कोबीवर्गीय भाजीपाल्यावर पडणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. केवडा व घाण्या या रोगामुळे काही वेळा सुमारे 60 ते 70 टक्क्यापर्यंत नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील रोगांची व त्यावरील उपायांची माहिती असणे गरजेचे आहे.
महत्त्वाची माहिती : असे करावे कारल्यावरील कीड-रोगाचे नियंत्रण !
कोबीवर्गीय फळभाजीमध्ये पानकोबी, फुलकोबी, नवलकोल इत्यादी भाज्याच्या समावेश होतो आणि त्यावर विविध प्रकारच्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. केवडा व घाण्या या रोगामुळे काही वेळा सुमारे 60 ते 70 टक्केपर्यंत नुकसान होते, काही वेळा निरनिराळ्या रोगांची झाडावर दिसणारी लक्षणे एकसारखीच असतात, अशावेळी पिकांवर चुकीच्या औषधांची फवारणी केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना कोबीवर्गीय फळभाजीवरील रोगांची व त्यावरील उपायांची माहिती असणे गरजेचे आहे.
1. रोपे कोलमडणे (डॅपिंग ऑफ) : हा रोग जमिनीत वाढणाऱ्या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण रोपवाटिकेतील रोपांवर प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात, पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत होतो. बुरशीची लागण झालेली रोपे निस्तेज पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे कोलमडतात.
उपाय : या रोगाची लागण पावसाळी हंगामात जास्त प्रमाणात होते म्हणून पावसाळी हंगामात रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. पेरणीपूर्वी 13 ग्रॅम कॅप्टान किंवा फायटेलॉन 10 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच पेरणीपूर्वी बियाणास कॅप्टान किंवा थायरम हे औषध एक किलो बियाणास दोन ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
2. काळी कूज (ब्लॅक लेग) : हा बुरशीजन्य रोग पावसाळी हंगामात बहुतेक सर्व भागात आढळतो. या रोगाचा प्रसार बियाणात वाढणार्या बुरशीपासून होतो. त्यामुळे रोपाच्या वाढीच्या सुरुवातीसच रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजत जाऊन रोप सुकून कोलमडते. रोपाचे खोड उभे कापल्यास आतील भाग काळा झालेला दिसतो.
उपाय : या रोगाचा प्रसार बियाणामार्फत होत असल्यामुळे लागवडीपूर्वी बियाणाचे निर्जंतुकीकरण करावे. यासाठी एक ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड एक लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी किंवा फुलकोबीचे बियाणे 30 मिनिटे बुडवून नंतर सावलीत सुकवावे आणि पेरणीसाठी वापरावे. काळीकूज या रोगाला सहनशील किंवा प्रतिकारक असणाऱ्या जाती लागवडीसाठी वापराव्यात. उदा : पानकोबीची पुसा ड्रमहेड ही काळीकूज या रोगाला सहनशील जात लागवडीसाठी निवडावी.
3. केवडा (डाऊनी मिल्डयू) : केवडा हा बुरशीजन्य रोग कोबीवर्गीय पिकांवर सर्वच भागात आढळून येतो. रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर त्या ठिकाणी भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्याची काढणी लांबल्यास काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात. पावसाळी दमट हवेत हा रोग झपाट्याने पसरतो.
उपाय : रोगाला पोषक हवामान आढळून आल्यास किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास पिकावर एक टक्के बोर्डो मिश्रण फवारावे किंवा दहा लिटर पाण्यात 26 ग्रॅम या प्रमाणात (0.2 टक्के) डायथेन एम-45 हे औषध मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. फुलकोबीच्या स्नोबॉल, एम.जी. एस.जी.एस. 2-3, सिलेक्शन 1.6.1.4 सिलेक्शन-8, 12-सी इ. जाती केवडा रोगाला प्रतिकारक आहेत.
महत्त्वाच्या गोष्ट : काकडीचे असे करा पीक संरक्षण
4. करपा (ब्लॅक स्पॉट) : या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाणात वाढणार्या बुरशीपासून होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लंबगोल काळसर झालेला सर्व भाग करपल्यासारखा काळपट रंगाचा दिसतो. कोबी आणि फुलकोबीच्या तयार गड्ड्यावर तसेच बियाणे तयार होण्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा रोगट झाडापासून तयार झालेल्या बियाणातून रोगाचा प्रसार होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकावर एक टक्के बोर्डो मिश्रण फवारावे किंवा दहा लिटर पाण्यात 26 ग्रॅम या प्रमाणात (0.2 टक्के ) डायथेन एम-45 हे बुरशीनाशक औषध मिसळून फवारणी करावी.
5. भुरी (वापडरी मिल्डयू) : कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य क्वचित प्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच दहा लिटर पाण्यात 37 ग्रॅम पाण्यात विरघळणारा गंधक (80टक्के) या प्रमाणात फवारणी करावी.
6. मुळकुजव्या (क्लबरूट) : या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा सामू सात पेक्षा कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.
उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक वाढवा. रोपाच्या लागवडीपूर्वी रोपे एक ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड दीड लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
सुनील बडे वनस्पती रोगशास्त्र व कृषी जीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.