गोडया पाण्यातील कोळंबीच्या जवळ जवळ 100 जाती आहेत. त्यापैकी महाकोळंबी अथवा पोशा कोळंबी (मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी) ही आकाराने इतर सर्व जातीपेक्षा मोठी असल्याने तिला महाझिंगा किंवा जंबो कोळंबी (जाएंट प्राॅन) असे म्हणतात.
या कोळंबीमध्ये विविध प्रकारचे अन्न ग्रहण करणे, नैसर्गिक प्रतिकारशक्ती, गोडया तसेच कमी क्षारतेच्या पाण्यात चांगली वाढ होणे, वातावरणात होणारे बदल सहन करणे, जलद वाढ होणे, उच्च पौष्टिकता, स्थानिक व परकीय बाजारपेठांत मोठया प्रमाणावर मागणी व चांगला बाजारभाव इत्यादी प्रकारचे संवर्धनास आवश्यक सर्व गुणधर्म आढळतात. यामुळे तसेच बिजउत्पादनाचे तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे ‘पोशा कोळंबीची शेती’ अलीकडील काळात बरीच लोकप्रिय होत आहे.
कोळंबीच्या बीजाची उपलब्धता.
पोशा कोळंबीचे बिज दोन प्रकारे उपलब्ध होऊ शकते. एक म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले बिज खाडीमधून जमा करणे व दुसरे म्हणजे बिज निर्मिती केंद्रावरून उपलब्ध करणे.
नैसर्गिक अवस्थेतील बीजाची उपलब्धता ही मर्यादित असते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातच कोळंबीच्या पिलांची निमखा-या पाण्यातून गोडया पाण्याकडे स्थलांतरीत होतांना नदीच्या मुखाजवळ जाळयाव्दारे पकडले जातात. अशाप्रकारे पकडलेले बीज हे फक्त पोशा कोळंबीचेच असेल याची शाश्वती नसते. या बीजामध्ये एकापेक्षा अनेक प्रकारच्या कोळंबीचे बीज असते व ते फारच लहान आकाराचे असल्याकारणाने ओळखणे सुध्दा अवघड असते. यासोबतच अशाप्रकारचे बीज हे रोगट व वेगवेगळया आकाराचे असल्यामुळे वाहतुकीच्या दरम्यान या बीजांची मोठया प्रमाणावर मरतुक होते. अलीकडील काळात कोळंबी शेती लोकप्रिय होऊ लागल्यामुळे बीजांची मागणी झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक बीजाची उपलब्धता फारच तोकडी पडत आहे.
नैसर्गिक बीजाची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये पालघर जवळील वाडा या गावामधून तसेच रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्हयामध्ये काही ठिकाणी होऊ शकते. गुजरात राज्यामधील भडोच या ठिकाणी सुध्दा फार मोठया प्रमाणावर नैसर्गिक बीजाची बाजारपेठ आहे. वरील काही अडचणीमुळे नैसर्गिक बीजापेक्षा बीजनिर्मीती केंद्रावरच (हॅचरी) निर्मित बीजाचा वापर कोळंबी संवर्धनासाठी करावा. याप्रकारचे बीज हे एकाच आकाराचे व प्रकारचे असते व या बीजाच्या निर्मिती दरम्यान अतिशय काटेकोरपणे काळजी घेतल्या कारणाने हे बीज रोगमुक्त असते.
सदृढ व निरोगी बीज ओळखण्याची काही लक्षणे.
बीजाचा चपळपणा : जोरात पोहणे, एकत्र न राहणे, टाकीच्या पृष्ठभागावर समप्रमाणात विभागून राहणे, टाकीवर हाताने मारले असता एकदम सावधान होणे, पोहण्याची दिशा ही पाण्याच्या प्रवाहाविरूध्द असणे.
बीजांचा रंग : बीजांचा रंग काळपट तपकीरी असावा. शरीराच्या दोन्ही बाजूस समांतर वाढलेल्या काळया पट्टया दिसणे व बीजाची थोडी वाढ झाल्यावर बीजाच्या डोक्यावरील सोंडेसारख्या भागाचे टोक गुलाबी होते. ही निरोगी बीजाची लक्षणे आहेत. जर बीजाच्या शरीरावर पांढरे डाग असल्यास ती रोगी बीजाची लक्षणे आहेत. अशा बीजास त्वरित नष्ट करावे.
खाद्य : दिलेले खाद्य लवकर खाणे ही निरोगी बीजांची लक्षणे आहेत. जर बीज दिलेले अन्न लवकर खात नसेल तर असे बीज रोगट असण्याची शक्यता जास्त असते.
डॉ. रविंद्र एल. काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मत्स्यतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम, मो. 7350205746
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा