शेतकर्यांना चांगले व दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी बी-बियाणे अधिनियम १९६६ व १९६८ तसेच बियाणे नियंत्रण कायदा १९८३ लागू करण्यात आला आहे. प्रमाणात बियाणे व सत्यतादर्शक लेबलचे बियाणे प्रामुख्याने बाजारात उपलब्ध असतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत बीजोत्पादनाची नोंदणी होऊन या यंत्रणेचे अधिकारी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रास भेटी देऊन पाहाणी करतात. तयार बियाणांच्या योग्य त्या चाचण्या झाल्यानंतर अशा प्रकारच्या बियाणे पिशवीस प्रमाणपत्र बियाणे असे म्हणतात. या बियाणाचे लेबल निळ्या रंगाचे असते.
बियाणे उत्पादक अधिसूचित असलेल्या वाणाचे अगर अधिसूचित नसलेल्या वाणाचे बियाणे स्वत: बीजोत्पादन घेऊन व स्वत:च आवश्यक त्या चाचण्या घेऊन सत्यतादर्शक लेबल लावतात. यालाच सत्यतादर्शक बियाणे म्हणतात. या प्रकारच्या पिशवीला लावलेले लेबल पिवळ्या रंगाचे असते.प्रमाणित व सत्यतादर्शक लेबलवर भारत सरकारच्या निर्देशानुसार मजकूर लिहिलेला असतो. लेबलवर पिकाच्या वाणाचे नाव, लॉट नंबर, चाचणी घेतलेली तारीख, बियाणाची मुदत, उगवण, टक्केवारी, वजन, बीज प्रक्रिया केली असल्यास वापरलेल्या कीटकनाशकाचे नाव, भौतिक शुध्दता व अनुवंशिक शुध्दतेची टक्केवारी हा सर्व मजकूर लिहिलेला असतो.
१) बियाणे खरेदी करताना शक्यतो बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेली बियाणे खरेदी करावे. ते निळ्या लेबलचे असते.
२) अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून, परवानाधारक दुकानदाराकडून बियाणे खरेदी करावे.
३) खरेदी केलेल्या बियाणाची पक्की पावती विक्रेत्यांकडून द्यावी. पावतीवर घेणार्याचे नाव, जात, लॉट क्रमांक, उत्पादक कंपनीचे नाव हा तपशील लिहून घ्यावा.
४) खरेदी केलेल्या बियाणांच्या पिशवीवर पिकाचे नाव, उगवणशक्ती वगैरे माहिती निर्देश केल्याप्रमाणे असल्याचे पाहून घ्यावे.
५) पिशवीवर जो बियाणाचा दर असेल त्याच दराने बियाणे खरेदी करावे. तोच दर पावतीवर आहे का ? त्याची खात्री करून घ्यावी.
६) दुकानदार ज्यादादराने बियाणे विक्री करीत असेल तर निरीक्षक व वैधमापनशास्त्र विभाग अगर कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे तक्रार करावी.
७) नूतनीकरणाचे बियाणे असेल तर बियाणे चाचणीपासून वैध मुदत सहा महिने असते तर नवीन बियाणांची मुदत नऊ महिन्यापर्यंत असते. ते नीट पाहून घ्यावे.
८) ज्या वाणाची ज्या हंगामासाठी शिफारस केलेली आहे, त्या हंगामातच त्या बियाणांची पेरणी करावी.
९) बियाणे दोन वेगळ्या लॉटचे असतील तर एकत्रित मिसळून पेरु नयेत.
१०) बियाणे पेरणीची तारीख लिहून ठेवावी. पिशवीतून बियाणे काढताना खालच्या बाजूस भोक पाडून ते काढावेत. त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीज प्रमाणीकरणाचा टँग व्यवस्थित राहतो. बियाणाची रिकामी पिशवी, लेबल टँग, खरेदीची पावती जपून ठेवावी, म्हणजे बियाणे बोगस निघाल्यास कायदेशीर कारवाई करता येते.
संदर्भ : शेतीमित्र मासिक
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा