उसाची लागवड सुरु, पूर्व हंगामी आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या कालावाधीत आडसाली उस सात ते आठ महिन्याचा असल्याणे पाण्याचा बराचसा ताण सहन करू शकते. कीड व रोगाचा प्रादुर्भाव सुरु व खोडावा यांच्या तुलनेत आडसाली ऊसाला कमी राहतो.
आडसाली हंगामासाठी फुले 265, को 86032 किंवा को व्हीएसआय 9805 या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. या पद्धतीमुळे उसाची जोमदार वाढ होते.
उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची मशागत करून सपाट केल्यानंतर रिजरच्या साह्याने भारी जमिनीत 120 ते 150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100 ते 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. पट्टा पद्धतीसाठी 2.5 – 5 किंवा 3 – 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. पट्टा पद्धतीचा आंतरपीक आणि ठिबक सिंचनासाठी चांगला उपयोग होतो. पॉवर टिलरचा वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर 120 ते 150 सें. मी. (चार ते पाच फुटांपर्यंत) ठेवावे.
लागवडीचे तंत्र : मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास चार फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवावे किंवा पाच फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांतील अंतर 1.5 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील.
सरी अंतरानुसार ऊस लागवड
लांब सरी पद्धत : या पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्या जमिनीत तीन फूट अंतरावर सरी पाडावी. भारी जमिनीमध्ये 3.25 ते 4 फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना दोन ते तीन सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक्क्यापर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी. उतार 0.4 टक्क्यापेक्षा जास्त असल्यास उतारावा आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी.
फायदे : या पद्धतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते. त्यामुळे जमीन खराब होण्याचे प्रमाण कमी होते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो व उत्पादनात वाढ होते. योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.
पट्टापद्धतीने ऊसलागवड (2.5 फुट x 5 फुट किंवा 3 फुट x 6 फुट) : जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
फायदे : भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. या पद्धतीत यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते.
बेणेप्रक्रिया : काणी रोगनियंत्रण तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे. बेणेप्रक्रियेसाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात बेणे 10 मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर ऍसिटोबॅक्टर 10 किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू संवर्धकाच्या बेणेप्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते.
प्रा. दर्शना भिमराव मोरे, प्रा. पल्लवी सुभाष घुले, के. के. वाघ. उद्यानविद्या महाविद्यालय नाशिक (मोबा. 9689217790)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा