आपल्या देशात बदकपालन या व्यवसायात अजूनही आधुनिकीकरण झालेले नाही. गरीब व दारिद्य्ररेषेखालील लोक हा व्यवसाय समुद्रकिनार्यालगत किंवा ज्या भागात भाताचे उत्पादन होते त्या भागात केला जातो. बदक पालनासाठी दमट वातावरण पोषक ठरते. म्हणून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भातील चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात हा व्यवसाय करण्यास हरकत नाही.
भारतात कोंबडीपालन हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात केला जातो. कोंबडीपालन व बदकपालनाची तुलना केल्यास बदकपालन अधिक फायदेशीर ठरू शकते. बदकाची वाढ कोंबडीच्या तुलनेत अधिक होते. बदके वर्षासाठी कोंबड्यापेक्षा 40-50 अंडी अधिक देतात. बदकांची रोगप्रतिकारकशक्ती कोंबड्यापेक्षा अधिक असते. बदकपालन नदीकाठी किंवा दमट हवामानात अगदी सहजरित्या केल्या जाऊ शकतो. जेथे कोंबडीपालनाचा व्यवसाय केला जाऊ शकत नाही. बदकांची अंडी ही कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा बरीच मोठी असून त्यांचे वजन सरासरी 15 ते 20 जास्त ग्रॅम असते. बदकाच्या खाद्यावर कोंबड्यांच्या खाद्यापेक्षा निम्मा खर्च कमी होतो. 65 ते 68 बदके सकाळी 8 वाजेपर्यंत अंडी घालतात त्यामुळे वेळ आणि मजुरीवरील खर्च कमी होतो. कोंबड्यांची अंडी उत्पादनाचे प्रमाण दुसर्या वर्षी फारच कमी असते. त्यामानाने बदके दुसर्या वर्षी अधिक अंडी देतात. बदकांच्या अंड्यात कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा पोषणमुल्ये अधिक असतात.
व्यवस्थापन : बदकांच्या व्यवस्थापनात त्यांना नियमित पाणीपुरवठा, घरे, हिरवे गवत, खाद्य, विविध आजारांपासून संरक्षण आणि पिलांचे संगोपन या बाबींचा समावेश होतो.
बदकपालनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या पाण्यात ते किमान डोके बुडवूश शकतील. तेव्हा बदक पालनात जवळ नदी, नाला, छोटे तलाव किंवा सरोवर असले तर उत्तमच, नाही तर सहा फुट व्यासाचे व 15 इंच खोल पाण्याने भरलेल्या कृत्रीम टाक्याचा वापर करता येईल.
बदकांची घरे बांधताना ती उंच, हवेशीर तसेच घरापुढे मोकळे तारेचे कुंपण असावे. प्रति बदकास सामान्यत: दोन चौ. फुट जागा लागते तर कंपाऊंडमध्ये प्रति बदकास 10-14 चौ. फुट जागा असावी. बदकांच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण 16 तर ऊर्जेचे प्रमाण 2700 कॅलरीज पाण्याचे टाके किंवा लहान सरोवर असल्यास खाद्यावरील खर्च बर्याच प्रमाणात कमी केल्या जाऊ शकतो. बदकांचे खाद्य थोड्या प्रमाणात बनवावे व वेळेवर त्यांना ओले करून किंवा कोरडे खाऊ घालावे. बदकांना बुरशीमुळे विषबाधा फार लवकर होते व त्यामुळे कळपातील बदकांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण 70-75 असू शकते. म्हणून बुरशी येणारे खाद्य पदार्थ मका व शेंगदाण्याच्या ढेपेचा वापर न करता त्याऐवजी गहू, ज्वारी आणि सोयाबीनची ढेप वापरावी.
बदकपालन व्यवसायात पिलांचे संगोपन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. बदकांची अंडी उबवणी कृत्रिम व नैसर्गिक पद्धतीने केली जाते. पहिले चार आठवडे पिलांची काळजी घेणे जरूरी आहे. पिलांच्या घरातील तापमान पहिल्या आठवड्यात 28-32 अंश से. असावे. नंतर दर आठवड्याला तीन अंश सेल्सिअसने कमी करून 28 अंश सेल्सिअस वर स्थिर ठेवावे. पिलांना प्रारंभिक काळात देणार्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण 20 तर ऊर्जेचे प्रमाण 2750 किलो कॅलरीज प्रति किलो असावे. तीन ते चार आठवड्यानंतर जर वातावरण अनुकूल असेल तर मोकळ्या जागेत सोडण्यास हरकत नाही. त्यामध्ये त्यांचे डोके बुडविता आले पाहिजे. जर पाणीपुरवठा केला नाही तर डोळ्याचे विकार उद्भवतात.
बदकांना मुख्यत्वेकरून हगवण डक प्लेग, डक कॉलरा, डक व्हायरल हेपाटायटीस इ. आजार होतात. हगवणी करता स्वच्छता आणि योग्य औषधोपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावे व इतर आजारांची लस पहिल्या आठवड्यात टोचून घ्यावी.
डॉ. मंगेश एस. मेंढे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उद्गीर, जि. लातूर.