इंग्रज भारतात येण्यापूर्वी जमीनधारणा पद्धतीत जमिनीवर कोणा एका व्यक्तीची अगर कुटूंबाची खाजगी मालकी नव्हती. इंग्रज येथे आले आणि जमीन धारणेच्या बाबतीत दोन महत्त्वाचे बदल त्यांनी केले. जमिनीवर खाजगी मालकी आणली. जमीन महसूल आकारणी पिकांच्या उत्पादनाऐवजी जमीन धारणेवर व तीही रोकड पैशात वसूल केली जाऊ लागली. भारताच्या शेती व्यवसायात पुढे ज्या समस्या निर्माण झाल्या, त्यांच्या मुळाशी हे दोन बदल कारणीभूत आहेत.
जमीन धारणेत खाजगी मालकी हक्क निर्माण केल्यामुळे जमिनीचे हस्तांतर होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. व महसूल आकारणींच्या नव्या पद्धतीमुळे शेतकरी सावकारी पाशात अडकत गेला, तसेच पारंपारिक वहिवाटीने जमीन कसणार्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन मजूर बनले तर ज्यांनी कधी जमीन कसली नव्हती असे बाहेरून आलेले सावकार जमीन मालक बनले व जमीन न कसणार्या ‘गैरहजर’ मालकाचा एक वर्ग तयार झाला. अशा प्रकारे जमिनीच्या व्यवहारात सौदेबाजी निर्माण करण्यात आली.

हरितक्रांतीनंतर आलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या सोयीसाठी धारण जमिनीच्या एकत्रीकरणाच्या धोरणामुळे अल्पभूधारक बनले तर ज्याच्याजवळ पैसा व सत्ता होती ते बडे शेतकरी बनले. या पाच टक्के बड्या बागायतदार शेतकऱ्यांनी नफ्यावर आधारित व्यापारी रासायनिक शेतीच्या मार्गाने जमीन, पाणी व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीची प्रचंड लूट केली. हा बागायतदार शेतकरी ऊस, केळी, द्राक्षासारखे जास्त पाणी लागणार्या नगदी पिकाचे उत्पादन घेऊ लागला. तसेच नफ्याच्या लालसेने गरज नसताना ही व्यापारी मानसिकता अल्पभूधारक (65 टक्के) व लहान-मध्यम (30 टक्के) थरातील 95 टक्के कोरडवाहू शेतकऱ्यांच्या डोक्यात भिनली. हा शेतकरीही उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक पद्धतीने कापूस, सोयाबीन, सूर्यफुल, बटाटे इत्यादी नगदी पिकांचे उत्पादन घेऊ लागला. त्यामुळे अन्नधान्याच्या पिकाचे क्षेत्र व उत्पादन कमी झाले. त्यामुळे या सामान्य शेतकर्यासहित गरीब जनतेची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे.
आहेरे-नाहीरे वर्ग : गेल्या साठ वर्षाच्या केंद्रित मुक्त भांडवली विकास प्रक्रियेतून भारतात 30 टक्के लोकांचा आहेरे वर्ग व 70 टक्के गरीब जनतेचा नाहीरे वर्ग तयार झाला आहे. आहेरे वर्गात भांडवलदार-व्यापारी, बडे बागायतदार, उच्चमध्यम वर्ग, मध्यम-मध्यमवर्गाचा समावेश होतो व नाहीरे वर्गात शहरातील कनिष्ट मध्यमवर्ग, बेरोजगार आणि ग्रामीण भागातील लहान-मध्यम व अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि आदिवासींचा समावेश होतो. औद्योगिक कारखान्यातील महागड्या चैनीच्या वस्तू, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, शेती उत्पादीत धान्य खरेदी करण्याची क्षमता फक्त या आहेरे वर्गातच आहे. नाहीरे वर्गामध्ये क्रयशक्तिच नसल्यामुळे जीवनावश्यक अन्नधान्यही ते खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात कुपोषण, भूकबळी व आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
व्यापारी सेंद्रिय शेती : गेल्या पंधरा वर्षात विविध संस्था-संघटनांनी व शासनाने सेंद्रिय शेतीचा जो प्रचार केला तो प्रामुख्याने बागायत क्षेत्रात ऊस, केळी, द्राक्षासारखे व्यापारी पीक घेणार्या शेतकर्यात व कोरडवाहू क्षेत्रात कापसासारख्या नगदी पीक घेणार्या शेतकर्यात केला. काही थोड्या प्रमाणात अन्नधान्याचे पीक घेणार्या शेतकऱ्यांत प्रचार केला.
सेंद्रिय शेती मालाला जास्त पैसे मोजणारा परदेशी ग्राहक व देशातील 30 टक्के आहेरे वर्गातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवूनच सेंद्रिय शेतीमाल पिकविण्यास शासन व विविध संस्था शेतकऱ्यांना सांगत आहेत. वरील ग्राहकच जास्त पैसे मोजून सेंद्रिय शेतीमालाचा उपभोग घेत आहेत. यामुळेही 70 टक्के नाहीरे वर्गाची अन्नसुरक्षा धोक्यात येत आहे. व्यापारी रासायनिक शेतीतील ‘नफ्याची प्रेरणा’ कायम ठेवून सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन घेतल्यामुळे व तसा प्रचार केल्यामुळे असे घडत आहे. असे घडण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अद्याप 70 टक्के नाहीरे वर्गाच्या मुलभूत प्राथमिक गरजा लक्षात घेऊन आणि निसर्ग केंद्री सेंद्रिय शेतीचा व्यापक आशय लक्षात घेऊन 95 टक्के सामान्य कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची व्यापक चळवळ सुरूच झालेली नाही. शासन संस्था व भांडवली राजकीय पक्ष-संघटना या 95 टक्के शेतकऱ्यांचे व नाहीरे वर्गाचे हितसंबंध सांभाळण्याचे काम करीत नसल्यामुळे ते हे काम करणार नाहीत. ज्या संस्था-संघटनांनी व राजकीय पक्षांनी या शेतकऱ्यांच्या व नाहीरे वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण व संवर्धन करण्याचे काम स्विकारले आहे. तेच या शेतकऱ्यांना संघटीत करून व्यापक सेंद्रिय शेतीची चळवळ वाढविण्याचे काम करतील, तेव्हाच 70 टक्के नाहीरे वर्गाच्या मुलभूत गरजांची पूर्तता होईल तसेच या 95 टक्के शेतकऱ्यांचे आणि 70 टक्के नाहीरे वर्गाच्या हितसंबंधाचे तसेच नैसर्गिक साधन-संपत्तीचे रक्षण व संवर्धन होईल.
सेंद्रिय-शेतीची आचारसंहिता : रासायनिक शेतीची पद्धत शेतकरी, जमीन व निसर्गाचे शोषण करणारी आहे. त्याऐवजी शेतकरी, जमीन व निसर्गाचे पोषण करणार्या सेंद्रिय शेती पद्धतीने शेती करणे जरूरीचे आहे. त्यासाठी खालील आचारसंहिता पाळावी लागेल.
निसर्गाचा समतोल राहील अशी जीवन पद्धती स्विकारा. निसर्ग चक्राचे नियम समजून घेऊन उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा संतुलित वापर करा. पाणी, वीज व इंधन यांचा काटकसरीने वापर करा. जमिनीतील पन्नास (50) फुटाखालचे पाणी शेतीसाठी वापरू नका. ते फक्त पिण्यासाठीच वापरा. निसर्गाच्या कार्यप्रणालीमध्ये कमीत-कमी हस्तक्षेप करा. पाणी, जमीन व हवा प्रदूषित होणार नाही व पर्यावरणाचे संरक्षण होईल यासाठी दक्ष रहा. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तिच्यातील जैविक घटकांचा समतोल राखा. जैविक क्रियाद्वारे विघटन न होणार्या वस्तू व परदेशी वस्तू यांचा वापर टाळा. तयार होणार्या मालाचा दर्जा सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यास पोषक होईल याची खबरदारी घ्या. हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके वापरू नका. जमिनीची यांत्रिक मशागत व खोल नांगर करू नका. जमिनीची मशागत करणारे गांडूळासारखे लाखो जीवाणू शेतात वाढतील असे वातावरण तयार करा. गांडूळ खत विकत आणून घालू नका. पिकाला पानाद्वारे सूर्यप्रकाश व मुळाद्वारे हवा जास्तीत-जास्त उपलब्ध होईल याची काळजी घ्या. त्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी द्या. पिकाला कायम वापसा स्थितीत राहण्यासाठी सरी-वरंबा पद्धतीने लागवड करा. शेतातील माती वाहून जाऊ नये व पडलेले पावसाचे पाणी जमितीतच जिरावे यासाठी बांध-बंदीस्त करा. जमिनीवर किमान एक हिस्सा सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन राहील अशी पीक पद्धत बसवा. त्यासाठी एकदल-द्विदल धान्याचे हिरवळीचे पट्टे मुख्य पिकात पेरा. त्यामुळे पिकासाठी हवे ते अन्नघटक जागेवर पुरविणारे असंख्य जीवाणू जमिनीत वाढतील. पिकाचा पालापाचोळा, काड, तुस, पाचट, तण, धसकट यांचा आच्छादन म्हणून वापर करा. फेरपालटद्वारे बेवड, मिश्रपिक, आंतरपीक व सहजीवन पीक पद्धत वापर सलग पीक पद्धत टाळा. कमी ओलाव्यावर येणारे व नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती असणारे गावरान बियाणेच वापरा. पिकाचे उत्पादन काढण्यासाठी लागणारी संसाधने शेतातच निर्माण करा. उपलब्ध शेण व गोमुत्राचा पिकास रबडी देण्यासाठी वापर करा. दोन दिवसातून किमान एकदा मातीशी, पिकाशी हितगुज करीत फिरा. त्याशिवाय पिकाची व मातीची देहबोली कळणार नाही. पिकावरील उपद्रवी आळ्या, किडी खाण्यासाठी पक्षांना शेतात बोलवा, त्याकरीता पिकात सूर्यफुल, बाजरी, ज्वारीची काही धाटे मिश्र स्वरूपात ठेवा. स्वावलंबनासाठी किमान गरजांवर आधारीत कुटूंबव्यवस्था विकसित करा. त्यासाठी सर्व चैनीच्या, हव्यासाच्या गरजा टाळा. आपल्या कुटूंबासाठी प्रत्येक फळाचे किमान एक झाड शेतात लावाच. स्वावलंबी शेतीसाठी व कुटूंबासाठी किमान एक गावरान (देशी) गाय सांभाळा. शेतीविषयी वाचन, सभा, मेळावे, शिबीरे, प्रदर्शन पाहणी व प्रात्यक्षिके, भेटी माध्यमांचा वापर करून आपले ज्ञान वाढवत रहा. सेंद्रिय शेती कष्टाची, विचाराची, अभ्यासाची व तन, मन, बुद्धीने करायची असल्यामुळे झटपट विनासायास यशाची अपेक्षा न करता संथ गतीने शाश्वत विकासाचा ध्यास धरा.
शेतकऱ्यांनी वरील आचारसंहिता पाळल्यास त्यांचे शेती उत्पादन, जमिनीची उत्पादनक्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, शेती उत्पादन खर्च कमी होईल. जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, शेती उत्पादन खर्च कमी होईल व सर्वांना शुद्ध हवा, पाणी व अन्न मिळेल. त्यामुळे सर्व मानवी जीवन आनंदी होण्यास मदत होईल.
संदिपान बडगिरे ‘सावली’ आनंदनगर, लातूर. मो : 9823674082