दिवसेंदिवस तेलबियांची लागवड कमी होत आहे. पर्यायी गळीतधान्य पिके उपलब्ध असले तरी भुईमूग हे राज्याचे पारंपारिक तेलबिया पीक आहे. भुईमूगाची शास्त्रीय पद्धतीने जोपासणा केल्यास नक्कीच अपेक्षीत उत्पन्न घेता येते.
भुईमुगाच्या पेरणीनंतर लगेच तणांची स्पर्धा सुरूवातीपासूनच होते असते. म्हणून भुईमूग जमिनीत पुरेशी ओल असतांना पेंडीमिथॅलिन 1.0 किलो क्रियाशील घटक/हे ( सात मिली/लिटर व्यापारी उत्पादन) 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पेरणीनंतर पूर्ण उगवण होईपर्यंत साधारपणे सात ते दहा दिवस पिकांचे पक्षांपासून संरक्षण करावे. पिकात नांग्या (गॅप) पडल्या असतील तर लगेच सात ते दहा दिवसांत नांग्या भरून घ्याव्यात जेणेकरून हेक्टरी रोपांची संच 3.33 लक्ष राखता येईल. पूर्ण उगवण झाल्यानंतर साधारणपणे (20 ते 25 दिवसांनी) दोन ओळीत तण नियंत्रणाच्या दृष्टीने आंतरमशागत करून घ्यावी त्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करावी. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी तणे तीन ते चार पानांवर असतांना इमॅझिथायपर या निवडक तणनाशकांची दोन मिली/लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी जिप्समची दुसरी मात्रा 125 किलो/हेक्टरी दोन ओळीच्यामध्ये टाकावी त्यानंतर कोळप्याला दोरी बांधून पिकास भर द्यावी जेणेकरून जिप्सम पिकांच्या मुळ्याभोवती राहून पिकास लवकर उपलब्ध होईल.
रोग व किडींचे नियंत्रण
लोह व जस्ताची कमतरतेमुळे पाने पिवळे/पांढरे दिसल्यास फेरस सल्फेट, झिंक सल्फेट या सुक्ष्म अन्नद्रव्यांची दोन मिली/लिटर पाणी या प्रमाणात हेक्टरी 500 लिटर पाणी फवारणी करावी. खरीप हंगामात रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. पिकावर मावा, फुलकिडे, तुडतुडे या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी 500 लिटर पाणी/हेक्टर किंवा असॅनिरॅक्टीन दोन मिली/लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने डेकामेथ्रीन किंवा मेटॅसिस्टॉक्स एक मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पाने खाणार्या व पाने गुडाळणार्या अळीसाठी क्विनॉलफॉस 25 ईसी दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टिक्का व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी
खरीप हंगामात भुईमूगावर टिक्का व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम/लिटर किंवा कार्बेन्डॅझिम एक ग्रॅम/लिटर अधिक ट्रायडिमॉर्क किंवा डायफेन कोनॅझोल एक मिली/लिटर पाण्यातून फवारणी करावी. वाढीच्या कालावधीत पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. शक्यतो तुषार सिंचनाने द्यावे. जेणेकरून समप्रमाणात पाणी देता येते व पाण्याची बचत करता येते. खताच्या व पाण्याच्या व्यवस्थापनाने शेंगा चांगल्या जोमाने अधिक उत्पादन येते.
खाते, सुक्ष्मअन्नद्रव्ये
पेरणीपूर्वी भुईमूगासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50, किलो स्फुरद, युरीया व सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून पेरून द्यावी तसेच जिप्सम या भुसधारकाची 125 किलो मात्रा पेरणीपूर्वी रासायनिक खतासोबत द्यावी. माती परिक्षण अहवालानुसार जमिनीत लोह जस्ताची कमतरता असल्यास हे. 20 किलो फेरस सल्फेट अथवा झिंक सल्फेट ही सुक्ष्मअन्नद्रव्ये जमिनीत मिसळून द्यावी. हे. पाच किलो बोरॉन पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून दिल्यास फायदेशीर ठरते. भुईमूग पीक सलग घेणे शक्य नसल्यास लिंबू, मोसंबी, केळी, डाळींब, संत्रा व कापूस, तूर, तीळ यामध्ये आंतरपिक घ्यावे. त्यामुळे काही प्रमाणातही उत्पादन मिळते.
भरत मालुंजकर, डॉ. सुदाम पाटील, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव. (मो. 9850327873)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा