देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंतेचे वातावरण वरचेवर वाढत असताना जनतेसाठी, विशेषत: शेतकर्यांसाठी शुभवार्ता आहे. यंदा देशात समाधानकारक सरासरी ९८ टक्के मान्सूनच्या पावसाचा पहिला अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, यापूर्वीही स्कायमेटनेही यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याला दुजोरा देणारा हा अंदाज असून, महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी सरासरीएवढा किंबहुना त्यापेक्षाही अधिक पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यंदा ‘अल निनो’चा प्रभाव कमी राहील असेही सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने जाहिर केलेल्या या पहिल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा मान्सून चांगला बसरसणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडू शकतो असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणार्या अनुकूल बदलांमुळे भारतात यंदा मान्सून समाधानकारक राहील. देशात गेल्या दोन वर्षात मान्सून सरासरीएवढा पडला आहे. यंदा अल निनोचा प्रभाव राहणार कमी राहणार आहे. आयएमडीच्या माहितीनुसार सध्या अलनिनोची स्थिती न्यूट्रल आहे. त्यामुळे भारतातील मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारतात यंदा सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.
ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, आसाम व मेघालय या राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहेतर महाराष्ट्रासह उर्वरित भारतात सरासरीएवढा वा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आपल्या पहिल्या अंदाजत वर्तविली आहे. मान्सूनचा दुसरा अंदाज मे महिन्यात जाहीर करण्यात येणार असून, त्यावेळी अधिक सविस्तर अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे.

स्कायमेटच अंदाजानुसार १०३ टक्के पाऊस
दरम्यान, यापूर्वी स्कायमेटने जाहिर केलेल्या मान्सून अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या तुलनेत यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पावसाळ्याचा सुरुवातीचा महिना जून आणि शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये देशभरात व्यापक पावसाची चिन्हे स्कायमेटने वर्तविली आहेत.
स्कायमेटच्या मते, जूनमध्ये एलपीए (१६६.९ मिमी) च्या तुलनेत १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सामान्य पावसाची शक्यता ७० टक्के आहे. सामान्यपेक्षा अधिक पावसाची २० टक्के शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची १० टक्के शक्यता आहे. जुलैमध्ये एलपीए (२८९ मिमी) मध्ये ९७ टक्के पाऊस होऊ शकतो. सामान्य पावसाची ७५ टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता १० टक्के आहे. सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता १५ टक्के आहे. ऑगस्टमध्ये एलपीए (२५८.२ मिमी) येथे ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची ८० टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त १० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची १० टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये एलपीएमध्ये (१७०.२ मिमी) ११६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची ३० टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६० टक्के आणि सामान्यपेक्षा कमी पावसाची १० टक्के शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.