सुगंधी वनस्पतींना जगभर मागणी चांगली आहे. अशा मागणी, वनस्पतींची लागवड करूनच पूर्ण करता येईल. कोकणाला सुगंधी वनस्पती नवीन नाहीत. कोकण हे सुगंधी वनस्पतींचे माहेर घर आहे. पावसाळ्यात कोकणाच्या डोंगरावर, जंगलात भरपूर वनस्पती वाढताना दिसतात. काही वनस्पतींचा लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान फायदेशीर ठरते. वनस्पतीमध्ये सुंगधी द्रव्ये उडनशील तेलाच्या स्वरूपात असतात. जास्त तापमानात तेलाचे प्रमाण कामी होते. आपल्या राज्यातील हवामान सुगंधी वनस्पती लागवडीस फारसे अनुकूल नसले तरी कोकणातील नारळाच्या बागेत डोंगर उतारावर पाचौली या सुगंधी वनस्पतीची लागवड करता येईल.
पाचौली ही लॅमीआसी कुळातील बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. पाचौलीचे झुडूप नारळाच्या सावलीत सुमारे एक ते दीड मीटर उंच वाढते. पाने साधी व परस्परांविरूद्ध असतात. उघड्या जागेत वाढलेल्या झाडांची पाने जांभळट रंगाची तर सावलीत वाढलेल्या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात.
हवामान : पाचौली ही दमट उबदार हवामानात व समान विखुरलेल्या प्रदेशात चांगली वाढते या वनस्पतींच्या वाढीसाठी २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि सरासरी ७५ टक्के आर्द्रता आवश्यक आहे.
जमीन : अनेक प्रकारची जमीन चालते, हलकी, भारी व गाळाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी लागते. सुपीक जमिनीत उच्च प्रतिचे तेल असलेली भरपूर पाने मिळतात.
पूर्व मशागत : पाचौलीची लागवड करावयाच्या जमिनीची पूर्व मशागत चांगली नांगरून उभ्या किंवा आडव्या कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. पाचौलीच्या वाढीसाठी दहा ते बारा टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर मिसळावे. सूक्ष्म कृमींचा बंदोबस्त व्हावा म्हणून हेक्टरी १५ ते २० किलो फ्युरॉडॉन जमिनीत चांगले मिसळावे व सर्या पाडाव्यात.
लागवड : पाचौली रोपांची शक्यतो सरीचे वरंब्यावर करावी. सर्या पाडताना दोन सर्यांमध्ये ६० सें. मी. अंतर असावे. रोप लावताना प्रत्येक सरीच्या मध्यभागी लावावे व दोन रोपांमध्ये ६० सें. मी. अंतर ठेवावे.
खते : लागवडीसाठी तयार केलेल्या जमिनीत प्रतिवर्षी १५० कि. नत्र, ६० कि. स्फुरद व ६० कि. पालाश प्रति एकर द्यावे. लागवडीपूर्वी प्रति एकरी २५ कि. नत्र, स्फुरद व पालाश जमिनीत मिसळावे. लागवडीपासून सुमारे दोन महिन्यांनी प्रति एकरी २५ कि. नत्र, वरखत द्यावे. तसेच प्रत्येक तोडणीनंतर प्रति एकरी ५० कि. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे.
पाणी व्यवस्थापन : लावणी झाल्यानंतर सुरूवातीचे तीन ते चार दिवस दररोज पाणी द्यावे. त्यानंतर १० ते १५ दिवस एक दिवसा आड व त्यानंतर एक महिन्यापर्यंत तीन ते चार दिवसांनी एकदा असे लालसर जमिनीत पाणी द्यावे. बारमाही पाणी व्यवस्थापन व सुपीकता असलेल्या जमिनीतून उच्च प्रतीचे तेल असलेली भरपूर पाने मिळतात.
कापणी : पाचौली झाड लागवडीपासून ५ ते ६ महिन्यात पूर्ण वाढते. पूर्ण वाढलेली पाने फिकट हिरवी किंवा फिकट तपकिरी रंगाची झाल्यास पीक कापणीस आले असे समजावे. या पिकाच्या पानामधून सुगंधी वास वातावरणात दरवळत राहतो. पाचौलीची कापणी करताना जबुत फांद्या कायम ठेवून ४०-६० सें. मी. उंचीची झाडांच्या शेंड्याची छाटणी करावी. एकदा लागवड केल्यावर पाचौलीस दोन-तीन वर्षे भरपूर प्रमाणात उत्पन्न येते.
उत्पादन : एका वर्षात पाचौलीच्या तीन छाटण्या होतात. प्रतिवर्षी प्रति एकरी सुमारे २० ते ४० टन ओली पाने व काड्या मिळू शकतात. ही कापलेली पाने व काड्या सावलीमध्ये वाळवावीत. त्यापासून ३.५ ते ५ टन वाळलेली पाचौलीची पाने मिळतात. त्यापासून ५० ते ६० किलो सुगंधी तेल निघते. सावलीत वाळविलेल्या पानांमध्ये २.५ ते ३.० टक्के तेल मिळते.
डॉ. अमोल मिसाळ, श्री. जयकुमार देशमुख, वर्षा मरवाळीकर कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा