संजीवन शेती ही आगळीवेगळी, सकारात्मक आणि प्रचलित शेतीपद्धतीपेक्षा वेगळी आहे, ही विचारपद्धती काय आहे हे समजून घेतल्यास शेतकर्यांचा नक्की फायदा होईल असे अनेक प्रयोगातून निदर्शनास आले आहे.
सुप्रसिद्ध शस्त्रज्ञ चार्ल्स डार्विन प्रमाणे सर्व जीव जंतूचा उद्भव व उत्क्रांती आणि त्यांचे एकमेकांवर अवलंबून असने हे आपनाला निसर्गाकडून अगदी साध्या, सोप्या गोष्टींमधून शिकायला मिळते. अगदी साधे उदाहरण घेऊ. पूर्वी डी.डी.टी.ने मुंग्या मरत, पण नंतरच्या काळात त्या मरेनाशा झाल्या. मग डी.डी.टी.ला पुरून उरणारी प्रजाती कशी निर्माण झाली? हा बदल कोणी घडवून आणला? कारण निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार दिला आहे. वनस्पतींमध्येही ही स्वसंरक्षणाची प्रक्रिया निसर्गाने दिली आहे. मग या झाडातील नैसर्गिक स्वसंरक्षणाची प्रक्रिया वापरून का घ्यायची नाही, असा विचार बर्याच अभ्यासकाच्या मनात आला आणि त्या दृष्टीने पीक संरक्षणाचे उपाय शोधण्यास सुरुवात झाली.
पिकाच्या संरक्षणाचा विचार करण्याआधी पिकावर रोग, कीड का येते याचा शोध घेणे सुरू झाले तेव्हा असे लक्षात आले, की निसर्ग सगळ्यांना समान वागणूक देत असतो. किड्यांना, जंतूंना त्यांचे अन्न शोधण्यासाठी विशेष ज्ञानेंद्रिये दिलेली असतात. डास जसे उच्छ्वासातल्या कार्बन-डाय-ऑक्साइडमुळे माणसांकडे आकर्षित होतात, तसेच झाडावर वाढणार्या किडींना त्यांच्या सेन्सर्समुळे कोणत्या झाडावर आपल्याला अन्न मिळेल, आपली वाढ कोणत्या झाडावर चांगली होईल याचे ज्ञानही होत असते.
झाडातली स्वसंरक्षणाची प्रक्रिया सशक्त केली तर काय फायदे होणार, तर किडी, रोग, जंतू मारण्यात जे पैसे खर्च होतात त्याचे प्रमाण कमी होईल. त्यातले विषारी अंश कमी होतील. जमीन, पाणी, हवा यांचे प्रदूषण कमी होईल. झाडांचे पोषण चांगले झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल. विषमुक्त अन्न तयार होईल ते खाल्ल्यामुळे सर्वांचेच आरोग्य सुधारायला मदत होईल. तुमच्या शेतातली काही झाडे निरोगी असतात तर काही किडीने ग्रस्त असतात. मग हे असे का होते याचा शोध घेणे सुरू झाले.
हवामानात सतत होणारे बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे असे लक्षात आले. बाहेरच्या हवामानातल्या बदलाप्रमाणे झाड आपल्या आतल्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणत असते. या बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत झाडाची बरीच ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा वापरली गेल्यामुळे झाडातल्या ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो आणि झाड किडीला निमंत्रण देते.
झाडातल्या ऊर्जेचा असमतोल होण्याची कारणे पाहिली, समजली की त्यावर उपाय करणेही सोपे होईल व त्यातून कीडरोग नियंत्रण करणे सोपे होईल असे लक्षात आले.
झाडावर येणारे ताण :
1) पाण्याचा अभाव किंवा अति पाणी, दुष्काळ किंवा ओला दुष्काळ.
2) त्या त्या ऋतूंमध्ये आवश्यक असणारे हवामान नसणे, म्हणजेच उन्हाळ्यात पावसाळी हवा, पावसाळ्यात ऊन, थंडीत उन्हाळा, याप्रमाणे विपरीत हवामान. अति ऊन, अति पाऊस, अति थंडी.
3) खतांचा ताण : खताचा अतिरेक किंवा अभाव. चुकीच्या वेळी चुकीचे खत. नत्रयुक्त खतांचाच वापर केल्याने लुसलुशीत कोवळी पाने किडीला निमंत्रण देताना दिसतात.
4) रासायनिक घटक-कीटकनाशके-बुरशीनाशकांचा अतिवापर अशा अनेकविध ताणांचा परिणाम झाड सहन करत करत तुम्हाला उत्पादन देत असते. मग अशा ताणातून जर झाड मुक्त झाले तर ते उत्पादनात किती वाढ करून देईल याचा विचार करा.
झाडाचे ताण कसे कमी करता येतील याचा विचार सुरू झाला. तहान लागल्यावर विहीर खणण्यात उपयोग नाही. सुरुवातीपासून झाडाचे, पिकाचे पोषण चांगल्या, सोप्या पद्धतीने करता आले तर झाड कोणतेही ताण सहन करण्यास सक्षम होईल. झाडातली ऊर्जा संतुलित झाली की झाड रोग, कीडींना निमंत्रण देणार नाही आणि पीक किडींपासून सुरक्षित राहील अशी ‘वसुमित्र’ची मूलभूत संकल्पना आहे.
पिकाचे पोषण पहिल्यापासून उत्तम झाले की दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे किडीवर लवकर नियंत्रण येते आणि उत्पादनातही वाढ होते. झाडाच्या पोषणप्रक्रियेत एन, पिके आणि सूक्ष्म अन्नघटक यांचा जेवढा सहभाग आहे तितकाच सहभाग सिलिका व कार्बन यांचा आहे हे विविध प्रयोगातून लक्षात आले. पीक संरक्षणाच्या कार्यक्रमात तर त्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होत आहे हेही लक्षात आले.
पीक संरक्षणात सिलिकाचा सहभाग : ताण : मागे आपण पाहिलेले ताणांचे जे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारच्या ताणांमध्ये सिलिकाकडून झाडाचे संरक्षण केले जाते. मातीत सिलिका असतेच, झाडाने ते उचलून घेणे गरजेचे असते. प्रत्येक पिकाची सिलिकाची गरज वेगळी असते. योग्य प्रमाणात झाडाने सिलिका उचलून घेतले असेल तर झाड कोणत्याही ताणाला योग्य प्रकारे तोंड देण्यास समर्थ होते, बाहेरच्या वातावरणातले चढ-उतार सहन करण्याची क्षमता झाडात येते.
गवतवर्गीय पिके : या वर्गातल्या वनस्पतींची खोडे कमकुवत असतात. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. उसासारख्या पिकात लोकरी मावासारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सिलिका योग्य प्रमाणात या पिकांमध्ये असेल तर खोडकिडा किंवा लोकरी मावासारखा आजार होणे टळते.
वेलवर्गीय पिके : भोपळा, कलिंगडासारख्या वेलवर्गीय पिकांची खोडे ही नाजूक असतात. रसशोषक किडींपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या पानावर व खोडावर लव असते. ही झाडाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही लव सिलिकामुळे कडक होते. ती कडक झाल्यामुळे रसशोषक कीड पानांपर्यंत वा खोडापर्यंत पोहोचू शकत नाही आणि झाडाचे संरक्षण होते.
सिलिका आणि पाने : कोणत्याही पिकाच्या पानात सिलिका योग्य प्रमाणात साठली असेल तर कोणत्याही प्रकारची बुरशी पानावर आपला जम बसवू शकत नाही. त्यामुळे बुरशीजन्य आजारात सिलिका ढालीप्रमाणे काम करते.
रासायनिक खते : यांचाही पिकावर बर्याचदा ताण येतो. हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने सिलिकाचा उपयोग होतो. थोडक्यात, कोणत्याही प्रकारचा ताण झाडावर आला की त्याने झाडातल्या ऊर्जेचा र्हास होतो. ऊर्जेच्या र्हासामुळे झाड क्षीण होते, त्याची प्रतिकारशक्ती कमी होते व शेवटी झाड कीडरोगाला निमंत्रण देते. हे निमंत्रण टाळायचे असेल तर सिलिका खताचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पीक संरक्षण : पिकाने सुरुवातीपासून सूक्ष्म अन्नद्रव्ये उचलून घेतली असल्यास झाडाची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहते. सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाला सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होतील अशा स्वरूपाची सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण बाजारात उपलब्ध आहेत व त्यांच्या वापरान्याणे रोगप्रतिकारकशक्तीत त्वरेने सुधारणा होते आणि प्रादुर्भाव नियंत्रणात येतो. कोणत्याही कीडरोगनाशक औषधाबरोबर हे फवारल्यास फवारण्यांची संख्या कमी होते असा अनुभव आहे.
कार्बनचा पीक संरक्षणातला सहभाग : पिकाच्या पोषणाच्या, वाढीच्या आणि उत्पादनाच्या संदर्भात कार्बनचा सहभाग महत्त्वाचा आहे. तो फुकट उपलब्ध असल्याने त्याचे महत्त्व समजत नाही. फोटोसिंथेसिस आणि कार्बन यांचा घनिष्ठ संबंध आहे झाडाची कर्बग्रहणाची म्हणजेच फोटो सिंथेसिसची क्रिया अतिउच्च क्षमतेने कशी चालेल यावर संशोधन होतेय.
पीक संरक्षणात झाडाचा कर्ब/नत्र गुणोत्तर योग्य असेल तर कीड येत नाही. नत्राचे झाडातले प्रमाण वाढले की पाने लुसलुशीत होतात आणि अशी लुसलुशीत पाने किडींना खाण्यास सोपी जातात. तेव्हा पीक संरक्षणात झाडाचा कर्ब/नत्र गुणोत्तर प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. कार्बन योग्य प्रमाणात असल्यास काड्या-खोडे मजबूत होतात. झाडाचे संरक्षण उत्तम प्रकारे होते.
पोटॅशचा पीक संरक्षणातला सहभाग : लाल कोबी, भुरी यांसारख्या रोगांना पीक जेव्हा बळी पडते तेव्हा पिकात पोटॅशची कमतरता आहे हे निश्चित समजावे. त्याचप्रमाणे पोटॅश कोणताही ताण सहन करण्यासाठी सिलिकाबरोबर महत्त्वाचे काम करत असते.
फॉस्फेटचा पीक संरक्षणातला सहभाग : निमॅटोड, मूळ कूज, करपा, केवडा हे रोग झाडातल्या फॉस्फेटच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेत जमिनीचे परीक्षण करून त्या नुसार मुल्यद्रव्याचे व्यवस्थापन करावे ज्या मुळे कमी खर्चात पिक संराषण करता येईल व सामान्य जणांचे आरोग्यही विषमुक्त अन्नातून साधता येईल.
डॉ. प्रमोद चिंतकुंटलावार, योगिता देशमुख कृषी महाविद्यालय उदगीर मो. ७३८४८४७१४८