महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेगावात बंधारे व गावतळी यालाच आपण तळी म्हणतो. त्याच तळ्याचा उपयोग आपण पिण्याच्या पाण्यासाठी करतो. याच तळ्याचा उपयोग काही ठिकाणी कपडे धुण्यासाठी व जनावरांसाठी होतो. तसेच अनेक गावांमध्ये बांधकामाला लागणारे दगड काढल्यामुळे खाणी तयार झाल्या आहेत. या बहुतेक जलाशयाचा वापर त्यांचा प्रमुख हेतूला बाधा न आणता मत्सशेतीसाठी करता येतो.
मत्सशेतीमुळे ग्रामीण भागातील जनतेला एक प्रकारचे पौष्टीक अन्न मिळते. हेच अन्न प्रथिनयुक्त अन्नपुरवठा सुद्धा मत्स्य संवर्धनासाठी होतो. मत्स्यशेतीमुळे काही प्रमाणात चांगल्या प्रकारे रोजगारही मिळू शकतो किंवा मिळतो. मत्सशेतीमध्ये आपण तळ्यामध्ये मत्स्यबीज सोडतो व त्यांची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी या करीता अनुकूल वातावरणात निर्माण करून मत्स्योत्पादन घेतो यालाच आपण मत्स्यशेती म्हणतो.
मत्स्यशेती करताना तळ्याचा भाग कशाप्रकारे असायला. हवा याची माहिती असणे गरजेचे असते. कारण मत्स्यशेतीमध्ये हवा, पाणी, सूर्यप्रकाश, पाण्याची खोली अशा अनेक घटकांचा उपयोग उत्पादनवाढीवर होत असतो. त्यामुळे यागोष्टी लक्षात घेणे महत्वाचे ठरते.
हवा : आपण जेवढे मोठे तळे बांधाल तेवढा खर्च कमी येतो. परंतु त्याचबरोबर व्यवस्थापनाची काळजीसुद्धा वाढते. तळे जेवढे लहान असेल तितके त्यातून प्रतिहेक्टरी अधिक उत्पादन मिळवू शकतो. कारण लहान तळ्यातील मासे लवकर सहज पकडता येतात. म्हणजेच, त्यांचे व्यवस्थापनही तितेकच सोपे, परंतु तळे लहान म्हणजे किती लहान असावे याचाही विचार केला पाहिजे. तसेच मत्स्यबीज वाहतुकीचा खर्च मत्स्यशेती वरील देखरेख मासे पकडण्यासाठी होणारा खर्च इत्यादी. बाबींचा विचार केल्यास एकदम क्षेत्रात मत्स्यशेती करणेही तसे योग्य ठरणार नाही. यासाठी तळ्याचे जलक्षेत्र किमान 20 गुंठे ते दोन हेक्टरपर्यंत असायला पाहिजे.
पाण्याची खोली : पाण्याची खोली एक महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे पृष्ठभागापासून दोन मीटर खोलीपर्यंतचा भाग उत्पादनासाठी पोषक ठरतो. कारण पाण्यात जेथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो त्या भागापर्यंत चांगली अन्ननिर्मिती होऊ शकते. हे अन्न माशांचे मुख्य अन्न म्हणून गणले जाते.
गढूळपणा : पाण्याचा गढूळपणा दोन गोष्टींमुळे निर्माण होऊ शकतो. पहिल्या प्रकारात गाळाचे कण पाण्यात असतील तेव्हा गढूळपणा होतो. त्यामुळे पाणी गढूळ होते. या गढूळपणामुळे प्रकाश किरण पाण्यात खोलवर पोहचू शकत नाही. त्यामुळे प्लवंग निर्मिती कमी होते.
प्रकाश : प्रकाशसंश्लेणाकरिता पाण्यातील सुक्ष्म आणि इतर मोठ्या वनस्पतींना प्रकाशाची आवश्यकता असते. प्लवंग निर्मिती व त्यांचे कार्य यासाठी सुद्धा प्रकाश लागतो.
तापमान : पाण्यातील मासे प्लवंग इत्यादीची वाढ उष्ण तापमान अधिक होते. आपल्याकडील मासे हे साधारणत: 20 ते 30 अंश सेल्सिअस या तापमानाला चांगले वाढतात. कित्येक जातीची तापमान सहन करण्याची कमाल व किमान तापमान मर्यादा ठरलेली असते.
रासायनिक गुणधर्म : पोषकद्रव्य : पाण्यात अनेक लहान वनस्पती व प्राणी असतात. हे जीवजंतू जीवंत असताना पाण्यामध्ये तरंगत असतात व मेल्यानंतर तळाशी जातात. पाण्यावर तरंगणार्या या लहान जीवांना आपण प्लवंग असे म्हणतो. हे प्लवंग दोन प्रकारचे असतात. एक वनस्पती व दुसरा प्राणी प्लवंग, प्लवंग हे एकप्रकारचे माशाचे अन्न होय. तलावातील मातीत पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फेट अशी जी द्रव्ये अनुकूल परिस्थितीतील पाण्यामध्ये विरघळतात व ही द्रव्ये आपणाला प्लवंग निर्मितीला उपयोगी पडतात.
प्राणवायू : सजिवांना श्वसन करण्यासाठी पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचा उपयोग करावा लागतो. वनस्पती प्लवंग दिवसा पाण्यातील कार्बनडायऑक्साईड वापरून अन्न तयार करते.
आम्लता निर्देशांक : निसर्गात आढळणारे प्राणी हे आम्लधर्मी, अल्कधर्मी किंवा उदासीन असते. पाण्याचा निर्देशांक सातपेक्षा अधिक असेल तर ते पाणी अल्कधर्मी, सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी व पाण्याचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 8.5 पर्यंत असल्यास उत्पादकता समाधानकारक असते. आम्लधर्मी पाणी हे कोळंबीला पोषक नसते.
कार्बनडायऑक्साईड : तसे पाहिले तर कार्बनडायऑक्साईडला माशांच्या नित्य जीवनात फार कमी महत्त्व आहे. पण प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेसाठी तो आवश्तक असतो.
माशांच्या जातीची निवड : मत्सशेतीसाठी माशांची निवड करताना चांगले गुणधर्म असलेले मासे संवर्धन करण्याकिरता घ्यावेत. माशाला बाजारपेठेत चांगली मागणी असली पाहिजे. भाव चांगला असला पाहिजे. तो चवीलासुद्धा चांगला असला पाहिजे. तळ्यातील नैसर्गिकरित्या मिळणार्या सर्व अन्नाचा उपयोग करणारे असले पाहिजेत इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन मासे मत्स्यसंवर्धनासाठी निवडले तर मत्सशेती अधिक फायदेशीर ठरेल. आपल्या देशामध्ये मुख्यत्वे करून मत्स्यसंवर्धनाकरिता इंडियन मेजर कार्पस वापरतात. त्यांच्या तीन जाती आहेत. काटला, रोहू, मृगल, कोळंबीमध्ये मात्र मुख्यत्वे करून मक्रोब्याकीयाम रोजेनबर्गी ही जास्त प्रमाणात संवर्धनाकरीता वापरतात. तिलाच आपण जम्बो कोळंबी असे म्हणतात.
संवर्धन योग्य जाती : काटला : या माशाचं डोके मोठे आणि रूंद असते. का मासा पृष्ठभागावर वावरणारा आहे. अंगावर खवले असतात. तोंड बाजूला वहलेले असते. म्हणून पृष्ठभागाकडील अन्न खाणे त्याला सोपे जाते. खालचा ओठ जाड असतो. साधारणत: वर्षाला 1 ते 1.5 किलोपर्यंत वाढतो. इतर कार्पच्या तुलनेने झपाट्याने वाढतो.
रोहू : या माशाचे शरीर लांबट असते. अंगावर खवले असतात. मासा पाण्याच्या मधल्या थरातील अन्न खातो. त्यांच्या ओठाची किनार दातेरी असते. तिचा उपयोग वनस्पती ओढून तोडण्यासाठी होतो. याची सुद्धा वाढ वर्षाला साधारणपणे एक किलोपर्यंत आहे.
मृगल : कटला रोहूनंतर मत्स्यशेतीसाठी वापरला जाणारा कार्प म्हणजे मृगल या माशाचे तोंड रूंद व ओठ पातळ असतात. तळाच्या चिखलातील सेंद्रिय अन्नपदार्थ शेवाळ, प्लवंग हे त्यांचे खाद्य आहे. हा साधारणपणे वर्षाला 600 ग्रॅम, पर्यंत वाढतो. हे तिन्ही प्रकारचे मासे संवर्धनासाठी वापरले तर निश्चितच अधिक उत्पादन मिळू शकेल. कारण, हे पाण्याच्या तिन्ही भागात चांगल्या प्रकारे वाढतात.
सायप्रीनस काप्रीयो : बहुतेक संवर्धनासाठी हा मासा वापरण्यात येतो. याच्या तीन पोटजाती आहेत. हा मासा जास्त प्रमाणामध्ये तळाशी असणारे किटक कुजणार्या वनस्पती अन्न म्हणून उपयोगात आणतो. हा भागतात सर्वत्र सापडतो.
कोळंबी : मुख्यत: तळाशी वावणारी कोळंबी मस्तकाचा रोसट्रम पुढे वाढलेला असतो. या कोळंबीचा उपयोग गोड्या पाण्यातील संवर्धनाकरीता करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा वर्षापासून महाराष्ट्रातील लोक गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाविषयी जागरूक झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण जमिनीचा विचार केला गेला तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसामुळे ज्या जमिनीची उत्पादन क्षमता घटलेली आहे. अशा जमिनीचा उपयोग वरील सर्व बाबींचे व्यवस्थित व्यवस्थापन करून मत्स्यसंवर्धन केले तर ते अधिक फायदेशीर आहे.
प्रा. संतोष पाटोळे, प्रा. अर्जुन भोसले कृषी महाविद्यालय, बाभुळगाव, ता. येवला, जि. नाशिक.