सुगंधी वनस्पतींना जगभर मागणी चांगली आहे. अशा मागणी, वनस्पतींची लागवड करूनच पूर्ण करता येईल. कोकणाला सुगंधी वनस्पती नवीन नाहीत. कोकण हे सुगंधी वनस्पतींचे माहेर घर आहे. पावसाळ्यात कोकणाच्या डोंगरावर, जंगलात भरपूर वनस्पती वाढताना दिसतात. आपल्या राज्यातील हवामान सुगंधी वनस्पती लागवडीस फारसे अनुकूल नसले तरी तुळस या औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड बहुतांश जिल्ह्यात करता येईल.
रानतुळस ही लॅमीआसी कुळातील सुगंधी वनस्पती आहे. पानामधून ०.७ टक्के युजेनॉल असते. पानांचा रस कानदुखीवर वापरतात. पानाचा काढा पोटातील वायू कमी करतो. काढा छातीच्या व हृदयाच्या तक्रारीवरीही वापरतात. ‘बी’ मुत्रविकारावर वापरतात.
जमीन व हवामान : तुळस ही उष्ण समशीतोष्ण हवामानात वाढणारी वनस्पती आहे. ही वनस्पती विविध प्रकारच्या हवामानात चांगली येते. भरपूर पाऊस, सूर्यप्रकाश, मोठे दिवस असलेला काळ वाढीस व तेल उत्पादनास अनुकूल असतो. वनस्पती सर्व जमिनीवर घेता येते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी.
पूर्व मशागत : जमीन नांगरून उभ्या किंवा आडव्या कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. पिकाच्या वाढीसाठी १० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे.
लागवड : तुळशीची लागवड बियाद्वारे करतात. शेतात लावण्यासाठी प्रथम बियापासून रोपे तयार करावी. रोपे तयार करण्यासाठी नवीन बी वापरावे. गादी वाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत. बी लहान असल्याने जास्त खोल पेरू नये. पेरणीनंतर झारीने पाणी द्यावे. साधारण दीड महिन्यात रोप पुर्नलागवडीस तयार होतात. लागवडीसाठी योग्य रोपे ३० ते ५० सें. मी. अंतरावर पुर्नलागवड करावी.
खते : लागवडीसाठी तयार केलेल्या जमिनीत ५० कि. नत्र, ५० कि. स्फुरद व ५० कि. पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. पहिल्या व दुसर्या कापणीनंतर प्रत्येक ५० किलो नत्राची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन : पाण्याचा ताण सहन करण्याची या वनस्पतीत क्षमता आहे. पावसाळ्यात या पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही. मात्र हिवाळ्यात व उन्हाळ्यात पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
कापणी : तुळशी पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पहिली कापणी तीन ते साडेतीन महिन्यांनी करावी. त्यानंरची छाटणी प्रत्येक दोन ते अडीच महिन्यांनी करावी. कापणी स्वच्छ सूर्यप्रकाश असताना करावी म्हणजे भरपूर तेल मिळते.
उत्पन्न : तुळशीच्या पहिल्या वर्षी ४० ते ४५ टन ओली फांद्या मिळतात व दुसर्या वर्षातून ७० टनापर्यंत ताज्या फांद्या मिळतात व त्यापासून २०० ते २५० कि. तेल मिळते.
डॉ. अमोल मिसाळ, श्री. जयकुमार देशमुख, वर्षा मरवाळीकर कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा