देशभरात आंब्यांच्या अनेक जातीची लागवड केली जाते. पण, यामधील हापूस आंबा सर्वात लोकप्रिय आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. बाजारात दिसणारा प्रत्येक पिवसर आंबा हा हापूसच आहे, अशी अनेक ग्राहकांची समजूत असते. अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा याबाबत खास टिप्स.
ग्राहक मुख्यतः पिकलेला आंबा विकत घ्यायला बाजारात जातात. मात्र बाजारपेठेतील स्पर्धेमुळे बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असते. एखाद्या आंब्याला असलेल्या दरापेक्षा जास्त दर मिळावा, यासाठी विक्रेत्यांकडून ही फसवणूक केली जाते. तर ग्राहकालाही त्यातील फारसे ज्ञान नसल्यामुळे त्यांची नकळत फसवणूक होते. त्यावेळी तुम्ही अगदी मोजक्या निकषाच्या आधारावर फसवणूक थांबवू शकता.
देवगडचा आंबा हा डोंगरी भागातून येतो. त्या प्रदेशात असणाऱ्या जास्त ऊन्हामुळे या आंब्याला वरच्या बाजूला लालसर रंग येतो. यावरून हा आंबा डोंगरी भागातून येणारा अस्सल देवगडचा आंबा आहे, हे लक्षात येऊ शकते. बाहेर असणाऱ्या केशरी रंगा प्रमाणेच आंबा कापून आतला रंग पाहिला, तर तो देखील केशरीच असतो.
रत्नागिरीचा आंबा हा वरच्या बाजूने जास्त केशरी रंगाचा असतो. तो आतमध्येही केशरीच पाहायला मिळतो. हा आंबा पिकल्यावर वरच्या बाजूला सुरकुत्या दिसतात.
कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणी पिकवलेल्या आंब्याला कसलाच वास नसतो. शिवाय या आंब्याचा रंग आतून पिवळा असतो. तसेच या आंब्याची साल देखील हापूस आंब्याच्या तुलनेत जाड असते.
कोकणात पिकवलेल्या हापूस आंब्याची साल ही पातळच असते. तर तो आतून केशरीच असतो. ज्यावेळी एखादा ग्राहक आंबा विकत घेत असेल, तेव्हा विक्रेत्याला आंबा कापून देण्यास सांगू शकतो. हापूस आंब्याचा वास देखील अत्यंत मधुर येतो. हापूस आंब्याची खासियत म्हणजे त्याच्या वासाबरोबरच त्याची चवही मधुरच असते.
वर्षातून काही ठराविक महिनेच हापूस आंबा खायला मिळतो. तो खाताना देखील आपली फसवणूक होऊ नये, यासाठी या सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपली होणारी फसवणूक थांबते.
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇