रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणा-या पिकांपैकी महत्वाचे पिक म्हणजे हरबरा पिक होय. हरबरा मुख्य कडधान्य पिक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षात हरबरा पिकाखालील क्षेत्र वाढत जाऊन सध्या ते १८.६४ हे पर्यंत झालेले आहे. हरबरा पिकाची सरासरी उत्पादकता ८.५० क्वि/हे पर्यंत जाऊन पोहचली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल केला आणि सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रामध्ये उल्लेख्ननिय उत्पादन प्राप्त झाल्याचे आपण नेहमीच वृत्तपत्रामध्ये वाचत आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी हरबरा पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करतात. हस्त नक्षत्रावर पडणाऱ्या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन शेतकरी हरब-याचे चांगले उत्पादन घेतात. राज्यात यावर्षी खरीप हंगामामध्ये चांगला पाउस झाला असून तसेच मान्सूनचे निर्गमन उशिरावर झाल्याने या वर्षी निश्चितच हरबरा या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी जिरायत असो कि बागायत पेरणी वेळेवर व चांगल्या भारी जमिनीत करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मर रोग प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करून पेरणी वेळेवर करण्याचे नियोजन शेतकरी बंधूनी करावे. हरबरा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी या लेखाचा शेतकरी बंधूना निश्चितच उपयोग होईल.

जमीन व हवामान : हरबरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सेमी ) खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. पर्जन्यमान चांगले राहिल्यास जमिनीमध्ये ओलावा भरपूर टिकून राहतो, अश्या जमिनीमध्ये जिरायत हरब-याचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. उथळ व मध्यम जमिनीमध्ये पण चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते फक्त सिंचनाची व्यवस्था असायला हवी. हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरबरा पिकासाठी वापरू नये. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा असलेले वातावरण या पिकास मानवते. पिक साधारणतः २० दिवसाचे झाल्यानंतर किमान सूर्यप्रकाश १० ते १५ अंश से. आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश से. असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले व घाटे लागतात. या पिकास साधारणतः ५.५ ते ८.५ जमिनीचा सामू असेलेली जमीन मानवते.
पूर्वमशागत : हरबरा पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिन भुसभुशीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी खरीपाचे पिक निघाल्यानंतर जमिनीची खोल नागरणी करून आणि कुळवाच्या २ पाळ्या द्याव्यात. खरीपामध्ये जर शेणखत दिलेले नसेल तर हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर जमीन स्वच्छ करून काडीकचरा वेचून घ्यावा.
पेरणीची वेळ :हरबरा पिकाची पेरणी हि हस्त नक्षत्रामध्ये केल्यास त्याचे उत्पादन चांगले येते हे आपण पूर्वी पासूनच ऐकत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जमिनीमध्ये असणारा ओलावा आणि वातावरण होय. तसेच पेरणी झाल्यानंतर त्या काळामध्ये होणा-या परतीचा पाउसाचा फायदा पण हरभरा पिकास होतो व किंबहुना हरबरा पिकाची वाढ चांगली होते. बागायत क्षेत्रामध्ये ओलीताची व्यवस्था असल्यामुळे पेरणी २० ते ३० ऑक्टोबर दरम्यान केली तरी चालेल. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन रोपमधील अंतर १० सेमी राहील अश्या पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रती हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखल्या जाईल.
बीजप्रक्रिया : बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी व रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतीकिलो ५ ग्राम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्राम थायरम + २ ग्राम कार्बेंडाझिम एकत्र करून प्रती किलो बियाण्यास चोळावे. तसेच रायझोबियम जीवाणू संवर्धनाचा उपयोग पेरणी करतेवेळेस केल्यास पिकाच्या मुळावरील ग्रंथी वाढून नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण वाढून उत्पन्नामध्ये निश्चितच ३ ते ५ टक्के वाढ करता येऊ शकते.
बियाण्याचे प्रमाण : हरब-याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते. विजय, जाकी ९२१८ या जातीकरिता ६५ ते ७० किलो तर विशाल, दिग्विजय आणि विरत या टपो-या दाण्यांच्या वानाकरिता १०० किलो प्रती हे. बियाणे पेरणीसाठी वापरावे लागते. हरबरा पिकामध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे काही शेताक-यांचे दाखले आहेत. नवीन सुधारित जाती विराट, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, कृपा, पीकेव्ही २, पीकेव्ही ४, जाकी ९२१८ , राजविजय २०२, राजविजय २०३ ई. पैकी वाणाचा वापर करावा.
खते : सुधारित हरब-याचे नवीन वान खत आणि पाणी यास चांगले प्रतिसाद देते यासाठी खताची मात्रां योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कॅम्पोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकांची पेरणी करतांना २५ किलो नत्र, ५० किलो स्पुरद आणि ३० किलो पालाश प्रती हे. म्हणजेच १२५ किलो DAP अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फोस्पेट प्रती हेक्टरी द्यावे. संतुलित खताच्या वापरामुळे उत्पन्नात १८ ते १९ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पिक फुलोरा अवस्थेत असल्यावर २ टक्के युरियाची पहिली फवारणी व १० ते १५ दिवसानंतर दुसरी फवारणी केल्यास पिकाच्या उत्पन्नात वाढ होते.
आंतरपीक : हरबरा पिकामध्ये ज्याप्रमाणे आपण सोयाबीन पिकामध्ये तूर हे अंतरपिक घेतो त्याप्रमाणे कोथिंबीर पिकाची पेरणी केल्यास त्यापासून अधिकचे उत्पादन मिळून हरबरा पिकावर येणा-या घाटेअळीपासून सुद्धा संरक्षण मिळू शकते.
आंतरमशागत : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३० ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवने हे अधिक उत्पन्न वाढविण्याच्या दृस्ठीने अत्यावश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे हरबरा पिकाच्या उत्पन्नामध्ये २० टक्केपर्यंत वाढ होते. पिक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३५ ते ४० दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच पिकास भर देण्याचे काम सुद्धा कोळपणी मार्फत होते. खुरपणी करणे मजुराअभावी शक्य नसल्यास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पेंडीमिथालीन (stomp) या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हे. ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन : जिरायत हरबरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरबरा पिकास फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरबरा पिकाची रानबांधणी करतांना दोन स-यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच लांबी सुद्धा जमिनींच्या उतारानुसार कमी ठेवावी. म्हणजे पिकास पाणी देणे सोपे होईल. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीमध्ये पाण्याच्या २ पाळ्या पुरेश्या होतात. त्याकरिता पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी व ६५ ते ७० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पाणी जास्त आहे म्हणून जास्त पाणी देऊ नये अन्यथा पिक उभाळण्याचा धोका असतो. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नये.
तुषार सिंचन – हरबरा पिकास वरदानच
हरबरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची निवड केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते. हे पिक पाण्यास अतिशय संवेदशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पिक उभळते व त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते. यासाठी तुषार सिचन पद्धत फार प्रभावी आहे. या पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे, आवश्यक त्या वेळेस पाणी देता येते. पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा कमी होतो आणि असलेले तण काढणे सोयीस्कर जाते. तसेच अधिक पाणी दिल्याने होणारे रोग जशे कि मुळकुज हेही या पद्धतीमुळे आटोक्यात आणता येते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन : घाटे अळी हि हरबरा पिकावरील महत्वाची कीड आहे. हि कीड हरबरा पिकाव्यतिरिक्त मका, सूर्यफूल, भेंडी, करडी या पिकावर आढळून येते. हि कीड शेतामध्ये आपणास वर्षभर पहावयास मिळते. म्हणून हरबरा पिक घेते वेळेस हे पिक खरीप मध्ये घेतलेले असल्यास रब्बी हंगामामध्ये घेऊ नये. यासाठी नियंत्रण म्हणून जमिनीची खोल नागरणी करावी. हेक्टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसून किडींवर काही प्रमाणात निर्बंध घालता येतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर ३ ते ४ फूट लांबीच्या काड्या रोवाव्यात म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे यांना पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. पिकावरील किडींचे नियंत्रण होण्यासाठी एकाच किटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून पालटून औषधे फवारावीत. हरबरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्क २५ किलो हेक्टरी पहिली फवारणी करावी. यासाठी निंबोळी पावडर १० लिटर पाण्यामध्ये रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क अलग काढावा आणि त्यामध्ये ९० लिटर पाणी टाकावे. अशे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणी नंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल (विषाणूग्रासित अळ्यांचे द्रावण) ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे.
यानंतरची किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढील प्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
1) Clorantriliprol फवारणी प्रवाही 18.5 टक्के प्रति लिटर पाण्यात 0.20 मिली किंवा 10 लिटर पाण्यात 2 मिली किंवा एकरी 40 मिली किंवा हेक्टरी 100 मिली.
2) Fluebendamide फवारणी प्रवाही 48 टक्के प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली किंवा दहा लिटर पाण्यात 2.5 मिली किंवा एकरी 50 मिली किंवा हेक्टरी 125 मिली.
3) Spinosad 45 एससी प्रवाही प्रति लिटर पाण्यात 0.4 मिली किंवा दहा लिटर पाण्यात 4 मिली किंवा एकरी 80 मिली किंवा हेक्टरी 200 मिली.
यानंतरची किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढील प्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. अश्याप्रकारे हरबरा लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेऊन स्वताचा उत्कर्ष साधून घ्यावा.
डॉ. प्रशांत मोतीरावजी घावडे, महाबीज, वाशिम – हिंगोली रोड, वाशिम