काकडी हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येणारे आणि कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून सुधारीत जातींची लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचे नियंत्रण आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचा वापर करून काकडी उत्पादन केल्यास काकडी लागवड फायद्याची होऊ शकते.
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात हे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. काकडीच्या सुधारीत जाती आणि त्यांची वैशिष्टये, लागवडीच्या पद्धती खतांचे प्रमाण पाणी व्यवस्थापन आणि पीकसंरक्षण इत्यादी महत्त्वाच्या बाबींची माहिती या लेखात दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात काकडीची लागवड खरीप हंगामात आढळते. काकडीला विशेषकरून उन्हाळ्यात फार मागणी असते. काकडी ही सर्वांची आवडती फळभाजी असून तिचा उपयोग कोशिंबीर किंवा कच्ची खाण्यासाठी करतात. काही ठिकाणी काकडीचे लोणचे घालतात तर भाजीसाठी सुद्धा वापर करतात. काकडी शरीराला पोषक असून फळामध्ये चुना, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम इत्यादी खनिजद्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. काकडी कच्ची खाल्ली असता सारक म्हणून कार्य करते. काकडीमुळे मुत्रपिंड उत्तेजित होऊन लघवी साफ होते. शिवाय शरिरातील पेशींचे पुनर्रजीवन होऊन माणूस दीर्घायुषी बनतो म्हणून काकडी खाणे आरोग्याला दृष्टीने चांगले आहे.
सुधारीत जाती : हिमांगी : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. ही जात लवकर येणारी असून फुलांचा रंग पांढरा आहे. फळांचे वजन 150 ते 200 ग्रॅमपर्यंत असते. काकडीमध्ये बियांचे प्रमाण कमी व गर जास्त असल्यामुळे चवीस उत्तम, तोडणीनंतर लवकर शिळी न पडणे, सुरकुत्या न पडणे, रंग न बदलणे या अंगभूत गुणांमुळे लांबच्या वाहतुकीच्या अतिशय सोईस्कर फळे आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. या जातीपासून हेक्टरी 170 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.

पुना खिरा : ही जात लवकर येणारी असून फळे फिक्कट पिवळसर रंगाची असतात. फळे जून झाल्यावर त्यावरील तांबूस तपकिरी छटा दिसू लागतात. या जातीची लागवड पश्चिम महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीपासून हेक्टरी 130 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा संयोग : ही जात नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने निर्माण केली आहे. या जातीची फळे हिरव्या रंगाची असून त्यावर पिवळसर पट्टे असतात. फळे साधारण 25 ते 30 सें.मी. लांबीची असतात. या जातीपासून हेक्टरी 300 ते 350 क्विटल उत्पादन मिळते.
फुले शुभांगी : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. ही जात प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात घेतली जाते. फळे आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. या जातीपासून हेक्टरी 180 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.
हवामान व जमीन : काकडीला उष्ण हवामान मानवते. या पिकाच्या वाढीला 18 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. तापमान 11 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यास बियाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच अति थंडीचा व धुक्याचाही पिकावर अनिष्ट परिणाम होतो. भरपूर सुर्यप्रकाश व कोरडी हवा या पिकाच्या वाढीला अत्यंत पोषक असते.
हे पीक रेताड ते मध्यम प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. अधिक उत्पादनासाठी उत्तम निचरा होणारी पोयटायुक्त व भरपूर सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन निवडावी.
लागवड व बियाचे प्रमाण : उन्हाळी हंगामात लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात करावी काकडीची लागवड दोन पद्धतीने करता येते.बियाण्याचे प्रमाण 1 ते 1.5 किलोग्रॅम प्रती हेक्डरी लागते.
आळे पद्धत : या पद्धतीत 1.0 मीटर बाय 0.50 मीटर अंतरावर आळी करून त्यात चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळतात. प्रत्येक अळ्यात चार बिया टाकाव्यात. आळे करणे, प्रत्येक आळ्यात पाणी सोडणे यामुळे मजुरीच्या खर्च वाढतो. तसेच वेल आणि फळे यांचा माती व पाण्याशी संपर्क येत असल्याने या पद्धतीत फळे कुजण्याचे प्रमाण जास्त आढळते.
सरी पद्धत : रिजरच्या सहाय्याने तीन मीटर अंतरावर सर्या पाडून सरीच्या काही बाजूस 60 ते 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात शेणखत मिसळावे. प्रत्येक ठिकाणी चार बिया टाकाव्यात. सरी पद्धतीने लागवड केल्यास पाणी देण्याचा खर्च कमी येतो. तसेच फळांना पाणी लागून खराब होण्याची भीती नसते.
खताचे प्रमाण व पाणीपुरवठा : अधिक उत्पादनासाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते देणे फारच जरूरीचे असते. हेक्टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत आणि 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश घ्यावा. शेणखत तसेच संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीपूर्वी द्यावा. उरलेला नत्र लागवडीनंतर एक महिन्यांनी दोन समान प्रमाणात विभागून द्यावा. उन्हाळी हंगामात या पिकास चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
रोग व किडीचे नियंत्रण : केवडा : पानाच्या खालच्या बाजूस पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर पानाचे देठ, बाळ्या व फांदीवरही त्याचा प्रसार होतो. दमट हवेत रोग झपाट्याने पसरतो. रोगाचे नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 0.25 टक्के किंवा मेटॅलॉक्झिल एम-झेड 72, 0.25 टक्के किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 0.25 टक्के अधिक, चिकट द्रव्य 0.1 टक्के यांची दहा दिवसाच्या अंतराने लागवडीनंतर एक महिन्यांनी फवारणी करावी,
भुरी : या रोगाची सुरूवात जुन्या पानांपासून होते. पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावरही पसरते. रोगाचे प्रमाण वाढले की, पाने पिवळी पडून गळून पडतात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप 0.1 टक्के किंवा ट्रायकोडर्मा 0.05 टक्के यांची फवारणी करावी.
फळ कुजणे : हा बुरशीजन्य रोग विषशेत: पावसाळ्यात आढळून येतो. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कॉपर ऑक्सीक्लोराईड हे औषध 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
कीडी : रस शोषणारी कीड : या किडीच्या नियंत्रणासाठी मिथॉइल डिमेटॉन दहा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा इमिडॅक्लोरीड चार मिली किंवा थायामेथोक्झाम चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
फळमाशी : या किडीच्या मॅलॅथिऑन 20 मिली अधिक 100 ग्रॅम गुळ व दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
सुत्रकृमी : जमिनीत राहणारे सुक्ष्म सुत्रकृमी झाडाच्या मुळात शिरून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळावर गाठी येतात. वेलांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. झाडे रोगट दिसतात आणि उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पिकाची फेरपालट करावी. ज्या जमिनीत सुत्रकृमींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे अशा जमिनीत काकडीवर्गीय आणि वांगीवर्गीय पिकांची लागवड करू नये. सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भाजीपाला, कडधान्ये व इतर पिकाच्या लागवडीच्या वेळी दाणेदार फोरेट 10 टक्के 20 किलो प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे व पाणी द्यावे. ज्वारी मका झेंडू यासारख्या सुत्रकृमींना प्रतिकारक पिकांची लागवड करावी.
काढणी : ‘बी’ टोकल्यानंतर साधारणत: 45 ते 55 दिवसात फळे काढण्यास तयार होतात. फळे कोवळी असताना काढणी करावी. काढणी दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने करावी. याप्रमाणे काकडी पिकाचे नियोजन केल्यास 15 ते 20 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
नितीन सातपुते, डॉ. जनार्दन कदम विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर (संपर्क : 0217/2373047)