अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बागायती क्षेत्रात खरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, उन्हाळी हंगामात खरबुजाला साधारणत: १५ ते १७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात लागत होत्या मात्र आता ‘ठिबक सिंचन’ आणि ‘मल्चिंग’चा वापर करून अत्यल्प पाण्यात खरबुजाचे सरासरी हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन मिळते. संकरित वाणांचे उत्पादन ४० ते ५० टनापर्यंत मिळविता येते.
खरबूज हे त्याच्या विशिष्ट आणि विविध प्रकारच्या चवींमुळे प्रसिद्ध आहे. वरचेवर खरबुजाची बाजारातील मागणी वाढत असून, त्याचे व्यापारी तत्त्वावर अधुनिक पद्धतीने उत्पादन घेतल्यास या पिकाची शेती शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळवून देते. मात्र यासाठी याच्या लागवडीचे अधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांनी समजावून घ्यायला हवे.

हवामान : या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. वेलींच्या वाढीसाठी २३.९ ते २६.७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण व्यवस्थित होत नाही.
जमीन : खरबूज पिकांसाठी रेताड, मध्यम काळी, पोयट्याची किंवा गाळाची चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. हे पीक नदीच्या पात्रातच येते, असा काही लोकांचा समज आहे. तो योग्य नाही. ही पीके सुपीक व निचरा असलेल्या कोणत्याही जमिनीत येऊ शकते. मात्र जमिनीचा सामू ६.० ते ६.७ इतका असावा लागतो.
लागवडीचा हंगाम : खरबूजाची लागवड बिया कायम जागेवर टोचून करतात. याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत, असा समज होता. मात्र आता रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून याची पुर्नलागवड करता येते. याची लागवड नोव्हेंबर ते मार्च या काळात करतात.
लागवड पद्धती : ठराविक १५० ते २०० X ७५ ते १०० सें. मी. अंतरावर आळे करून त्यात दोन ते अडीच किलो शेणखत अधिक ८० ते १०० ग्रॅम अमोनियम सल्फेट अधिक ४० ते ५० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि ८० ते १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र करून आळ्यामध्ये भरावे व मध्यभागी दोन ते तीन बिया लावाव्यात.

सरी वरंबा पद्धत : पद्धतीमध्ये दोन मीटर अंतरावर सर्या पाडून वरंब्याच्या बगलेत ६० ते ७५ सें.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन बिया टोचून लावाव्यात.
रूंद गादीवाफा पद्धत : यामध्ये लागवड गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूने करतात. वेलाची व फळाची वाढ ही गादीवाफ्यावर होत असल्याने फळांना पाणी लागून ती खराब होत नाहीत. यासाठी तीन ते चार मीटर अंतरावर सर्या पाडून पाणी देऊन वाफसा आल्यावर बगलेत एक ते दीड मीटर अंतरावर दोन ते तीन बिया टोकतात.
बियाणे : बियाण्याचा आकार व लागवडीच्या अंतरानुसार एक हेक्टर खरबूज लागवडीसाठी सुमारे दीड किलो ‘बी’ लागते. पेरणीपूर्वी बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्यानंतर त्याला कपड्यामध्ये किंवा पोत्यामध्ये गुंडाळून ठेवावे. त्यामुळे अंकुर फुटण्यास मदत होईल. लागवडीपूर्वी बियाण्यास थायरम हे औषध तीन ग्रॅम प्रति किलो ग्रॅम याप्रामणे चोळून मग लागवड करावी. बियाणे दीड ते दोन सें. मी. खोल जमिनीत टाकून झाकून घ्यावे. विरळणी करताना एकाजागी दोन वेली ठेवाव्यात.
भरखते आणि वरखते : खरबूज पिकाला खताची मात्रा ही जमिनीची सुपीकता, हवामान, हंगाम यावर अवलंबून असते. या पिकांसाठी १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. या बरोबरच स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा तर अर्धी नत्राची मात्रा त्यानंतर १० ते १५ दिवसांनी द्यावी. नत्र खताची जास्तीची मात्रा आणि सततची वेलवाढ या गोष्टी टाळाव्यात. सर्वसाधारणत: जास्त तापमानाला जादा मादी फुलांची संख्या कमी होऊन पर्यायाने कमी उत्पादन येते. नत्राची १२० किलो ग्रॅम स्फुरदाची ५० किलो ग्रॅम व पालाशची ५० किलो ग्रॅम मात्रा प्रति हेक्टरी द्यावी.
आंतरमशागत : खरबुजाचे ‘बी’ उगवल्यानंतर किडग्रस्त व रोगट रोपे उपटावीत व नांग्या भराव्यात. ‘बी’ उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत (२० ते २५ दिवस) आजूबाजूचे तण काढून राने भुसभुशीत ठेवावे. वेलींना वेळोवेळी भर द्यावी. तसेच वेलींना वळण देऊन गादीवाफ्यावर घ्यावे, म्हणजे फळे पाण्याचे खराब होणार नाहीत. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण अत्याल्प होते. शिवाय तणाचा कसलाच त्रास होत नाही. पाण्याची चांगलीच बचत होते. त्यामुळे हल्ली मल्चिंगचा वापर सर्रास केला जातो.
पाणी व्यवस्थापन : खरबुजाला सुरूवातीला उगवण होईपर्यंत पिकाला दोन पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान, पिकाच्या वाढीची अवस्था याचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवावे. उन्हाळ्यात पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फळधारणा झाल्यानंतर अनियमित पाणी दिल्यास फळे तडकण्याचा संभव असतो. फळे काढणीपूर्वी दोन दिवस अगोदर पाणी तोडल्यास फळाची गोडी वाढल्यास मदत होते.
काढणी व उत्पादन : खरबूज फळांची काढणी ही फळ पूर्ण पिकल्यावर करतात. फळांची काढणी शक्यतो सकाळीच करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकपणा दीर्घकाळ टिकून राहतो. ती चवीला चांगली लागतात. फळ काढायला तयार झाले किंवा नाही. हे काही आडावे, निरीक्षण व अनुभवाने कळू शकते. जाळीदार खरबूजामध्ये जाळीमधील हिरवा रंग हा पिवळा होतो आणि हे जाळे मळकट पांढरे होते.
लांबच्या मार्केटसाठी गळअवस्थेत फळ काढणी करावी. फळांची काढणी ही चार ते पाच दिवसांच्या अंतराने करावी. लागवडीपासून सुमारे तीन ते साडेतीन महिन्यात काढणी सुरू होते व त्यानंतर तीन ते चार आठवड्यात पूर्ण होते. खरबूजाचे सरासरी हेक्टरी उत्पादन २० ते २५ टन मिळते. संकरित वाणांचे उत्पादन ४० ते ५० टनापर्यंत मिळविता येते.
डॉ. अशोक मुसमाडे, मनोज माळी वरिष्ट संशोधन सहाय्यक, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जि. अहमदनगर (संपर्क: ०२४२६/२४३२४७, ७५८८१६८०६९)