निलगिरी हे झाड सदाहरीत असून सरळ व जलद वाढणारे आहे. हे झाड मूळचे ऑस्ट्रेलियातील आहे. याचे फळ मिरटेशिया आहे. निलगिरी वृक्षाच्या 140 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात 1843 च्या काळात या वृक्षाची निलगिरी पर्वत रांगेत प्रथमत: लागवड लावण्यात आली. भारतात निलगिरीच्या 16 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. निलगिरीचा पर्णभार म्हणजे शाखा विस्तार फारच माफक असतो. त्यामुळे खोड सरळ व जास्त लांबीचे असते. हा वृक्ष कृषीवनिकी पद्धतीमध्ये लावण्यास योग्य आहे. या वृक्षात 47 अंश सेल्सिअस पर्यंत अधिकतम तापमान व तीन अंश सेल्सिअस न्यूनतम तापमान सहन करण्याची क्षमता आहे. त्याच्या वाढीसाठी 600 ते 1800 मिमी सरासरी पर्जन्यमानाची आवश्यकता असते.
जमीन व हवामान : निलगिरी वृक्षाच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची वरकस, मुरमाड, रेताड काही प्रमाणात क्षारयुक्त जमीन चालते. खोल व उत्तम निचर्याच्या जमिनीत निलगिरीची वाढ फारच झपाट्याने होते. पावसाळ्यानंतर सिंचनाची सोय असल्यास निलगिरीचे झाड हवामानातील बदलास न जुमानता वाढ शकते. निलगिरीच्या वाढीसाठी प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असते. या वृक्षात फुटवे फुटण्याची फार जास्त क्षमता असल्याने एकदा लागवड केल्यानंतर चार ते पाच वेळा तोडणी करून रोपवनांचे पुनरूज्जीवन खोडवा पद्धतीने तयार करता येते.
रोपवाटिका तंत्रज्ञान : निलगिरीची रोपवाटिका तयार करण्यासाठी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. बारमाही व हंगामी तणांचा त्रास असणारी जागा निवडू नये. रोपवाटिकेची जागा रस्त्याच्या जवळ, बारमाही पाण्याची सोय असलेली, प्रखर सूर्यप्रकाश व वादळापासून रोपे सुरक्षित रहातील व जनावरांचा उपद्रव होऊ नये म्हणून कुंपण असलेली असावी. निवडलेली जागा एका फुटापर्यंत नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. जमिनीचा उतार पाहून व काम करण्यास योग्य असे गादी वाफे करावे व गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे.
निलगिरी वृक्षाची फळे जानेवारी ते मार्च दरम्यान तयार होतात. फळे पूर्ण पक्व होण्याच्या थोडे अगोदर गोळा करावी व सावलीत पसरून ठेवावी. एक ते दोन दिवसात फळे उघडून आतील ‘बी’ बाहेर पडते. हे बियाणे तीन ते सहा महिन्यापर्यंत साठवण करता येते. रोपवाटिकेसाठी शक्यतो ताजे बियाणे वापरावे. रोपवाटिका जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत करता येते. निलगिरीचे बियाणे फार लहान असल्याने गादी वाफ्यावर टाकण्याअगोदर बारीक माती किंवा राखेमध्ये मिसळून घ्यावे. बियाणे गादीवाफ्यावर टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण्यासाठी बारीक रेतीचा थर द्यावा. पाणी देताना बियाणे जागेवर रहावे यासाठी वाफ्यावर वाळलेले गवत अथवा पाचट पसरावे. ‘बी’ पेरल्यानंतर तीन ते चार दिवसात उगवण सुरू झाल्यानंतर गवत हलक्या हाताने अलगद काढावे. निलगिरीची रोपे नाजूक व लहान असल्याने सकाळ-संध्याकाळ गरजेनुसार झारीने वाफ्यावर पाणी द्यावे.
लागवड व व्यवस्थापन : रोपे 10 ते 15 दिवसात चार ते पाच पानांची झाल्यावर अलगद काढून पॉलिथीन पिशवीमध्ये पुनर्लागवड करावी लागते. पुनर्लागवडीनंतर पिशव्या आठ ते दहा दिवस सावलीत ठेवून त्या नंतर मोकळ्या जागेत अथवा शेडनेट मध्ये ठेवाव्या. पुनर्लागणीसाठी 20 बाय 14 सें.मी. आकाराच्या 200 गेजच्या पिशव्या वापराव्यात. रोपवाटिकेत रोपे उगवण झाल्यानंतर अथवा पुनर्लागण केल्यानंतर पिवळी पडू लागल्यास 20 ग्रॅम फेरस सल्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
निलगिरीच्या लागवडीसाठी निरोगी बळकट, खोड व मुळांची योग्य वाढ झालेली तसेच 30 ते 40 सें.मी. उंचीची सहा ते आठ महिन्यांची रोपे निवडावीत. निलगिरीच्या लागवडीसाठी 2 बाय 2, 3 बाय 3 किंवा 2 बाय 3 मिटर अंतर योग्य आहे. प्रत्येक झाडाला चांगल्या वाढीसाठी कमीत कमी तीन ते चार चौरस जागा असावी. उन्हाळ्यात 30 बाय 30 बाय 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात 25 ते 30 ग्रॅम मिथील पॅराथिऑनची पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरूवातीस चांगली ओल झाल्यानंतर रोपांची लागवड करावी.
मशागत : लागवडीच्या पहिल्या दोन ते तीन वर्षांत तण नियंत्रण, नांगरणी, वखरणी झाडाच्या वाढीस फायद्याचे ठरते. सिंचन सुविधा असणार्या क्षेत्रात पहिली तीन ते चार वर्षे महिन्यातून किमान एकदा पाणी द्यावे. रोपांना खते दिल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. रासायनिक खते पावसाळा सुरू झाल्यानंतर झाडांच्या बुंध्यापासून 25 ते 50 सें.मी. दूर गोलाकार पद्धतीने द्यावीत. निलगिरीसाठी 150 किलो डायअमोनियम फॉस्फेट व युरीया प्रति हेक्टरी द्यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. कित्येक वेळा रोपांच्या खालील फांद्या छाटणी करतात. पण ही पद्धत चुकीची आहे. रोपे जसजशी मोठी होतात तसतशा खालच्या फांद्या नैसगिकरित्या गळून पडतात.
निलगिरी अत्यंत जलद गतीने वाढणारे झाड असून त्याचे आयुष्यमान 8 ते 15 वर्ष ठरविण्यात आले आहे. साधारणपणे तीन बाय दोन मीटर अंतराने लागवड केलेले वृक्ष जमिनीच्या पोतानुसार आठ ते दहा वर्षांत 20 ते 25 मीटर उंच व 20 ते 30 सें.मी घेराचे होतात. निलगिरीची लागवड मुख्यत्वे कागद गिरणीसाठी, वासे किंवा सरपण उत्पादनासाठी असल्यास वृक्षाचे आकारमान फारसे महत्त्वाचे ठरत नाही.
निलगिरी तोड केल्यानंतर बुंध्यास फुटवे फुटतात. या गुणधर्मामुळे निलगिरीचा लागवड केल्यानंतर किमान चार ते पाच वेळा खोडफुटव्यापासून उत्पादन घेता येते. झाड तोडताना जमिनीचे वर सहा इंचापेक्षा जास्त बुंधा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बुंध्यावर तिरपा काप घ्यावा. तोडणीनंतर बुंध्यास अनेक फुटवे फुटतात. फुटवे चार ते सहा महिन्याचे झाल्यानंतर दोन ते तीन जोमाने व सरळ वाढलेले नवीन फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत.
निलगिरीचे अनेक प्रकारे उपयोग करता येतात. निलगिरी लाकूड टणक आणि जड आहे. निलगिरीचा बल्ल्या म्हणून, खांब, छपरासाठी व इमारती लाकडासाठी उपयोग करता येतो. निलगिरी लाकूड सावकाश जळते व लाकडापासून कोळसाही चांगला तयार करता येतो. निलगिरीचा महत्त्वाचा उपयोग लगदा तयार करण्यासाठी आहे. लगद्यापासून मोठ्या प्रमाणात पेपर तयार करण्यात येतो. तसेच लाकडापासून हार्डबोर्ड, पार्टिकल बोर्ड, प्लायवूड तयार करता येते. निलगिरीच्या पानांपासून तेल काढता येते. हे तेल अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्मासाठी वापरण्यात येते.
निलगिरी लागवडीमुळे पाण्याचा स्तर खालावत असल्याची चर्चा ऐकू येते. निलगिरी वृक्ष इतर वृक्षांच्या तुलनेत जास्त पाणी ओढतो हे जरी सत्य असले तरी त्याची वाढ व उत्पादनक्षमता लक्षात घेता ही बाब नगण्य आहे. निसर्ग शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार निलगिरी लागवडीमुळे पाणथळ जमिनीचा पोत सुधारतो.
जाती : जगात निलगिरी वृक्षाच्या 140 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतात निलगिरीच्या 16 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यापैकी युकॅलिप्टस, कमांड्युसिस, सिट्रीडोरा, ग्लोब्युलस, ग्रॅडीस व ट्रेरीटोकॉर्नीस या जाती कोरडवाहू तसेच दुष्काळाला प्रतिकारक जाती आहेत.
हेही वाचा :
सुरूवृक्षा लागवडीचे व्यापारी उत्पादन तंत्र
सागाची जलद वाढ होण्यासाठी
बांबू लागवडीनंतर कशी घ्यावी काळजी ?
रोग व कीड व्यवस्थापन : निलगिरीच्या रोपांना रोपवाटिकेत फ्यूजारियम नावाच्या बुरशीमुळे रोग होतो. सतेच बियाणेकूज आणि रोपे उन्मळून पडणे इत्यादी रोग आढळून येतात. त्यासाठी रोपवाटिकेतील गादीवाफ्यावर 0.1 टक्के कार्बेन्डेझीम मिसळावे, तसेच बियाण्यास थायरम नावाचे बुरशीनाशक चोळावे. रोपे करपून मरत असल्यास डायथेन-एम-45 या रोगनाशकाची 0.05 टक्के प्रमाणे फवारणी करावी. रोपवाटिकेत वाळवी, हुमणी, रोपे कापून टाकणारी अळी, उकरी व खोड पोखरणारी अळी इत्यादी किडींचा उपद्रव आढळतो. त्याच्या नियंत्रणासाठी फोरेट 10 जी 150 ग्रॅम प्रती गादीवाफा किंवा पाच टक्के क्लोरोपायरीफॉस भुकटी किंवा चार टक्के एन्डोसल्फान भुकटी वापरावी. निलगिरी झाडांच्या खोडामध्ये गाठी होणे तसेच शेंड्याकडून झाडे वाळणे, मुळे कुजणे इत्यादी रोग आढळतात. त्याच्या नियंत्रणासाठी बोर्डेामिश्रण व बोर्डेापेस्ट वापरावी. तसेच वाळवी, हुमणी, मुळे व खोड पोखरणारी अळी इत्यादी किडींच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस 2.5 मिली प्रतीलिटर तर साल खाणार्या अळीच्या बंदोबस्तासाठी डायक्लोरोवॉस 0.1 टक्केचे इंजेक्शन खोडात द्यावे.
प्रा. सखाराम देसाई वनशास्त्र विद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा