पेरूच्या अधिक व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र खते देण्यापूर्वी मातीच्या प्रत्येक थराचे परिक्षण करून घ्यावे. फळझाडास वयोमानानुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात. जमिनीत निचरा कमी असल्यास किंवा हलकी असल्यास झाडांना ठिबकाद्वारे पाण्याचे नियोजन करावे. खताचे व्यवस्थापन व्यवस्थित झाल्यास उत्पादनात फरक पडतो.
भारत देश हा कृषीप्रधान राष्ट्र असले तरी जागतिकीकरणाच्या वाहत्या वार्यांमध्ये केवळ परंपरागत जमीन कसण्यापेक्षा शेतीमध्ये विविध नविन पद्धतीच्या उपाययोजना करण्याची मानसिकता शेतकर्यांमध्ये निर्माण झाली, यातूनच हरितगृहांचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे जलव्यवस्थापन, फळबाग लागवड, यंत्राद्वारे शेती मशागत, घन पद्धत लागवडीसारख्या विविध पद्धती समोर आल्या.
वाढत्या जागतिकीकरणाच्या वाहत्या वार्यामध्ये भारत देशाच्या उत्पादकतेत तोलामोलाची भुमिका बजावणारे महाराष्ट्र देखील मागे राहिला नाही. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाफार्मत राज्यात रोजगार हमी योजनेशी संबंधीत फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 1990-91 पासून मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरवात झाली आणि तेव्हापासून फळबागाखालील क्षेत्रात 300 ते 400 टक्के इतकी वाढ झाली असून सध्या स्थितीत राज्यात 15 लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आले असून, त्यापासून सुमारे 13.5 दशलक्ष टन उत्पादन प्राप्त होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा, संत्री, काजू, द्राक्ष व चिकू यांचा वाटा अंतर्भूत आहे. परंतु फलोत्पादनासोबतच त्यावर आधारित फळप्रक्रिया उद्योग जोमाने वाढून प्रगती पथावर मार्गक्रमाण करत आहेत. केवळ, पिकलेली फळे सेवन न करता त्यापासून निर्मित जॅम, जेली, चॉकलेटस् खाद्यपदार्थ सेवन करण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसतो आहे. याकरिता पेरू फळ पिकास असल्याने शेतकरी वर्ग पेरू फळबागा लागवड करताना दिसतात. याच अनुषंगाने पेरू फळझाडांचे खतांचे व्यवस्थापन संतुलित केल्यास उत्पादनात भरीव वाढ दिसून येईल.
जमिनीची निवड : पेरू फळबाग लागवडीसाठी हलकी ते मध्यम खोल उत्तम निचर्याची किंवा पोयट्याची जमीन निवडावी. जमिनीतील मातीच्या खालील तीन फुटाच्या आतील मुरमात चुनखडीचे थर नसावेत. माती प्रत्येक थराचे परिक्षण करून घ्यावे. मातीचा सामु सात ते आठ पर्यांत असावा. क्षारतेचे प्रमाण 0.20 ते 0.40 डेसी सायमन प्रती मिटरपर्यंत असावे.
खत व्यवस्थापन : पेरू फळझाडास वयोमानानुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात. जमिनीत निचरा कमी असल्यास किंवा हलकी असल्यास झाडांना ठिबकाद्वारे पाण्याचे नियोजन करावे. भारी जमिनीतील पावसाळ्यात चर काढून अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा. पेरूच्या पूर्ण वाढलेल्या झाडांच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण 1.63 ते 1.96 टक्के, स्फुरद 0.18 ते 0.24 टक्के पालाश 1.31 ते 1.71 टक्के कॅल्शियम 0.67 ते 0.83 टक्के मॅग्नेशियम 0.52 ते 0.65 टक्के लोह 100 ते 500 मिलीग्रॅम/किलो जस्त 25 ते 1650 मिलीग्रॅम/किलो, बोरॉन 10 ते 200 मिलीग्रॅम/किलो कॉपर 5 ते 30 मिलीग्रॅम/किलो प्रमाण असते. यावरून आपण पेरू झाडासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. पानाचे तपासणीसाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडाभोवतालची शेंड्याकडील फांदीमधील 50 ते 60 दिवसांची जुनी तिसरी अथवा चौथी पानाची जोडी जुलै महिन्यात घ्यावी आणि पृथ:करण करून कमतरतेनुसार शिफारस खत मात्रेत बदल करावा.
खते देण्याची पद्धत : झाडांच्या वाढीच्या अवस्थेत पहिली चार वर्षे नत्र, स्फुरद व पालाशाची मात्रा जुन महिन्यामध्ये शेणखताबरोबर दुपारची झाडाची सावली ज्या ठिकाणी पडते ती सीमा धरून त्याच्या आतल्या बाजूने चाळणी करून 9 इंच चाझाडाभोवती गोल चर करून खते द्यावीत व नंतर मातीने झाकून घ्यावीत. ताण अवस्थेत गळालेली पाने अळ्यामध्येच मातीआड करावी म्हणजे पाने कुजल्यानंतर सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढविण्यास मदत होते. अन्नद्रव्यांपैकी एकूण नत्राच्या 30 टक्के नत्र सप्टेंबरमध्ये व उरलेले 40 टक्के नत्र फेब्रुवारी महिन्यात झाडांची वाढ होण्यासाठी पहिले चार वर्षे विभागून द्यावेत. उर्वरित स्फुरद व पालाश मात्रा जून महिन्यातच पावसाळ्यापूर्वी द्यावे. पेरूच्या पूर्ण वाढलेल्या झाडास प्रत्येकी 900 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 300 ग्रॅम पालाशची मात्रा बहाराच्या वेळी जुन महिन्यात शेणखताबरोबर द्यावे व उरलेले निम्मे नत्र फळधारणेनंतर द्यावे.
जास्त निचर्यांच्या जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम गंधकाचे प्रमाण कमी असते. तेव्हा अशा जमिनीत भुसुधारक जिप्सम दोन किलो हे पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास आणि 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति झाड दिल्यास पेरू फुगवणीस व उत्पादनात वाढ होते.
सुक्ष्य अन्नद्रव्यांचा वापर : जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे जस्त, लोह, बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येऊ शकते. कारण जमिनीमधील कर्बाचे कमी झालेले प्रमाण, वाढलेली चुनखडीचे प्रमाण व मुख्य अन्नद्रव्यांचे असंतुलित वापर यामुळे सुक्ष्य अन्नद्रव्यांची कमतरता येऊन थंडीच्या हंगामात फळवाढीच्या अवस्थेत पाने लालसर रंगाची होऊन फळ वाढीवर व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी विशेषत: नत्र, स्फुरद तसेच जस्त हे अन्नद्रव्यांचे कमतेनुसार संतुलित वापर केल्यास व अती पाण्याचा वापर केल्यास पाने, लाल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
माती परिक्षणाची गरज : माती परिक्षणामुळे जस्त सुक्ष्म अन्नद्रव्यांचे कमतरता मातीमध्ये (0.6 मिली ग्रॅम प्रति किलो पेक्षा कमी) असल्यास बहाराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 70 ग्रॅम झिंक सल्फेट प्रती झाड याप्रमाणे द्यावे. तसेच लोहाची कमतरता असल्यास पानांच्या शिरा हिरव्या राहतात व मधील भाग पिवळा पडतो. मातीमध्ये शिरा हिरव्या राहतात व मधील भाग पिवळा पडतो. मातीमध्ये लोहाची कमतरता असल्यास (4.5 मिलीग्रॅम प्रती किलो पेक्षा कमी) असल्यास बहाराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 80 ग्रॅम फेरस सल्फेटचा प्रति झाड वापर करावा. हलक्या जमिनीत बोरॉनची सुद्धा कमतरता येऊ शकते. (0.5 मिली ग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी) त्यासाठी 15 ग्रॅम बोरॅक्स प्रति झाड प्रमाणे बहराच्या वेळी द्यावे.
सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाडांच्या पानावर येते अशा वेळी जमिनीतून कमतरतेनुसार केल्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी 0.1 टक्के चिलेटेड झिंक (1 ग्रॅम प्रती लिटर पाणी) ची फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. तसेच लोहाची कमतरता पडून पाने पिवळी पडल्यास 0.15 टक्के चिलेटेड लोहाची फवारणी करावी. (1.5 ग्रॅम प्रती लिटर पाणी) ही फवारणी फुलोर्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. तसेच बोरॉनची कमतरता असल्यास 0.2 ते 0.3 टक्के बोरीक अॅसिड (2 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी दोन ते चार ते पाच टी हे 70 पीपीएम (7 ग्रॅम/100 लिटर पाणी) या संजीवकांची फवारणी करावी. अशा पद्धतीने पेरू फळझाडाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि माती परिक्षणानुसार शिफारशीप्रमाणे वेळेवर खत द्यावीत. योग्य बहार धरावा व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
श्रीमती शुभांगी कदम / डॉ. अनिल दुरगुडे मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर.