तूर पीक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असले तरी तुरीकडे दुय्यम दर्जाचे कडधान्य पीक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन, बीजप्रक्रियेचा अभाव, जिवाणूसंवर्धन खतांचा अभाव, पारंपारिक पद्धतीने लागवड या कारणांमुळे राज्यातील तुरीचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन याचा विचार करता तुरीचे एकरी उत्पादन कमी आहे. सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान वापरून तुरीचे उत्पादन वाढविणे गरजचे आहे.
तूर हे खरीप हंगामातील हे अत्यंत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. तुरीतून मिळणारी प्रथिने हा मानवी आहारामधील सकस व महत्त्वाचा घटक आहे. विविध पीक पद्धतीत तूरीच्या पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत टिकून राहतो व या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने त्याची नत्राची फार मोठी गरज परस्पर भागविली जाते. शेतीसाठी आणि मानवी आरोग्यासाठीही तुरीची गरज जास्त असून ही गरज वरचेवर वाढत आहे.
कमी उत्पादनाची कारणे : तूर पिकाची लागवड मुख्यत: कोरडवाहू व हलक्या जमिनीवर घेण्यात येते. किडी व रोगांना बळी पडणार्या स्थानिक वाणांची लागवड सर्रास ठिकाणी केली जाते. शिवाय पारंपारिक मशागत पद्धतीचा वापर, शिफारस केलेल्या खतांची मात्रा, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. कडधान्य म्हणून तूर पिकाकडे दुय्यम दर्जाचे पीक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन, बीजप्रक्रियेचा अभाव, जिवाणूसंवर्धन खतांचा अभाव आणि पारंपारिक पद्धतीनेच तूर पिकांची लागवड करणे, या सर्व कारणांमुळे तूर या पिकाची उत्पादकता वाढत नाही.
जमीन : तूर पिकासाठी मध्यम ते भारी (३० ते ४५ सें. मी. खोली) असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. क्षारयुक्तव आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूच्या गाठींची योग्य वाढ होत नसल्याने रोपे पिवळी पडतात. म्हणून साधारणत : जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
हवामान : तूर या पिकास (२१ ते २५ सें. ग्रे.) उष्ण हवामान मानवते. तसेच कमीत कमी दहा सें. ग्रे. तापमान आणि उष्ण हवामानातसुद्धा तूरीचे काही वाण चांगले येतात. वार्षिक सरासरी ७०० ते एक हजार मि. मी. पर्जन्यमान असणार्या भागात हे पीक उत्तम येते. मात्र पेरणीनंतर पहिल्या एक ते दीड महिण्याच्या कालावधीत नियमित पाऊस असणे गरजेचे आहे. तसेच पीक फुलोर्यात व शेंगा पक्व होत असताना प्रखर सुर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे.
पूर्वमशागत : तूर हे पीक मध्यम ते भारी जमिनीत घेत असल्याने जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुसीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा वेचून घेऊन कुळवाची उभी आडवी पाळी घालावी म्हणजे जमीन भुसभुशीत पेरणी योग्य होईल. खोल नांगरट केल्याने तसेच जमीन उन्हाळ्यात तापल्याने मर रोगास करणीभूत ठरणार्या आणि इतर बुरशी, जीवणू आणि किटकांचा काही अंशी नाश होण्यास मदत होते.
सुधारीत जाती : लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी. प्रामुख्याने आपल्या भागात येणार्या वाणाला प्राधान्य द्यावे. बी.डी.एन-१, बी.डी.एन-२, टी. विशाखा-१, आ.सी.पी.एल-८७ (प्रगती), आ.सी.पी.एल-१५१ (जागृती), आ.सी.पी.एल.८७११९, बी.एस.एम.आर-७३६, बी.एस.एम.आर-१७५, बी.एस.एम.आर-१७५, बी.एस.एम.आर ८५३ (आशादायक वाण), ए.के.टी.८८११ आदी वाणांची निवड करावी.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास १.५ ग्रॅम थायरम अथवा कॅपटन चोळावे. त्यामुळे उगवण चांगली होऊन पीक जोमदार वाढते. जमिनीतील रोगकारक बुरशी पासून रोपअवास्थेत पिकाला संरक्षण मिळते.
जीवाणूसंवर्धनाचा वापर : बुरशीनाशकांच्या प्रक्रियेनंतर पेरणीपूर्वी १० ते १५ किलो बियाण्यास २५० ग्रॅम जीवाणूसंवर्धन (चवळी गटातील) गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. त्यामुळे मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो. त्यामुळे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी वाढते. विशेषत: जमिनीचा पोत सुधारतो. पिकामध्ये जीवाणूंनी सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रासायनिक, नत्र खतामध्ये १५ ते २० टक्के बचत होते.
पेरणी : मान्सूनचा पाऊस पेरणीयोग्य झाल्यानंतर जमिनीत वापसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवाडा या दरम्यान करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ६० सें. मी. व दोन रोपातील अंतर ३० सें. मी. ठेवणे योग्य ठरते. पेरणी करताना बियाणे जमिनीत चार ते पाच सें. मी. खोल पडेल अशा प्रकारे पेरणी करावी. पेरणीसाठी दर हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे होते. तसेच बी. एस. एम. आर ७३६ या वाणाची लागवड ओलिताखाली करावयाची असल्यास दोन ओळीतील अंतर ९० सें. मी. व दोन रोपातील अंतर ९० सेमी. ठेवून पेरणी टोकण पद्धतीने करावी व यासाठी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे होते.
खत व्यवस्थापन : पेरणीपूर्वी शेवटच्या कुळवणीच्यावेळी दर हेक्टरी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच तूर या पिकास २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद ही पोषणद्रव्ये मिळतील, अशी अन्नद्रव्य डायअमोनियम फास्फेट मधून दिली तर चांगला प्रतिसाद मिळतो. हे खत पेरणी किंवा लागवडीच्या वेळेस प्रति हेक्टरी द्यावे.
आंतरमशामत : साधारणपणे पेरणीपासून ३० ते ४५ दिवसापर्यंत पीक तणविरहित ठेवल्यास उत्पादनात वाढ होते. त्यासाठी पीक २० ते २५ दिवसाचे असताना कोळप्याच्या सहाय्याने पहिली आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वापश्यावर करावी. मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणीपूर्वी फ्लूक्लोरॅलिन हे तणनाशक प्रति हेक्टरी दीड लिटर एक हजार लिटर पाण्यातून जमिनीवरून फवारून कुळवाची पाळी घालावी, म्हणजे जमिनीत चांगले मिसळून तण उगवण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
उत्पादन : अशाप्रकारे पूर्वमशागतीपासून काढणीपयर्ंत काळजी घेतल्यास तूरीच्या सलग पिकापासून १६ ते १८ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते व बागायत सलग पिकापासून २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने मागील सात ते आठ वर्षापासून घेतलेल्या अद्यरेखा प्रात्यक्षिकामधीन असे निष्पन्न झाले आहे कि, तूरीचे पीक फुलाच्या अवस्थेत व शेंगा भरण्याच्या कालावधीत पाण्याच्या दोन पाळ्या दिल्यास उत्पादनामध्ये दीड ते दोन पट वाढ होते.
डॉ. लालासाहेब तांबडे, केंद्र समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर. (मोबा. ९४२२६४८३९)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा