यंदाच्या खरीत हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणत्तापूर्ण बियाणे पुरवा मात्र त्याच्या किंमती वाढवू नका असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी महाबीजला दिले आहेत. विशेष म्हणजे महाबिजने यापुढे भाजीपाला बियाणे निर्मितीमध्येही काम करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप २०२१ हंगामाच्या बियाणे नियोजनाची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. याबैठकीला कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
राज्यातील खरीपाचे क्षेत्र १ कोटी ४१ लाख ९४ हजार हेक्टर असून, भात, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भूईमूग ही प्रमुख पिके घेतली जातात. यासाठी राज्याला १६ लाख ६७ हजार क्विंटल बियाण्याची गरज लागते. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यां यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हे बियाणे पुरविले जाते. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र ४२ लाख २२ हजार १६५ हेक्टर आहे. त्यासाठी ३१ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज लागते. सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी, राज्यशासनामार्फत शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत आवाहन केले होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडे स्वत:चे सुमारे २० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी खरीप २०२१ हंगामाचे नियोजन करताना, हेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबत आढावा घेतला. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकींग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा १ एप्रिलपर्यंत तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सोयाबीनपाठोपाठ राज्यात कापसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर असून सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस घेतला जातो. राज्यामध्ये सध्या १ कोटी ६० लाख पाकीट बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याचे, यावेळी सांगण्यात आले. पारंपरिक बियाण्यांसोबतच भाजीपाल्याच्या वाणाकडे महाबीजने लक्ष द्यावे. पालेभाज्या बियाणे निर्मितीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावा. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या बीज गुणन केंद्र आणि रोपवाटिकांच्या जागांचा वापर करावा, असे निर्देशही कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले.
गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेऊन या वर्षी बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रार येणार नाही. बियाण्यांची कमतरता न भासता वाजवी दरात ते शेतकऱ्यांला मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.