Agricultural Products Guaranteed Price : शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी मुंडे यांनी ही घोषणा केली.
नक्की वाचा : जळगाव जिल्ह्यात 628 शेतकऱ्यांना बोगस खताचा फटका
या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण करून त्यामार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येईल. ऊर्जा, महसूल, पशु संवर्धन, सामाजिक न्याय आदी विभागांशी निगडित मागण्यांच्या संदर्भात संबंधित विभागांशी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.
मोठा निर्णय : कृषी शिक्षण प्रवेश प्रक्रिया आता अभियांत्रिकी प्रमाणे होणार !
ऊसतोड कामगारांबरोबरच वाहतूकदार यांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामध्ये समावेश करणे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या संदर्भात विशेष सहाय्य विभागाशी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन तेही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली.

या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड तसेच संघटनेचे राजू पाटील , संदीप गिड्डे पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केले. तसेच सरकारने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.
मोठी बातमी : राज्यात 817 कोटी एफआरपी थकीत : 9 कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03