पाण्याची कमतरता हा शेतकर्यांना भेडसावणारा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे फळबागेत शेवग्याचे अंतरपिक घेण्याचा उत्तम पर्याय आहे. फळबागेत शेवग्याचे अंतरपीक केल्यामुळे कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे आणि खात्रीशीर उत्पन्न मिळते. कमी खर्च व कमी पाणी व्यवस्थापनाने शेवग्यापासून भरपूर उत्पादन घेणे हे शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पीकेएम 2 वाणाची वैशिष्ट्ये : वर्षातून दोन वेळा बहार येत असल्याने शेंगांना बाजारभाव चांगला मिळतो. लागवड केल्यापासून सहा महिन्यात शेंगा तोडणीस येतात. प्रत्येक झाडास सुमारे वर्षामध्ये 200 ते 760 शेंगा येतात. प्रत्येक झाडास 35 ते 45 किलोपर्यंत उत्पादन वर्षामध्ये मिळते. शेंगाची लांबी एक ते दीड फुट असते व जाडी मध्यम असून भारदार असतात. चवही उत्तम आहे. शेंगा गर्द हिरव्या, चमकदार, मासाळू चवदार असल्याने ग्राहक आकर्षित होतात. कोरडवाहू, हलक्या माळरान डोंगर उतारावरही पीक चांगले येते. कमी पाण्यात शेवगा पीक चांगले येते. रोग व किडींचा उपद्रव कमी असल्याने खर्च कमी येतो. ही जात बहुवर्षीक आहे. पाऊस कमी असल्यास शेवग्याचे वर्षातून दोनदा पीक घेता येते. इतर फळबागामध्ये शेवगा अंतरपिक म्हणून घेता येते. उत्तम लागवडीसाठी कोईमतूर एक व दोन (सुधारीत) जाती आहेत.
व्यवस्थापन : शेवगा लागवडीसाठी जमीन हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी असावी लागते. तशी जमीन माझ्याकडे उपलब्ध होती. भारी व काळ्या जमिनीत शेवग्याची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते. हे माहीत होते. तसेच पाण्याचे उत्तम व्यवस्थापन केल्यास व अांतरपिके घेतल्यास भारी जमिनीत पण शेंगाचे उत्पादन चांगले मिळते असा काही शेवगा उत्पादकांचा अनुभव आहे.
हवामान : शेवग्याच्या उत्तम वाढीसाठी समशितोष्ण व कोरडे हवामान, 25 ते 35 डिग्री से.मी. तापमान हवे असते मात्र महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या हवामानात शेवगा लागवड करता येते. शेवग्याचा हंगाम बिगर मोसमी, बिगर हंगामी, बारामाही असा आहे. त्यामुळे केव्हाही शेवग्याची लागवड करता येते.
लागवड : बाग लावण्यासाठी योग्य अंतर खालीलप्रमाणे : 12 बाय 12 फुट अंतरासाठी 300 रोपे किंवा एकर, 10 बाय 10 फुट अंतरासाठी 450 रोपे किंवा एकर सर्या पाडून खड्डे न घेता लागवड करावी. मधल्या सर्यांत आंतरपिके घ्यावीत. आम्ही 15 बाय 15 सिताफळाच्या मध्ये शेवग्याचे एक झाड या प्रमाणे लागवड केली आहे.
अभिवृद्धी : शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून केली जाते. फाटे कलमापेक्षा ‘बी’पासून, रोपापासून लागवड करणे फायद्याचे ठरते. असा माझा अनुभव आहे.
बिजप्रक्रिया : गाईचे शेण एक भाग अधिक तीन भाग पाणी यांची रबडी करून त्यामध्ये ‘बी’ एक दिवस, 24 तास भिजत ठेवावे व नंतर सावलीत सुकवून रोप बनविण्यासाठी पिशवीत अगर बाग करण्याच्या शेतात फक्त एक ते दोन सें.मी. किंवा एक इंच खोल पुरावे. जास्त खोल किंवा ‘बी’ उघडा राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी झारीनेच द्यावे त्यामुळे ‘बी’ हलणार नाही. ‘बी’ पासून रोप तयार करण्यासाठी चार बाय सहा इंच प्लॅस्टिक पिशव्या वापराव्यात. पिशव्यांना सहा मी.मी. पोगरने होल पाडावीत. पिशव्यामध्ये पोयटामाती, बागेतील माती व कुजलेले शेणखत यांचे समप्रमाणात मिश्रण भरावे. पिशवीमध्ये लावलेले ‘बी’ 25 ते 30 दिवसांत लागवडीयोग्य होतात.
पाणी व्यवस्थापन : शेवगा हे पीक कोरडवाहू असले तरी जास्त उत्पादनासाठी पाणी देणे गरजेचे आहे. हलक्या जमिनीत सहा ते सात दिवसांनी तर भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. फुले आल्यानंतर पाण्याच्या पातळीत अंतर वाढवावे. जास्त फुलगळ झाल्यास पाणी देणे थांबवावे.
हेही वाचा :
शेवग्यापासून बनवा आरोग्यदायी प्रक्रियायुक्त पदार्थ
वांगी पिकाचे असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
जाणून घ्या टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान !
उन्हाळी काकडी लागवडीतून मिळवा फायदाच फायदा !
खते : फक्त सेंद्रिय खते वापरावीत म्हणजे शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, जीवामृत व इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून रासायनिक खते टाळावीत.
छाटणी : शेवग्याचे झाड झपाट्याने वाढते. निलगिरीच्या झाडासारखे सरळच उंच वाढत जाते. म्हणून झाड तीन फुट उंच झाले की वरून एक फुट शेंडा मारावा. अशी छाटणी केल्यास त्यास खालच्या बाजुने चोहीकडून फुटवे, फांदा येतात. हे फुटवे, फांद्या मुळ खोडापासून तीन फुट लांब झाल्यानंतर शेंड्याकडून 15 ते 20 सें. मी. अंतरावरून कट कराव्यात. कट मारताना फांद्या, खोड दुंभगणार नाही, याची काळजी घ्यावी. छाटणीमुळे फांद्यात वाढ होते व झाड डेरेदार होते. परिणामी उत्पादन वाढते. छाटणी न केल्यास 75 टक्के उत्पादन घटते. दोन बहाराच्या शेंगा काढल्यानंतर छाटणीकरीता मुळ झाड जमिनीपासून फक्त दोन ते अडीच फुट अंतरावर कापून टाकावे व लगेच अंतर मशागत करावी. अशा छाटणीमुळे उत्पादनात वाढ झाल्याचा माझा अनुभव आहे. झाडाच्या बुंध्याजवळची माती दोन ते तीन महिन्यांनी हलवून भुसभुशीत करावी व त्याच वेळी खत पसरून टाकावे.
राजाभाऊ देशमुख, बार्शी, जि. सोलापूर (मोबा. 9423042400)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा