सिसू ही वनस्पती भारतात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरीसा, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी आढळते. ही वनस्पती उष्ण कटिबंधीय सदाहरीत तसेच पानझडी वनांमध्येही आढळते.
सिसू वृक्षाच्या मुळांवर गाठी येतात व हवेतील नत्र जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात. त्यामुळे वनशेतीमध्ये या वृक्षास विशेष स्थान आहे. सिसू वृक्ष प्रखर सूर्यप्रकाशात वाढणारा वृक्ष असल्याने त्याच्या रोपट्यांना सावली चालत नाही. सिसूची पानगळ नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत होते. नवीन पाने मार्च-एप्रिल पर्यंत येतात. नवीन पालवी सोबत फुलेही येण्यास सुरूवात होते. शेंगा एप्रिलपासून जूनपर्यंत पक्व होतात. पक्व झालेल्या शेंगा फिक्कट-तपकिरी किंवा भुर्या रंगाच्या असतात. काही ठिकाणी पावसाळ्याच्या सुरूवातीस फुले येतात व या शेंगा नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये पक्व होतात. सिसू वृक्ष हा वेडावाकडा वाढणारा वृक्ष असून फार क्विचित सरळ वाढ असलेले वृक्ष आढळतात. सिसूचे बियाणे गोळा करताना जास्तीत जास्त सरळ असलेल्या वृक्षांची निवड करावी.
रोपनिर्मिती तंत्रज्ञान : सिसूची रोपवाटिका तयार करण्यासाठी झाडावर वाळलेल्या शेंगा जानेवारी महिन्यात गोळा कराव्यात. शेंगामधून ‘बी’ वेगळे काढण्याची आवश्यकता नसते. फक्त शेंगाच्या मधला बी असलेला भाग रोपासाठी वापरता येतो. ‘बी’ पेरण्यापूर्वी 24 ते 36 तास पाण्यात भिजत ठेवल्यास 60 ते 80 टक्के उगवण मिळते. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपे तयार करण्यासाठी दोन भाग चांगली माती व एक भाग चांगले कुजलेल्या शेणखताचे मिश्रण करून पिशव्यात भरावे. पाण्यात भिजत ठेवलेले ‘बी’ पिशवीत लावावे. ‘बी’ पेरणी मार्च-एप्रिलमध्ये करून रोपवाटिकेत रोपे तयार करताना सर्व पिशव्या झाडांच्या अथवा शेडनेटच्या सावलीत ठेवाव्यात व रोज झारीने पाणी द्यावे. रोपे चार ते सहा महिन्यात लागवडीयोग्य होतात.
लागवड व्यवस्थापन : सलग लागवड करण्यासाठी तीन बाय चार किंवा चार बाय चार मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सें.मी. आकाराचे खड्डे तयार करून त्या खड्ड्यात माती व शेणखताच्या मिश्रणाने भरून घ्यावे. पावसाळ्याच्या सुरूवातीस चांगला पाऊस झाल्यानंतर रोपे लागवड करावी. सिसू लागवडीसाठी एक वर्ष वयाचे खुंटही वापरता येतात. खुंट करण्यासाठी पाच ते दहा सें.मी. खोड व 20 ते 25 सें.मी. मूळ ठेवून खुंट तयार करतात. वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर लागवड करायची असल्यास प्रत्यक्ष बियांची देखील पेरणी मूळ ठिकाणी केली जाते. पहिल्या दोन ते तीन वर्षांत रोपांची निगा राखणे आवश्यक आहे. जनावरे आणि आगीपासून देखील संरक्षण आवश्यक आहे. सिसूची वाढ जलद होण्यासाठी पाणी दिल्यास फायद्याचे ठरते. उत्तर भारतात सिसूच्या कालव्या शेजारी फार मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या रोपांना ओलिताची गरज भासत नाही. मात्र पडीक जमिनीवर लागवड केल्यास सुरूवातीच्या दोन ते तीन वर्षांच्या काळात उन्हाळ्यात रोपांना पाणी द्यावे.
झाडांचा बांधा व जलद वाढ याकरिता निवड पद्धतीने बीजगुणन बागा लावल्या गेल्या आहेत. या बागांमध्ये सरळ वाढणार्या वृक्षांची रोपणी करण्यात आली आहे. सिसू लागवड कमी अंतरावर केलेल्या झाडांना शाखा कमी असल्यामुळे सरळ वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे. परंतु कमी अंतरावर लागवड केलेल्या झाडांची कालांतराने छाटणी व विरळणी करणे गरजेचे असते. झाडे 10 ते 15 वर्षांच्या अंतराने विरळणीस योग्य होते. प्रत्येक विरळणीत 30 ते 40 टक्के झाडांची संख्या कमी करावी. नैसर्गिक जंगलात सिसू या वृक्षाची आयुष्यमान 40 ते 60 वर्ष आहे. साधारणत: 40 वर्ष वयाच्या सिसूच्या वृक्षाची उंची 30 ते 50 फूटापर्यंत होते व खोडाचा घेर 25 ते 40 सें.मी. पर्यंत होतो.
सिसूचे लाकूड फर्निचर आणि प्लायवूड करण्याकरिता उत्तम आहे. गाभ्याचे लाकूड सोनेरी ते गडद तपकिरी रंगाचे असून बाहेरील लाकूड पांढर्या ते सफेद तपकिरी रंगाचे असते. गाभ्याचे लाकूड अतिशय टिकाऊ असून वाळवीला प्रतिबंधक आहे. परंतु बाहेरील लाकडावर बुरशी आणि लाकूड पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव आढळतो. सिसूच्या लाकडाची उर्जेची क्षमता 4908 किलो कॅलरी प्रति किलो असते. इंधनकरिता हे 10 ते 12 व्या वर्षी प्रति हेक्टरी 80 ते 140 घनफूट जळाऊ लाकूड मिळते. या वृक्षाच्या लाकडापासून उत्तम कोळसा तयार होतो. या वृक्षास तोडणीनंतर फुटवे फुटण्याची क्षमता असते. हे फुटवे जलद गतीने वाढतात व अधिक उत्पन्न देतात. ही फुटवा पद्धती इंधन लाकडासाठी वापरता येते.
सिसूची पाने आणि कोवळ्या फांद्या काही भागात पशुचारा म्हणून वापरतात. पाने व सालाचा उपयोग औषधांकरीता देखील करतात. या वृक्षाला मूळ फुटवे आणि धावतीमुळेे येत असल्यामुळे घळीमधून होणारी जमिनीची धूप टाळण्यास फार मदत होते.
हेही वाचा :
कशी करावी निलगिरीची व्यापारी लागवड
सुरूवृक्षा लागवडीचे व्यापारी उत्पादन तंत्र
फायद्याच्या बांबू शेतीचे लागवड तंत्र
सागाची जलद वाढ होण्यासाठी
रोग व कीड व्यवस्थापन : सिसूच्या रोपवाटिकेत फ्युजॅरियम नावाच्या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे रोपे उन्मळून पडतात तसेच पाने गळून पडून रोपे मरतात. रोपवाटिकेत वाळवी, हुमणी, पाने खाणारी अळी इत्यादींचा प्रादुर्भाव आढळतो. ‘बी’ जन्य रोगांपासून रोपे वाचविण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डेझीन 0.01 टक्के (2 ग्रॅम पावडर एक लिटर पाण्यात) द्रावणातून काढून आणि पाण्याचे योग्य नियोजन करून बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करता येते. हुमणी, वाळवी इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी 10 बाय 1 मिटरच्या गादीवाफ्यावर फोरेट 10 जी 150 ग्रॅम प्रती वाफा याप्रमाणात मिसळावे किंवा क्लोरोपायरीफॉस 2.5 मिली प्रतिलिटर पाण्यातून गादीवाफ्यावर टाकावे. पाने खाणार्या अळीच्या नियंत्रणासाठी कार्बारील पावडर दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून किंवा एन्डोसल्फान 1.5 मिली प्रतिलिटर पाण्यातून रोपावर फवारावे.
डॉ. सतिश नारखेडे वनशास्त्र विद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा