पेरू फळबागेवर पडणार्‍या रोगांवर कसा मिळवावा विजय ?

0
4482

पेरू लागवडीचे क्षेत्र जास्त असले तरी त्यातुलनेत त्याचे उत्पादन मात्र मिळत नाही; याची अनेक कारणे आहेत त्यापैकी पेरूवर पडणारे रोग हे महत्त्वाचे कारण आहे. पेरूचे झाड हे काटक असले तरी या झाडावर काही प्रकारचे रोग येतात. वेळीच व योग्य नियंत्रण केल्यास रोगावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविता येते. परिणामी उत्पादनातही वाढ होते.

पेरू पिकावर अनेक प्रकारचे रोग पडतात. त्यामध्ये देवी रोग, मर रोग, खोडावरील खौर्‍या रोग हे प्रमुख रोग आहेत. याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजन करणे गरजेचे असते. त्यासाठी रोगाची लक्षणे माहिती असणे महत्त्वाचे असते.

देवी रोग (कॅकर) : हा रोग पेस्टॅलशिऑपसिस सिडी या नावाच्या बुरशीमुळे होतो. पावसाळ्यात आणि उष्ण दमट हवामानात हा रोग जास्त प्रमाणात होतो. तापमान 30 अंश सेल्सिअस से च्या वर गेल्यास हा रोग अधिक प्रमाणात येण्याची शक्यता असते.

advt/shetimitra.co.in

रोगाची लक्षणे : हा रोग कच्या हिरव्या फळांचा अगोदर येतो. पक्क फळांवर हा रोग क्वचितच येण्याची शक्यता असते. सुरवातीस फळांवर बारीक, लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके आकाराने गोल असून देवी रोगाच्या फोडासारखे दिसतात. हे ठिपके मोठे होऊन काळसर तपकिरी फोड आल्यासारखे दिसतात. हाताला हे खरबडे लागतात. बुरशीची वाढ शक्यतो फळांच्या बाह्य सालीवर असते. या रोगाचे व्रण फळामध्ये खोलवर रूतलेले नसतात. फळांची बाह्य साल क्वचीतच आढळते मात्र रोगाचे प्रमाण वाढल्यास पानांवर सुद्धा हा रोग वाढतो आणि पाने मुरडतात. जुन्या पानावर या रोगाचे लालसर तपकिरी वर्तुळाकार ठिपके दिसतात.

नुकसानीचा प्रकार : या रोगामुळे फळांचा आकर्षणपणा कमी होतो. रोगट फळ चवीस बेचव लागतात. या रोगामुळे फळाची गुणवत्ता कमी होते. तसेच रोगामुळे फळातील जीवनसत्व फळाची गुणवत्ता कमी होते. तसेच रोगामुळे फळातील जीवनसत्व क चे प्रमाणसुद्धा कमी होते. अशा रोगट फळांना बाजारात फारच कमी किंमत मिळते. पेरूच्या सरदार (लखनै-94) व कोथरूड सिडलेस या जाती या रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडतात.

उपाय : या बुरशीचे जंतु पाच ते सहा महिने आणि ते सुद्धा कडक उन्हात जिवंत राहु शकतात. त्यामुळे फळांचा हंगाम संपल्यावर सडकी, वाळलेली, खाली पडलेली आणि झाडावर शिल्लक राहीलेली फळे गोळा करून ती जमिनीत गाडून नष्ट करावीत.

कोरड्या वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या छाटाव्यात. फांद्याच्या दाटीमुळे बागेत हवा खेळती राहत नाही. बागेत व्यवस्थित सूर्यप्रकाश येत नाही. त्यामुळे जमिनीपासून फांद्या 75 ते 90 सें.मी. (2.5 ते 3 फुट) अंतर ठेवून छाटाव्यात म्हणजे हवा खेळती राहून सूर्यप्रकाश येण्यास मदत होईल. फांद्या छाटलेल्या भागावर बोर्डे पेस्ट (10 लिटर पाणी +1 किलो मोरचुद+1 किलो चुना ह्या प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करावी. इावावी बोर्डेपेस्टच्या एवजी 10 लिटर पाणी + 2 किलो कोणतेही ताम्रयुक्त बुरशीनाशक घेऊनसुद्धा ही पेस्ट तयार करता येते.

फळाच्या ओझ्यामुळे झाडांच्या फांद्या खाली वाकतात. त्यामुळे आंतरमशागत अडथळा येतो. तसेच बागेत आर्द्रतेचे प्रमाण वाढून रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. यासाठी फळांना वाकलेल्या फांद्या आधार देऊन वर उचलून धराव्यात. फळांचे पॅकिंग करताना हा रोग असलेल्या बागेतील पाने वापरू नये.

फळांचा हंगाम संपल्यावर झाडावर एक टक्के बोर्डेमिश्रण किंवा 0.25 टक्के कोणतेही ताम्रयुक्त बुरशीनाशक घेऊन झाडावर फवारावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे झाडांची दाटी-दाटीने लागवड करू नये. बाग तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. पावसाळ्यात हा रोग जास्त प्रमाणात येतो म्हणून पावसाळ्यात फळे घेण्याचे टाळावे. पावसाळ्यात पावसाचे पाणी शेतात साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जादा पाणी ताबडतोब बागेच्या बाहेर काढून टाकावे.शक्यतो बागेत ठिबक संच बसवून घ्यावा. त्यामुळे बागेस मोजकेस पाणी देता येईल. जमिनीवर बुरशीनाशक धुरळणी करावी. त्यासाठी चार टक्के ब्लायमेक्स भुकटी जमिनीवर धुरळावी. नंतर ही भुकटी मातीत चांगली मिसळून टाकावी. त्यामुळे जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषानंतर असणार्‍या रोगकारक बुरशीचा नाश होण्यास मदत होईल.

कृषी विद्यापीठातील एका प्रयोगात असे दिसून आले की टिल्ट 1 ग्रॅम इंडेफिल एम-45 बुरशीनाशक दोन ग्रॅम किंवा टिल्ट एक बावेस्टीन एक ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फळधारणेपासून दर 15 दिवसांनी एकूण सहा फवारण्या दिसल्यास हा रोग आटोक्यात येतो.

देवी रोगाच्या नियंत्रणासाठी फळ धारणा झाल्याबरोबर बुरशीनाशकाची पहिली फवारणी करावी. त्यासाठी बेनोमिल एक ग्रॅम किंवा बाविस्टीन एक ग्रॅम इंडोफिल एम-45 बुरशीनाशके फवार नयेत कारण त्यामुळे पेरूच्या फळांवर तांबूस काळपट रंगाची तांब (अतिसुक्ष्म फोड) येण्याची शक्यता असते. बोगस शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त खत देऊ नये. फळ माशी, ढेकूण पाने खाणार्‍या अळ्या अशा प्रकारच्या किटकांशी फळांवर केलेल्या जखमांमुळे देवी रोगाचा प्रसार होतो. या कारणास्तव अशा प्रकारच्या सर्व किटकांचा बंदोबस्त करावा.

देवी रोगाच्या नियंत्रणासाठी फक्त बुरशी नाशकांच्या फवारणीचाच फक्त अवलंब न करता इतर विविध रोग निवारक पद्धतीचा वापर सामुदायिकरीत्या करावा. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण परिसरातील रोग आटोक्यात आणण्यास मदत होईल. हा रोग आटोक्यात आणण्यास सामुदायिक रित्या प्रयत्न न केल्यास रोग नसलेल्या बागेत सुद्धा हा रोग पसरण्याची शक्यता असते.

अश्या रीतीने बुरशी नाशकांबरोबर विविध मशागत तंत्रांचा सामुहिक पद्धतीने अवलंब करून हा रोग आटोक्यात आणावा.

मर रोग : या रोगाचे अचुक कारण माहित नाही. परंतु हा रोग फ्युजरियम या बुरशीमुळे होतो असे मानले जाते. उत्तर भारतात हा रोग जास्त प्रमाणात होतो. उत्तर प्रदेशात या बुरशीची फ्युजरियम ऑक्झीस्पोरम व बंगालमध्ये मॅक्रोफोमिया फॅझीओलाना आणि सिफॅलोस्पेरियम या जाती आढळतात.

हा रोग विम्लयुक्त/जमिनीत जास्त प्रमाणात होतो. या रोगाचे पाने पिवळी पडतात. नंतर पाने वाळतात. फांद्या शेंड्यातून वाळतात व मरतात. या रोगाचे आणखी एक लक्षण म्हणजे केंबीयम लेयरचा रंग नाहीसा होतो. ज्या जमिनीत पाणी जास्त साचून राहते अश्या जमिनीत हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. ह्या रोगामुळे नविन कलमे व रोपे देखील मरतात.

उपाय : लागवडीसाठी विम्लयुक्त (अल्काईन) जमीन निवडू नये. ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनीत पेरूची लागवड करू नये. रोगट फांद्या जाळून नष्ट कराव्यात. जमिनीत जिप्सम व सेंद्रीय खत टाकावे. हिरवळीच्या खतांचा उपयोग करावा. बाविस्टीन 1 लिटर पाण्यात दोन ग्रॅम किंवा बेनोमिल 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम ह्या प्रमाणात घेऊन झाडांच्या बुंध्याभोवती जमिनीत टाकावे. थायरम 1 लिटर पाण्यात 3 ग्राम या प्रमाणात घेऊन आळ्यात टाकावे. बनारसी, ढोकला, सिंधू नासिक व सुप्रीम या जाती या रोगाला प्रतिकारक आहेत. पेरूचे कलम रोग प्रतिकारक खुंटावर करावे.

मर रोगासारखा रोग : अलाहाबाद येथे मर रोगासारखाच एक रोग आढळून आला आहे. हा रोग स्न्लेरोसियम बटाटीकेला या बुरशीपासून होता. हा रोग साधारणत: पेरूची ज्या जातीची खोडे मऊ असतात. त्या खोडांना जास्त प्रमाणात होतो. गुजरात मध्ये मर रोगासारखाच आढळून आला. या रोगामुळे फांद्याना तडे पडतात. व त्या वळतात.

करपा रोग : हा रोग ग्लेमेरिला सिडी ग्लोइस्पोरीयम सिडी किंवा कोलेक्ट्रोकम सिडी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पेरूच्या फळांना सुरकत्या पडलेल्या रोगट फळांद्वारे सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. या रोगास फळे, पाने व नवीन फुटी लवकर बळी पडते. फांद्या वरून खाली वाळत जात. हा रोग पावसाळ्यात जास्त प्रमाणात होतो. हा रोग अमेरीकेतील कॅलोफोर्निया या फ्लोरीडा या राज्यात आढळतो. भारतात हा रोग उत्तर प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतो.

उपाय : झाडाचे रोगट अवशेष, रोगट फळे व पाने वेचून नष्ट करावीत. बाग तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. बाविस्टीन 1 लिटर पाण्यात एक ग्रॅम ह्या प्रमाणात फवारावी. डायफॉलीटॉन हे बुरशीनाशक 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम ह्या प्रमाणात घेऊन फवारावेत. इंडोफील झेड : 78 हे बुरशीनाशक 1 लिटर पाण्यात 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारावेत. अ‍ॅपल कलर ही जात या रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

पानांवरील सर्कोस्पोरा : हा रोग सर्कोस्पोरा सावाडी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळ्य पानांच्या खालच्या बाजूस पाण्यासारखे पारदर्शक पट्टे दिसतात. कॉपर ऑक्झीक्लोराईड 1 लिटर पाण्यात 2 ते 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारावे.

खोडावरील खैर्‍या रोग : हा रोग फाईझॅलोस्पोरा सिडी या बुरशीमुळे होतो. फांद्याच्या सालीवर वेड्यावाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसून येतात. साल फाटलेली दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यावर खांद्या सुकतात. दमट हवा व जास्त पावसाच्या प्रदेशात हा रोग होतो.

उपाय : निरनिराळी बुरशीनाशके आलटून पालटून फवारावी.

फळांच्या पुढच्या भागावरील सड : हा रोग फोमोप्सीस आणि पेनीसिलीयम या बुरशीमुळे होतो. फळाचे जे पुढचे टोक किंवा जो पुढचा भाग असतो तो भाग फळे झाडावर असतांना किंवा फळे झाडावरून उतरून घेतल्यावर राहतो.

उपाय : निरनिराळी बुरशीनाशके आलटून पालटून फवारावी.

सुटी मोल्ड (काळी बुरशी) : खवले किड पानातील रस शोषून घेणार्‍या इतर किडी चिकट पदार्थ पानांच्या वरच्या भागावर सोडते. त्यावर कोळशासारखी बुरशीची भुकटी येते.

उपाय : निरनिराळी बुरशीनाशके आलटून पालटून फवारावी. प्रत्येक औषधात फीश ऑईल रोझीन सोप टाकावे.

बांडगुळ : हा परोपजीवी वनस्पती आहे. वनस्पती झाडांवर वाढते. त्यामुळे फळधारणा चांगली होत नाही. तसेच फळांची गुणवत्ता व उत्पादनही कमी होते.

उपाय : बांडगुळाच्या झाडाला फुले येण्याच्या अगोदर ते बांडगुळ ज्या फांदीवर वाढले आहे ती धारदार करवतीने कापावी. काप घेतल्यावर तेथे बोर्डेपिस्ट लावावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फळे पॉलीथॉन बॅगने झाकावीत.

जयश्री ना. पापडे सहाय्याक प्राध्यापिका, उद्यानविद्या महाविद्यालय, जळगांव जा.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here