फुलांचा आकार व रचना, भरपूर पाकळ्या, आकर्षक रंग आणि फूल जास्त दिवस टिकून राहण्याची क्षमता या वैशिष्ट्यामुळेच विविध प्रकारच्या सजावटीमध्ये गॅलर्डियाच्या फुलांचा वापर सर्रासपणे केलेला असतो. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकरी या फुली लागवड करीत असतात. गॅलर्डिया फुलपिकाचे शाश्त्रीय नांव गॅलर्डिया फ्लचेला असून कंपोझिटी कुळातील आहे.
पिवळ्या, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेले गॅलर्डियाचे ताटवे बागांची मोहकता वाढवितात. महाराष्ट्रात गॅलर्डियाची लागवडाही प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापून, सांगली, कोल्हापूर, ठाणे व इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणावर केली जाते. गॅलर्डिया हे कणखर, भरपूर उत्पन्न देणारे आणि चांगली मागणी असणारे, फुलपीक असल्यामुळे व्यापारी तत्वावर मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्यास योग्य फुलपीक आहे. शेवंती आणि गॅलर्डियाच्या फुलामध्ये भरपूर साम्य असल्यामुळे शेवंतीला एक पर्याय म्हणूनदेखील गॅलर्डियाकडे पाहिले जाते. गॅलर्डियाची फुले एकेरी किंवा दुहेरी पाकळ्यांची, आकर्षक रंगाची, मोठी आणि टिकाऊ असतात.
हवामान : गॅलर्डिया या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते आणि हे काटक फुलझाड असल्याने याची लागवड वर्षभर केव्हाही करता येते. अतिपर्जन्यवृष्टी व कडाक्याची थंडी या पिकास मानवत नाही. 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान वाढीस उत्तम आहे. हलक्या ते मध्यम जमिनीत गॅलर्डियाची वाढ चांगल्या प्रकारे होते. 5 ते 8 सामू असणारी मध्यम पोयट्याची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. पाणी साचणारी आणि क्षारयुक्त जमीन या पिकास मानवत नाही.
जमीन : गॅलर्डियाचे झाड काटक असल्यामुळे ते हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते व चांगले उत्पादन मिळते. पाण्याचा चांगला निचरा होणा-या सेंद्रिय खतेयुक्त जमिनीतच गॅलर्डियाची सुयोग्य वाढ होते. अत्यंत भारी व निचरा न होणा-या जमिनी या पिकास मानवत नाहीत. शक्यतो मध्यम पोयट्याची साधारणपणे 6.5 ते 7.5 सामू असणारी जमीन प्रथम प्राधान्याने निवडावी.
जाती : गॅलर्डियाच्या जीतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ते म्हणजे पिक्टा आणि लारैन्झियाना पिक्टा या प्रकारामध्ये फुले ही आकाराने मोठी, पण एकेरी पाकळ्याची असतात. ( उदा. इंडियन चीफ रेड, पिक्टा मिक्सड इ.) तर लारैन्झियाना प्रकारात फुले ही मोठी व डबल पाकळ्यांची टपोरी असतात. ( उदा. सनशाईन, गेब्रटी, डबल मिक्सड, डबल ट्रेटा, फिएस्टा, डॅझलर, संगीनी इ. ) गॅलर्डियामध्ये काही जाती आढळतात. गॅलर्डिया अँरिस्टाटा प्रकारात किंवा गॅलर्डिया मॅन्डीलोरा या प्रकारातील जाती बहूवर्शीय असून त्यांना मोठ्या आकाराची पिवळसर केशरी आणि लाल रंगाची फुले येतात. बाजारामध्ये डबल पाकळ्यांच्या पिवळ्या फुलांना जास्त मागणी असते. बहुवर्शीय प्रकारात सनगार्ड, परिअर, डॅझलर रुबी, षेरब्रुक, गोल्बीन इत्यादी जातींचा समावेश आहे. निरनिराळ्या सीड कंपन्यांनी संकरित चांगल्या उत्पादन देणा-या जाती प्रसारीत केलेल्या असून त्यातून जातींची निवड करुन लागवडीस बियाणे वापरावे. बहुवर्शीय जाती 3 वर्षापर्यंत फुलांचे आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पादन देतात.
रोपे तयार करणे : गॅलर्डिया लागवडीसाठी बी पेरुन गादीवाफ्यावर रोपे तयार करुन करता येते. बी हलके असल्यामुळे एक ग्रॅम वजनात सर्व साधारणपणे 700 ते 750 बिया बसतात. प्रतिचौरसमीटर मध्ये 10 ते 15 किलो कुजलेले शेणखत मिसळून 1 मी. रुंद 15 से.मी उंच व सोयीनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक हेक्टर लागवडीसाठी 500 ते 750 ग्रॅम बियाणे पुरेसे होते.
थंडीमध्ये बी- पेरणीपूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवावे. त्यामुळे बी लवकर उगवते. बी गादीवाफ्यावर ओळीमध्ये 10 से.मी. अंतर ठेवून 1 ते 1.25 सेमी. खोल पेरावे. बी पातळ पेरावे. साधारणपणे 100 ते 150 ग्रॅम बी एक हेक्टर लागवडीसाठी पुरेसे ठरते. पेरणीनंतर बी बारीक शेणखत किंवा रेतीने झाकून घ्यावे. झारीने हलके पाणी द्यावे. बी पेरणीनंतर 7 ते 8 दिवसांत रुजते. रोपांना 4 ते 6 पाने आतर सुमारे 3 ते 4 आठवड्यांत रोपे पुनर्लागणीसाठी तयार होतात.
लागवड : रोपांची लागवड ऑक्टोबर, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात केल्यास गॅलर्डियाची फुले वर्षभर उपलब्ध होऊ शकतात. या पिकाच्या लागवडीसाठी निवड केलेली जमीन उभी – आडवी नांगरुन कुळवाने माती भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळेस जमिनीत हेक्टरी 25 ते 30 मे. टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. शक्य होईल तेव्हा हिरवळीच्या खतांचा वारंवार वापर करावा. पूर्वमशागत झाल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 45 से.मी. किंवा 60 से.मी. अतंरावर सरी- वरंबे तयार करावेत. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर हंगामत सपाट वाफ्यातसुध्दा लागवड करता येते. लागवड करतांना वरंब्याच्या बाजूला 30 से.मी. अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून लागवड करावी. हेक्टरी 7400 रोपांची लागवड होते. लागवड करण्याच्या आदल्या दिवशी स-या पाण्याने ओलवून घ्याव्यात. व वाफसा आल्यावर लागवड करावी. लागवड झाल्यानंतर रोपांना हलके पाणी द्यावे. सपाट वाफ्यात 45 से.मी. x 60 से.मी. x 30 से.मी. वर लागवड करावी.
रोपांची जोमदार वाढ, फुलांची उत्तम प्रत व उत्पादन आणि एका काढणीचे वेळी जास्तीत जास्त फुले मिळण्यासाठी गॅलर्डिया रोपांची लागवड गादीवाफ्यावर करण्याची शिफारस करीत आहे. रोपांना खते व पाणी ठिंबक सिंचन पध्दतीने देणे आवश्यक असते. या पध्दतीने पाण्याची सुध्दा 30- 40 टक्के बचत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. जमिनीची पूर्व तयारी झाल्यानंतर 60 से.मी. रुंद. 30 से.मी. उंच व सोयीप्रमाणे लांब गादीवाफे तयार करुन घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्यावर एक ठिंबक नळी टाकून घ्यी. प्रत्येक गादीवाफ्यावर दोन ओळीत 45 से.मी. अंतर ठेवून 30 से.मी. अंतरावर एक रोप लावून लागवड करावी. दोन गादीवाफ्यात 30 से.मी. अंतर ठेवावे. एकूण 73300 रोपांची लागवड होते.
आंतरमशागत व खते : लागवडीनंतर आठवडाभरात रोपे जोमाने वाढतात. आवश्यकतेनुसार खुरपणी करुन झाडाजवळील माती मोकळी करावी. म्हणजे झाडांची वाढसारखी होत राहील. हेक्टरी 100 किलो नत्र , 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश, संपूर्ण स्फुरद, पालश आणि अर्धे नत्र, लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
पाणी व्यवस्थापन : पावसाळी हंगामात पाऊस नसतांना पाणी देणे आवश्यक आहे. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात अनुक्रमे 10 ते 12 आणि 5 ते 6 दिवसांची तसेच आवश्यकतपमाणे पाणी द्यावे. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.
फुलांची काढणी व विक्री : गॅलर्डिया हंगामानुसार लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते. फुलोरा आल्यानंतर सुमारे 20 ते 25 दिवसांत फुले काढणीयोग्य होतात. लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांनी फुलांची तोडणी करावी. अशाप्रकारे पुढे अडीच महिन्यांपर्यंत फुलांचे उत्पादन सुरु असते. फुलांच्या काढणीचा हंगाम चालू असतांना सतत नवीन फुट, पाने व फुले येत असतात. म्हणून फुले काढणीच्या हंगामात पिकाला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करणे जरुरीचे असते. पहिली तोडणी झाल्यानंतर झाडावर 1 टक्का युरियाचा फवारा दिल्यास फुलांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. फुलांचा हंगाम जसजसा कमी होत जातो. तसतसा फुलांचा आकार लहान होतो, परंतू अशावेळी झाडावर 10 प्रतिदशलक्षांश तीव्रेतेच्या नॅप्थालिक अंसेटिक अँसिडचा ( एन.ए.ए. ) फवारा दिल्यास फुलांचा आकार वाढतो. पहिली तोडणी झाल्यानंतर सुजला 19: 19:19 ( फोलियर ) 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात दर आठवड्यात एकदा याप्रमाणे बहार संपेपर्यंत फवारणी करावी.
यामुळे फुलांचे उत्पादन व प्रत चांगली मिळते. फुलांची काढणी फुले पूर्ण उमललेल्या अवस्थेतच करावी. फुले पूर्ण उमलल्यानंतर कटफ्लॉवर्ससाठी 15 – 20 से.मी. लांबीचे फुलदांडे ठेवून काढणी करावी. काढणी करतांना प्रत्येक फुलदांडा प्लॅस्टिक बादलीतील पाण्यात बुडवून ठेवावा.
फुलांच्या आकाराप्रमाणे व फुलदांड्याप्रमाणे व फुलदांड्याच्या लांबीप्रमाणे प्रतवारी करुन 10 फुलांची एक जुडी याप्रमाणे जुड्या तयार करुन घ्याव्यात. साधारणत: फुलांचा परत चांगला बहार येण्यासाठी खुरपणी करुन हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश या खतांचा पुन्हा एक हप्ता द्यावा. फुले देठासह तोडून ती सुटी किंवा जुड्या बांधून बांबूच्या टोपलीत व्यवस्थित पॅक करुन विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.
हेक्टरी उत्पादन : एका झाडापासून 20 – 25 फुलदांडे मिळतात. एक हेक्टर क्षेत्रातून एकूण सरासरी 1.48 ते 2.00 लाख फुलदांड्याच्या जुड्यांचे उत्पादन मिळते.
रोग, कीड व नियंत्रण :
गॅलर्डिया फुलपिकांची वाढ होत असतांना आणि फुलोरा आल्यावरर त्यांचे किडी व रोगांपासून संरक्षण करावे. गॅलर्डिया फुलपिकावर अतिशय कमी प्रमाणात रोग- किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. महत्वाचे रोग, किडी आणि त्यांच्या नियंत्रणाबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.
रोग नियंत्रण :
मर : लक्षणे : रोपवाटिकेत हा रोग आढळतो. या रोगांमुळे रोपवाटिकेत रोपांची कूज होऊन ती मरतात. जमिनीलगत खोडाची कुज होऊन रोपे कोलमडून पडतात. खोडांची तसेच मुळांची कूज होते.
उपाय : रोपवाटिकेतील रोपांचे गादीवाफे बी पेरण्यापुर्वी फॉरमॅलिन द्रव्याने निर्जतुंक करुन घ्यावेत. किंवा रोपवाटिकेतील गादीवाफ्यात 0.2 टक्के कॉपर ऑक्झीक्लोराइड किंवा कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशक द्रावण टाकावे. पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक.
पानावरील ठिपके : लक्षणे : सेप्टोरिया या बुरशीमुळे पानांवर ठिपके पडतात. विशेषत: पावसाळ्यात रोगांचे प्रमाण जास्त दिसून येते. पानांवर तांबूस- काळपट ठिपके पडतात. पानांची गळ होते.
उपाय : नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच 0.2 टक्के डायथेन एम-45 किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड फवारावे किंवा 3:3:50 तीव्रतेचे बोर्डोमिश्रण 10 – 12 दिवसांचे अतराने 2 -3 वेळआ फवारावे.
कीड नियंत्रण :
मावा : लक्षणे : तपकिरी, राखी, हिरवट किंवा पिवळसर रंगाचे, लहान आकाराचे गोलसर मऊ शरीराचे हे किड असतात. कोवळ्या पानांवरील/ फांद्यावरील रस शोषण करतात. त्यामुळे कोवळ्या कळ्या व शेंड्याची वाढ थांबते.
उपाय : प्रादुर्भाव दिसल्यापासून दर 10 दिवसांच्या अंतराने मॅलॅथिऑन 20 मि.ली. किंवा एन्डोसल्फान 15 मि.ली. किंवा ऑसिफेट 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 16 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार 4 -5 फवारण्या कराव्यात.
धिरज सुरेंद्र नेहेते विषय विशेषज्ञ ( उद्यानविद्या )