महाराष्ट्रात लाव्ही पालन हा व्यवसाय लोकप्रिय झालेला नाही. याचे कारण म्हणजे या व्यवसायाबद्दल पशुपालकास शास्त्रशुद्ध माहिती नाही. हे पक्षी आकाराने लहान असल्यामुळे कमी जागेत ठेवता येतात आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूकही कमी लागते. ग्रामीण भागातील स्त्रिया व मुलेही हा व्यवसाय सहज करु शकतात.
लाव्ही पक्षी पूर्व आशिया खंडात व जपानमध्ये पूर्वीपासून आढळतो. हा जमिनीवर राहणारा पक्षी वर्गात येणारा व स्थित्यंतर करणारा आहे. 11 व्या शतकात त्यांना गाणारा पक्षी म्हणून जपानच्या राजांकडून पाळले गेले. त्यानंतर त्याच्या मांस व अंड्याचा उपयोग लक्षात आल्यानंतर 1910 पासून मांस व अंडी उत्पादनासाठी पालन करण्यात येऊ लागले. या पक्षाच्या विविध जाती विकसित करण्यात आल्यानंतर सदरील जातींचे मांस व अंडी उत्पादन जपान, तैवान, चीन आणि कोरिया या देशात होते. दुसर्या महायुद्धानंतर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी वाढवले गेले. मागच्या काही दशकामध्ये युरोप व मध्य पूर्वेकडील देशामध्ये हा पक्षी प्रसिद्ध होऊन एक आवश्यक अन्न पदार्थ म्हणून मान्यता पावला. आज जगामध्ये कोंबडीपालन व बदक पालनानंतर सर्वात मोठा व्यवसाय म्हणून प्रसिद्ध होऊ पाहात आहे.
भारतातही लाव्ही पक्षांचे मांस आवडीने खाल्ले जाते. लाव्हीचे तंदुरी विशेष प्रसिद्ध आहे. भारतीय जंगलामध्ये रेन लाव्ही नावाची जात प्रामुख्याने आढळून येते. या जातीच्या पक्षांचे व्यवसायिकरित्या संगोपन करण्यास आणि विक्री करण्यास परवानगी नाही.
जगभर आढळणार्या लाव्ही पक्षांच्या अनेक जाती पैकी जपानी लाव्ही (कॉटरनिक्स, कॉटरनिक्स जॅपोनिका) ही जात व्यापारीपद्धतीत लाव्ही पालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतात इ.स. 1974 साली जपानी लाव्हींची कॅलिफोर्निया येथून प्रथम आयात करण्यात आली. गेल्या तीन दशकांच्या अखंड संशोधनानंतर लाव्हीपालन व्यवसायाचे दालन इच्छुकांसाठी आता उघडे झाले आहे. सरकारी परवाना घेऊन या लाव्हीचे व्यावसायिक पालन करणे आता शेतकर्यांनाही सहज शक्य आहे.
भारतीय कुक्कुटपालन व्यवसायास लाव्हीपालन नवी दिशा देत आहेे. कोंबडीपालन व्यवसायासाठी लागणार्या भांडवलापेक्षा कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय म्हणजे लाव्ही पालन. पंजाब, हरियाणा या राज्यात हा व्यवसाय लोकप्रिय आहे. परंतु महाराष्ट्रात हा व्यवसाय लोकप्रिय झालेला नाही. याचे कारण म्हणजे या व्यवसायाबद्दल पशुपालकास शास्त्रशुद्ध माहिती नाही. हे पक्षी आकाराने लहान असल्यामुळे कमी जागेत ठेवता येतात आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूकही कमी लागते. ग्रामीण भागातील स्त्रिया व मुलेही हा व्यवसाय सहज करु शकतात.
लाव्ही अतिशय झपाट्याने वाढणारा पक्षी आहे. एक दिवसाचे पिल्लू फक्त सहा ग्रॅम वजनाचे असते. साधारणत: पाच आठवड्यात हे पक्षी 150 ग्रॅम ते 180 ग्रॅम वजनाचे होतात आणि असे पक्षी बाजारात मांसासाठी विकता येतात. वयात आलेले लाव्ही पक्षी साधारणत: सहा ते सातव्या आठवड्यापासून अंडी देऊ शकतात. या पक्षांची अंडी साधारणत: 10 ते 17 ग्रॅम वजनाची असतात. या अंड्यामध्ये 74 टक्के पाणी, 13 टक्के प्रथिने, 11 टक्के स्निग्ध पदार्थ, एक टक्के कार्बोदके, तर लाव्हीच्या मांसामध्ये 73.43 टक्के पाणी, 20.54 टक्के प्रथिने, 3.75 टक्के स्निग्ध पदार्थ, 0.56 टक्के कार्बोदके, 1.12 टक्के क्षार असतात.
लाव्ही पक्षांची अंडी उकडून स्वादिष्ट व रुचकर होतात. किंवा लोणचे बनवून खाण्यासाठी वापरतात. लाव्ही पक्षांचे मांस तर अतिशय स्वादिष्ट रूचकर आणि अनेक औषधी गुणधर्मयुक्त म्हणून प्रसिद्ध आहे. उत्तम पोषणमूल्ये असणारे मांस शक्तीवर्धक आणि बुद्धीवर्धक असल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच लहान मुलांच्या वाढीच्या वयात तसेच गर्भवती व बाळंत स्त्रियांच्या आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. उत्कृष्ट प्रतीची प्रथिने आणि अत्यल्प कोलेस्टेरॉलचे प्रमाण असल्यामुळे लाव्ही पक्षांचे मांस हे हृदयरोगी व टी.बी. ग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. लैंगिक क्षमता वाढविणारे औषधी गुणधर्मही या मांसात आढळून आले आहेत. केरळात आज देखील दमा विकारावर औषध म्हणून लाव्हीची अंडी वापरली जातात.
लाव्ही संगोपनाच्या पद्धती : लाव्हीपालन डीप लिटर व पिंजरा पद्धत या दोन्ही पद्धतीने करता येते. जागा निवडताना हवेशीर मुख्य रस्त्यापासून दूर, पाणी, रस्ता व विजेची सोय असावी जमीन निचरा होणारी व दलदल नसणारी निवडावी, अशा ठिकाणी लाव्ही संगोपनाचे शेड बांधावे, हे शेड पक्षांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करेल असे असावे. शेडची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. दक्षिण-उत्तर दिशेला जाळी लावावी. पक्षी येण्यापूर्वी साफसफाई व निर्जंतुकीकरण करून घ्यावे व ब्रुडींगची तयारी करून घ्यावी. एक दिवसाची पिल्ले साधारणत: सहा ग्रॅम वजनाची असतात. ही पिल्ले घेतल्यास मरतुकीचे प्रमाण वाढते. याची एक आठवडे वयाची पिल्ले सुद्धा मिळतात. अशी पिल्ले घेतल्यास मरतुकीचे प्रमाण अतिशय कमी असते. या पिल्लांना कोंबडीच्या पिल्लाप्रमाणेच उष्णतेची आवश्यकता असते.
खाद्य व्यवस्थापन : लाव्ही पक्षांना पाच आठवड्यांमध्ये 150 ते 180 ग्रॅम वजन होण्यासाठी साधारणत: 500 ग्रॅम खाद्य लागते. लाव्ही पक्षांसाठी खास वेगळे अन्न घटकाच्या आवश्यकतेनुसार खाद्य बनवावे लागते. खाद्याचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन व विक्री अजूनही उपलब्ध नाही. हे खाद्य कोंबडी खाद्याप्रमाणेच मका, तांदूळ, कणी, गहू भुस्सा, सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल इत्यादी पेंड तसेच क्षार मिश्रण, जीवनसत्वे वापरुन बनवता येते. मांसासाठीच्या लाव्हीसाठी खाद्य दोन प्रकारचे असते. स्टार्टर व फिनिशर.
रोग व लसीकरण : या पक्षांमध्ये कोंबडीच्या तुलनेत आजार अतिशय कमी आढळतात. या पक्षांना कोणत्याही लसीकरणाची आवश्यकता नसते. रोगाच्या बाबतीत या पक्षांना अलसरेटीव एजट्रायटीस रोग बाधा बर्याच वेळेला आढळून येते. यासाठी प्रतिजैवकाचा वापर करून रोग नियंत्रण करता येते.
ब्रॉयलर लाव्हीपालनाचे अर्थशास्त्र : लाव्ही पालनाचे अर्थशास्त्रासाठी प्रत्येक आठवड्याला दोन हजार पिल्ले घेऊन विक्री योग्य 1800 पक्षी ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या ग्रहितकावर आधारित आहे. यामध्ये प्रतिवर्ष एक लाख चार हजार पिल्ले पाळली जातील व 93 हजार 600 विक्री योग्य पक्षी तयार होतील. डॉ. पी. व्ही. कदम कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर.