महाराष्ट्रात सीताफळ लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये एनएमके-1 गोल्डन सिताफळाचे क्षेत्र सरासरी 80 टक्के आहे. प्रत्येक फळझाडाची जीवनशैली थोड्या फार फरकाने वेगळी असते. तसेच प्रत्येक फळझाडाचा सुप्त अवस्थेचा काळ हा वेगळा व कमी जास्त असतो. त्या-त्या प्रमाणे पाण्याचा ताण कमी जास्त द्यावा लागतो. सर्वसाधारण फळझाडाच्या अवस्थेचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येते की, याचे जीवनचक्र कसे आहे. हाच मुळ पाया समजून आजच्या या स्पर्धेच्या जगात आपणाला जास्त उत्पादन व चांगल्या प्रतीची फळे कशी घेता येतील याचा विचार करणे गरजेचे आहे.
‘एनएमके-1 गोल्डन’ या वाणाची झाडे अतिशय काटक महाराष्ट्र व शेजारच्या राज्यातील हवामानास साथ देणारी आहेत. अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीठ अशा निसर्ग आपत्तीमुळे याला तेवढे नुकसान पोहचत नाही. तरी संरक्षण, जोपासना इत्यादी गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.
जमीनीची निवड : एनएमके-1 गोल्डनच्या अतिशय उत्तम वाढीसाठी साधारणत: हलक्या व मध्यम प्रकारची, उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, हलकी, मूरमाड, मध्यम खोली (सर्वसाधारण एक मीटर असणारी) सामु 6.75 ते 8.25 असणारी जमीन योग्य असते. अधिक खोलीच्या खारवट, चिबड, कमी निचरा होणारी, अधिक चुनखडी असलेली जमिन लागवडीसाठी अयोग्य ठरते. पाणी धरून ठेवणारी चिबड (चवाळ) जमीन असेल तर त्या जमिनीवर मोठे-मोठे बोद करून दोन बोदाच्या मधून पाण्याचा निचरा होईल, अशी जमिनीची रचना करावी. जमीन हलकी असली तरी चालते मात्र सहा इंच खोलीवर एकदम कठीण काळा पाषाण असलेली जमीन चालत नाही.
आपल्या शेताच्या आजू-बाजूला झाडाच्या गर्दीत देशी सिताफळाचे झाड वाढलेले आपणास दिसून येते, या वरूनच आपली जमीन एमएमके-1 गोल्डन या फळझाडाच्या लागवडीस उपयुक्त असल्याची खात्री आपणास येऊ शकते. भारी काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत असेल तर याची लागवड करण्यास हरकत नाही. मात्र काळ्या जमिनीत उन्हाळ्यात भेगा पडत असतील तर जमिनीची मशागत करुन घ्यावी. तसेच खोडाजवळ जमिनीची चाळणी करून घ्यावी किंवा मल्चींग करून घ्यावे.
एमएमके-1 गोल्डन लागवडीचे अंतर : एनएमके-1 गोल्डन सिताफळांच्या लागवडीसाठी दोन झाडातील अंतर 7 ते 8 फुट व झाडाच्या दोन ओळीतील अंतर 14 ते 16 फूट ठेवावे. दोन ओळीतील अंतर 14 ते 16 फूट अंतर ठेवल्यामुळे मशागत करताना यांत्रीकीकरणाचा व बैल मशागतीचा चांगला उपयोग करता येतो. लहान टॅक्टर किंवा बैलाद्वारे मशागत एकाच दिशेने करावी. 7 ते 8 फुटातून मशागत करण्याची गरज भासत नाही. ठिबकच्या लॅटरल गोळा करण्याची गरज यामुळे भासत नाही. खत आणि पाणी 7 ते 8 फुटातून सलग देता येते. एकाच बाजूने मशागत केल्यामुळे आणि आडवी मशागत न केल्यामुळे जमिनीत दिलेली खते विस्कटून बाहेर येत नाहीत. त्यामुळे खताचा परिपूर्ण उपयोग झाडांच्या मुळांना होतो. दोन ओळीतील अंतर 14 ते 16 फुट ठेवल्यामुळे मजुरांना कामासाठी ये-जा करणे सोपे होते. तसेच मजुरांना डोक्यावरून खताची वाहातूक, फळांची वाहातूक करणे सोयीचे होते.
लागवडीचे अंतर वाढल्यास त्याच्या प्रमाणात झाडांची उंची वाढते. त्यामुळे सहज हाताने फळे काढता येत नाहीत. फळे काढण्यासाठी तारेच्या आकडीचा वापर करावा लागतो. किंवा झाडावर चढून काढावी लागतात. त्यामुळे फळांना इजा होते व फळे काळी पडतात. परिणामी बाजारात त्यांची गुणवत्ता ढासळते. शिवाय फळ काढणीसाठी मजुरीमध्येही वाढ होते.
खड्डे भरणे : एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीसाठी खड्डे घेताना त्याची लांबी, रुंदी व खोली दोन फुटाची असावी. शक्यतो खड्डे घेताना उन्हाळ्याच्या सुरूवातीला करावेत. म्हणजे उन्हाळ्यात ते उन्हाने चांगले तळतात. मे महिन्यात ते खड्डे भरण्यासाठी घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात खालून एक फूट उंचीमध्ये काडी-कचरा किंवा पाला-पाचोळा आणि अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकून तो भरून घ्यावा. वरच्या एक फूटामध्ये चांगले कुललेले शेणखत 10 ते 15 किलो, निंबोळी पेंड 250 ते 500 ग्रॅम, सुपर फॉस्फेट एक किलो, पोटॅश 100 ग्रॅम हे मिश्रण मातीत चांगले मिसळून ते खड्ड्यात भरावे. खड्डा भरताना तो जमिनीच्या समांतर न भरता त्यापेक्षा तीन ते चार इंच उंच येईल असा भरावा. हलकी जमीन असल्यास या मिश्रणात तलावातील पोयटा आठ ते 10 पाट्या टाकावा. त्यानंतरच ते खड्ड्यात टाकूण खड्डा भरून घ्यावा.
डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे, गोरमाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर. मोबा. 9923137757, 9881426974
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा