महाराष्ट्र राज्यातील रबी हंगामातील हरभरा हे प्रमुख डाळवर्गीय पीक असून ते राज्यात साधारणत : 12:50 लक्ष हेक्टर क्षेत्रावर घेतले जात असून त्यापासून एकूण साधारणत: उत्पादन 9.50 लक्ष मेट्रीक टन मिळते. कमी उत्पादनाच्या विविध कारणांपैकी किडीपासून विशेषत: घाटे अळीपासून पिकाचे सर्वसाधारण 30 ते 40 टक्के नुकसान होते.
घाटे अळी हरभर्याप्रमाणेच कापूस, ज्वारी, मका, टोमॅटो, लुसर्न-गवत, तुर आणि इतर कडधान्य पिकांवर सुद्धा आढळून येते. परंतु हरभरा हे तिचे सर्वात आवडते खाद्य असल्याने तिला घाटेअळी म्हणून ओळखले जाते. या किडीच्या जीवनाच्या अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्था असून अळी अवस्थेपासून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकर्यांनी जागरूक राहून किडीची ओळख करून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा वापर करावा.

घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून, या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या, शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फक्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोर्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन : उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे मरतात. गहु, मसुर, मोहरी, अथवा जवस आंतरपीक घेतल्यास घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकावर घाटे अळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रु किटक म्हणजे शेतकर्यांचे मित्र कार्यरत असतात व ते आपल्या उपजिवीकेतून घाटे अळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करीत असतात. त्यामुळे अनावश्यक रासायनिक किटकनाशकांचा वापर केल्यास हे नैसर्गिक शत्रु किटक नाहक मारले जातात व त्यामुळे नैसर्गिक शत्रु किटकांची संख्या कमी होऊन घाटेअळीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होत नाही. त्यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढून उद्रेक होण्याची शक्यता असते. नैसर्गिक शत्रु किटक जसे क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल व रेड्युव्हीड ढेकून तसेच घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. परंतु किटकनाशकाची फवारणी केल्यास ते किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होण्यासाठी शेतामध्ये पक्षी थांबे उभारावे (प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे).
शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोर्यावर आल्यानंतर सर्वप्रथम वनस्पतीजन्य किंवा जैविक किटकनाशकांचा प्राध्यान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी निबोळी अर्क पाच टक्के किंवा अॅझॅडीरॅक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा अळ्या दिसू लागताच घाटे अळीचा विषाणू एचएनपीव्ही हेक्टरी 500 एल ई अधिक 50 ग्रॅम राणीपाल किंवा वातावरण सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्यास ब्युव्हेरीया बॅसीयाना या जैवीक बुरशीनाशक 60 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे करावी. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन नैसर्गिक शत्रु किटकांना अपाय न होता त्यांची सुद्धा घाटेअळीची नियंत्रण करण्यास मदत होईल.
त्यानंतर घाटेअळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यासच (सरासरी एक अळी प्रति मिटर ओळीत किंवा पाच टक्के नुकसान) शिफारशीत रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. अन्यथा फवारणी टाळावी. वरील प्रादुर्भाव पातळी गाठल्यानंतर फवारणी केल्यास आपल्या उत्पादनामधील घट टाळून फवारणीचा खर्च भरून निघेल अन्यथा फवारणीचा खर्च वाया जाऊ शकतो याची शेतकरी बंधूनी कृपया नोंद घ्यावी.
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्निालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली, इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के तीन ग्रॅम, डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही दहा मिली लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन पाच टक्के प्रवाही दहा मिली क्लोरॅट्रॅनिलोप्रोल 18.5 टक्के प्रवाही 2.5 मिली या प्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकांचे प्रमाण तीप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसाचे अंतराने करावी.
डॉ. अनिल व्हि. कोल्हे / डॉ. धनराज बी. उंदीरवाडे किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.