भुईमूग हे प्रमुख धान्य पीक आहे. महाराष्ट्रामध्ये भुईमूगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भुईमूग हे शेंगाकुळातील पीक असल्यामुळे ते केवळ जमिनीची सुपिकताच टिकवत नाही तर पुढील पीक घेण्यासाठी जमीन तयार करण्यास लागणारा खर्चही कमी करते. भुईमूग हे नगदी पीक असून शेतकर्यांना रोख पैसा मिळवून देणारे पीक आहे.
जमीन व हवामान : भुईमुगाच्या लागवडीसाठी 0.45 ते 1.00 मीटर खोल, मध्यम चांगली निचरा होणारी. चुन्याचे व शेंद्रीय पदार्थाचे प्रमाण योग्य असलेली मऊ व भुसभुशीत जमीन, निवडावी, भारीची किंवा चिकनमातीयुक्त जमीन भुईमुगासाठी योग्य नसते. साधारणपणे भुईमुगाच्या लागवडीसाठी सरासरी 500 ते 1250 मिमी वार्षीक पर्जन्यमान व 21 ते 27 सेल्सिअस वार्षीक सरासरी तापमान आवश्यक असते भरपूर सूर्यप्रकाश वाढीच्या काळात उष्ण तापमानाची (21 ते 27 सेल्सिअस या पिकास आवश्यकता असते.
पूर्वमशागत व रानबांधणी : भुईमूगाच्या शेंगाची वाढ जमिनीत घेत असल्यामुळे जमिनीच्या पूर्वमशागतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वीचे पीक काढल्यानंतर 15 सें. मी. खोलीपर्यंत नांगरट करून दोन ते तीन वरवराच्या पाळ्या द्याव्यात पेरणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत पाच ते दहा टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे. जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि पाणी देण्याची पद्धत या गोष्टीचा विचार करून लागवडीपूर्वी जमिनीची आखणी करावी. मध्यम खोत भारी काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नसल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही. त्यासाठी रूंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.
सुधारीत जाती : टी.ए.जी 24 (उपट्या), टी. पी. जी-41 (उपट्या), जे. एल-501 (उपट्या), टी.जी-26, जे. एल-24, टी.जी-17, कोपरगावं-1, कराड-4-11
बियाणे व बिजप्रक्रिया : खोड कुजव्या आणि बियाण्यांपासून उद्भवणार्या इतर रोगांवर नियंत्रण करण्यासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी पाच ग्रॅम थायरम किंवा तीन कार्बेन्डॅझिम प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच यानंतर रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. त्यासाठी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम या प्रमाणात घेऊन गुळ आणि हलकेसे पाणी शिंपडून चोळावे आणि थोडा वेळ सावलीत सुकवावे.
इक्रीसॅट पद्धतीने लागवड : या पद्धतीमध्ये रूंद वाफा सरी पद्धत उसे म्हणतात. भुईमूग पीक हे पाण्यास जास्त संवेदनशिल आहे. म्हणजेच जास्त अथवा कमी पाणी झाल्यास उत्पादनांवर त्याचा परिणाम होतो. या पद्धतीमध्ये पूर्वमशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये 1.20 मीटर अंतरावर छोट्या नांगरीने 30 सें.मी. रूंदीचा सर्या पाडाव्यात. त्यामुळे 0.90 रूंद वाफे (गादीवाफे) तयार होतात वाफ्याची उंची 15 ते 20 सें.मी. ठेवावी. रूंदी वाफ्यावर दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून टोकण पद्धतीने भुईमुगाची लागवड करावी. खते व इतर मशागत नेहमीच्या सारखी करावी. प्रति हेक्टरी 60 ते 80 किलो बियाणे वापरावे.
लागवडीचा कालावधी : जानेवारीचा दुसरा पंधरवाडा ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत उन्हाळी भुईमूगाची लागवड करता येते. मार्च महिण्यात पेरणी करावयाची झाल्यास लवकर येणार्या जातीची निवड करावी. अन्यथा पीक पावसामध्ये सापडण्याचा धोका असतो. खरीप हंगामात लागवड करावयाची असल्यास 25 जून ते 15 जुलै दरम्यान करावी.
वाढ व विकास : भुईमूग हे पीक मुळता: अतिश्चीत वाढीचे असल्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यास स्थैर्य येण्यासाठी या पिकाची कामीक आणि पुर्नरूत्पादनक्षम वाढीचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी, अन्नद्रव्ये कीड व रोगराई नसलेल्या परिस्थितीत भुईमूग पिकांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्था, वेग, काळ, प्रमाण यामध्ये तालबदधता असणे अत्यंत जरूरीचे आहे. भुईमुगाची वाढ व विकास खालीलप्रमाणे झाल्यास अधिक उत्पादन मिळते.
पिकाची लवकर उगवण होऊन वाढ लवकर झाली पाहिजे. (पेरणीनंतर40 ते 50 दिवसांनी ) फुलोर्याला लागणे आणि शेंगा लागल्या पाहीजेत. शेंगा भरण्याचा काळ दिर्घ असला पाहिजे (60 ते 70 दिवसाचा) भुईमूग काढणीस तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात शेंगा पूर्ण पोसलेल्या व काढणी योग्य असल्या पाहिजेत. यालाच भुईमूगाची आदर्श वाढ म्हणता येईल.
आंतरमशागत : भुईमूगाची पिकात सुरवातीच्या 40 दिवसापर्यंत अंतरमशागत करता येते. पीक उगवल्यानंतर 10 ते 20 दिवसाच्या अंतराने दोन कोळपणी व खुरपणी करू नये व फक्त मोठे तण उपटून टाकावे.
खत व्यवस्थापन : भुईमूग पिकासाठी हेक्टरी दहा टण शेणखत शेतामध्ये पसरूण कुळवाच्या सहाय्याने पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे. भुईमूगाला हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद द्यावे.
पाणी व्यवस्थापन : भुईमूग पीक पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. फांद्या फुटण्याची अवस्था (20 ते 30 दिवस) आर्या उतरण्याची अवस्था (65 ते 70 दिवस) या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्यात द्याव्यात व ताण पडू देऊ नये. उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा म्हणजे पाण्याची 40 टक्के बचत होऊन पाण्याच्या योग्य वापरामुळे 10 ते 15 टक्के उत्पादनांमध्ये वाढ होईल.
कीड व्यवस्थापन : भुईमूग पिकास तुडतुडे, फुलकिडे, रस शोषणारी अळी,पाने कुरतडणारी अळी, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव सुरवातीच्या काळात होत असतो यासाठी पीक उगवणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी 30 टक्के डायमेथोएट 500 मिली किटकनाशक हेक्टरी 500 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. पाने गुंडाळणार्या अळीच्या बंदोबस्तासाठी पाण्यात विरघळणारे 50 टक्के कार्बोरील दोन किलो 36 टक्के मोनोक्रोटोफॉस 700 मिली हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. चार टक्के एंडोसल्फान किंवा 1.5 टक्के क्विनॉलफॉस भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावे किंवा 85 टक्के फॉस्फोमिडॉन 100मिली किंवा 25 टक्के मिथील डिमेटॉन 400 मिली पाण्यात मिसळून फवारावे.
रोग व्यवस्थापन : रोपावस्थेमध्ये मुळकुजव्या व खोडकुजव्या या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे पाच ते दहा टक्के नुकसान होते. म्हणून या रोगांचा नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बुरशीनासकाची बिजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच नंतरच्या वाढीच्या अवस्थेत टिक्का व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक दोन किलो किंवा मॅनकोंझेब 1.250 किलो किंवा कार्बेन्डेझीम 250 ते 500 लिटर पाण्यात मिसळून पीक 45 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर गरजेनुसार फवारण्या कराव्यात.
काढणी : भुईमूगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून अतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात व पोत्यात भरून ठेवाव्यात शेंगातील आद्रतेचे वाळवण्यात अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होत असते.
उत्पादन : सुधारीत पद्धतीने लागवड केल्यास उन्हाळी भुईमूगापासून साधारणपणे प्रती हेक्टरी 28 ते 30 क्विंटल वाळलेल्या शेंगाचे उत्पन्न निघते. तसेच पाच ते सहा टण काडाचे उत्पन्न मिळू शकते.
ए. सी. भोसले छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी, जि. बीड.