सीताफळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळ पीक असून, याचे क्षेत्र वाढत असले तरी त्याची उत्पादकता मात्र समाधानकारक वाढलेली नाही; त्याची अनेक कारणे आहेत. सीताफळ या फळपीकवर पिठ्या ढेकूण (मिलीबग) फळ पोखरणारी अळी आणि फळमाशी या तीन किडी हे महत्त्वाचे कारण आहे. सिताफळावर येणार्या कीड व रोगामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनी पिकावर कीड तसेच रोगांचा प्रादुर्भाव दिसल्यास नियंत्रणाचे उपाय अवलंबणे फार गरजेचे ठरते
हे नक्की वाचा : अशी करा एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीची पूर्व तयारी !
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्तम स्वाद आणि पौष्टिक घटक यामुळे फळाला बाजारात विशेष मागणी आहे. या पिकाचा विचार करता पाण्याचा ताण सहन करणारे व तग धरून राहणारे पानझडी फळपिक म्हणून सीताफळ हे पीक ओळखले जाते. त्यामुळे कमी पाण्याच्या भागामध्ये सुद्धा सिताफळाची लागवड होताना दिसत आहे. विशेष गुणवत्ता व दर्जेदार फळ उत्पादनासाठी पिकाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
पिठ्या ढेकूण : ही कीड पिवळसर रंगाची असते तिच्या शरीरावर पांढरट मेणासारखा चिकट पदार्थ असतो. किडीचे प्रौढ व अळी या दोन्ही अवस्था सिताफळाची पाने, नाजूक फांद्या व फळे या भागावर राहतात व पिकातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात व गळून पडतात. प्रादुर्भात फळे आकाराने लहान राहतात त्यामुळे फळांची प्रत बिघडते व ते बाजारात अयोग्य ठरतात. या किडीचा दुय्यम प्रादुर्भाव म्हणजे किडीच्या शरीरातून मधासारखा चिकट असा पदार्थ स्त्रवला जातो त्यामुळे पानावर व फळावर काळी बुरशी वाढते त्यामुळे प्रकाशसंश्लेषणात अडथळा येऊन झाडाची वाढ खुंटते.
हा लेख वाचा : शेतीमध्ये फळमाशीचा धोका वाढतोय !
किडींचा बंदोबस्त : लागवडीसाठी रोपे निवडताना कीड विरहीत रोपे निवडावीत. बागेमध्ये स्वच्छता ठेवावी. झाडाच्या ज्या भागावर, फांदीवर किंवा फळावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तो भाग काढून नष्ट करावा. किडीच्या जैविक नियंत्रणासाठी क्रिप्टोलीमस मोंट्रोझरी या परभक्षी किटकाचे दहा प्रौढ प्रति झाड या प्रमाणात सोडावेत. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी डायक्लोरोव्हास डी. डी. व्ही. पी. पाच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी नवीन पालवी येताना व दुसरी फळधारणा होताना अशा दोन फवारण्या घ्याव्यात.
फळ पोखरणारी अळी : किडीची अळी काळ्या रंगाची असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फळाला लहान छिद्र करून आत शिरते व गरावर हल्ला करते. प्रादुर्भाव झालेला भाग तपकिरी किंवा काळा पडतो. अळीचा प्रादुर्भाव झालेले फळ कुजते व गळून पडते. बागेमध्ये पडलेल्या फळांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
वाचनीय लेख : एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीचे तंत्र
किडीचे नियंत्रण : बागेमध्ये स्वच्छता ठेवावी. तसेच गळून पडलेली फळे तातडीने जमा करून नष्ट करावीत. किडीचे प्रमाण वाढताना आढळून आल्यास मेलाथियोन दहा मिली दहा प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोनदा फवारणी करावी. पहिली फवारणी फुलोर्याच्या वेळी व दुसरी फळधारणेवेळी करावी.
फळमाशी : फळमाशी फळाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी उबून अळ्या बाहेर पडतात व त्या फळांच्या गरावर हल्ला करतात. प्रादुर्भाव झालेला भाग तांबूस पडतो जसजसा प्रादुर्भाव वाढतो तसा फळाचा रंग बदलून फळ सडते व पक्वतेआधीच गळून पडते. बागेमध्ये उग्र वास येतो व झाडाखाली फळांचा खच आढळून येतो. अळी पडलेल्या फळातून जमिनीत जाऊन कोशात जाते व कोषावस्थेनंतर प्रौढ पुन्हा फळाला प्रादुर्भाव करते.
फायद्याच्या टिप्स : द्राक्षावरील मिलीबग्ज् (पिठ्या ढेकूण)चे असे करा नियंत्रण
नियंत्रण : उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून कोशावस्थेतील कीड नष्ट होईल. बागेमध्ये पडलेली फळे गोळा करून ती जमिनीत गाडून टाकावीत. फळमाशीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसीत केलेला रक्षक सापळा चार या प्रमाणात बागेत लटकत ठेवावेत. मेल्याथिओन किंवा फेन्थिओन एक मिली आणि मळी किंवा गूळ दहा ग्रॅम प्रति लिटर करून किडीच्या नियंत्रणासाठी वापरावे. मेलेथिओन किंवा फेन्थिओन दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. अशा प्रकारे किडीच्या प्रमाणानुसार योग्य ती काळजी घेतल्यास नक्कीच सीताफळ हे पीक किडींपासून बळी पडण्यापासून वाचवले जाऊ शकते व होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
नितीन सुरेश ढोबे मु. पो. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. (मो. 9175980062)
महत्त्वाची गोष्ट : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1