गवती चहाच्या वर्षातून तीन ते चार कापण्या करता येतात. उच्च प्रतिचे तेल मिळविण्यासाठी पिकाची वेळेवर कापणी करणे आवश्यक आहे. पहिली कापणी तीन ते चार महिन्यांनी करावी. पिकाची कापणी जमिनीतून अर्ध्या फुटांवर करावी.
उत्पन्न : पहिल्या वर्षी लागवडीपासून ५० ते ७० टन व दुसर्या वर्षापासून १०० टनापर्यंत ओल्या गवताचे प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. व त्यापासून ३५० किलो पर्यंत सुगंधी तेल मिळते.
डॉ. अमोल मिसाळ, श्री. जयकुमार देशमुख, वर्षा मरवाळीकर कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा