राज्यात जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने मात्र जुलैमध्ये चांगलाच जोर वाढवला. संततधार पावसाने अक्षरशा शेतकऱ्यांबरोबरच सर्वांचीच धांदल उडवून दिली. राज्यात झालेल्या या अतिरिक्त पावसामुळे 3 लाख 1 हजार 498 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास नुकसानित वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
राज्यातील जवळपास सर्वंच जिल्ह्यात जुलै महिन्यात पहिल्या 15 दिवसात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बहूतांश सर्वंच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर विभागात सरासरी 75.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. विदर्भात नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट होत आहे. या जोरदार व संततधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, मूग, उडिद, ज्वारी, भात, ऊस, केळी, संत्रा, हळद आदी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ब्रेकिंग न्यूज : जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात जवळपास 74 हजार हेक्टर तर नांदेड जिल्ह्यात 36 हजार हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातही 27 हजार हेक्टरवरील पिके बाधीत झाल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट झाले आहे.

जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक ठिकाणी पुरामुळे जमीन खरडून गेली आहे. राज्यातील 1679 हेक्टरवरील जमीन खरडून गेल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. यात सर्वाधिक 1249 हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. तर 195 हेक्टर नांदेड जिल्ह्यातील तर यवतमाळमध्ये 142 हेक्टर आणि नागपूर जिल्ह्यात 58 हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे.
महत्त्वाचा सल्ला : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का द्यावा ? : नितीन गडकरी यांचा सवाल
राज्यात आत्तापर्यंत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. 42 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी सुरूवातीला केलेल्या पेरण्या अति पावसामुळे वाया गेल्या आहेत. तिथे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. पिकापेक्षा तण जास्त वाढले आहे. मजुरीचा व तणनाशकांचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पाऊस सतत चालू असल्यामुळे मशागतीसाठी वाफसा मिळत नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या आहेत. त्यामुळे रोपे लहान आहेत. सततच्या पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मान्सून अपडेट : राज्यात पुन्हा 4 ते 5 दिवस पाऊस मुक्कमी
अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यावरही लवकर वापसा येण्याची चिन्हे दिसत नाहीत. चिबड शेतजमिनीत तर पाणी साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी दुबार पेरणीही करणे अवघड आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची वेळ येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे पुरवावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1