दूध हे जवळजवळ पूर्ण अन्न आहे आणि त्याची आबालवृद्धापासून सर्वांना फार जरूरी आहे. दूध हे अनादि काळापासून मानवाने जीवनाला अत्यंत आवश्यक असे अन्न ठरविले आहे. प्रत्येक कुटुंबात दुधाचा वापर दररोज होतो म्हणूनच दूध हे शुद्ध आणि भेसळरहित होणे आवश्यक आहे. मात्र दुधातील भेसळीचे प्रमाण वरचेवर वाढताना दिसते आहे.
दूध भेसळसंदर्भात कायदा : दुधातील मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ लक्षात घेवून भारत सरकारने 1954 साली अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा करून शिक्षेची तसेच दंडाची तरतूद केलेली आहे. या कायद्याप्रमाणे म्हशीच्या दुधात महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सहा टक्के स्निग्धांश फॉट आणि नऊ टक्के स्निग्धांश विरहीत घटक एस एन एफ असणे आवश्यक आहे. गाईच्या दूधात 3.5 टक्के स्निग्धांश आणि 8.50 टक्के स्निग्धांश विरहीत घटक असावयास पाहिजे. मिश्र दुध असेल तर 4.5 टक्के तर 8.5 टक्के फॅटविरहीत घटक असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी घटक असेल तर ते भेसळयुक्त आहे म्हणून समजावे.
या कायद्याच्या अंमलबजावणीचे सर्व अधिकार शासनाने महानगरपालिकेला दिलेले आहेत. जर दुधातील घटक कायद्याच्या तुरतुदीपेक्षा कमी आढळते; तर विक्रेत्यावर खटले भरता येते. हा कायदा सरकारी दुग्धशाळा, सहकारी संस्था, दूध विकणार्या खाजगी कंपन्या सर्वांनाच लागू आहे. पण कायद्याची अंमलबजावणी जवळपास नसल्यासारखीच आहे. दूध भेसळ रोखरण्याकरिता सरकारच्या पातळीवर आजपर्यंत फारच तोकडे प्रयत्न झाले. त्यामुळे आता ग्राहकांनीच जागरूक व्हायला हवे आहे.
पाण्याची भेसळ कशी ओळखावी : दुधात पाण्याची भेसळ सर्वांत जास्त करण्यात येते. कारण त्यामुळे दुधाचे आकारमान वाढून विक्रेत्याला त्वरीत फायदा होतो. सर्वसाधारणपणे गाईच्या दुधात 87 टक्के पाणी व म्हशीच्या दुधात 85 टक्के पाण्याची भेसळ केल्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढून इतर घटकांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दुधाची घनता कमी होवून ते पातळ दिसते. दुधाची घनता जोपर्यंत तपासत नाहीतोपर्यंत दुधात पाणी टाकले आहे किंवा नाही हे ठरवता येत नाही. त्यासाठी लॅक्टोमीटरच्या साह्याने घनता/विशिष्ट गुरूत्व तपासावी लागते. याच दुधाला डिग्री लावणे असेसुद्धा दूध उत्पादक म्हणतात. दुधाचे विशिष्ट गुरूत्व म्हणजे पाण्याच्या तुलनेत दुधाचे वजन किती आहे हे पाहणे.
गाईच्या दुधाचे विशिष्ट गुरूत्व 1.030 ते 1.032 असते. म्हणजेच गाईचे एक लीटर दुधाचे वजन 1030 ते 1032 ग्रॅम (एक किलो) भरते. म्हणजेच एक लीटर दुधाचे वजन पाण्यापेक्षा 30 ते 32 ग्रॅम जास्त भरते. कमी वजनाचा पदार्थ उदा. पाणी जर दुधात मिसळले तर दुधाची घनता/विशिष्ट गुरूत्व कमी होते. सर्वसाधारण व्यक्तीला घरच्या घरी लॅक्टोमीटरच्या साहय्याने दुधाची घनता तपासता येते. लॅक्टोमीटरची किंमत फार कमी आहे आणि प्रत्येकाला 10 ते 15 रूपये खर्च करून ते आपल्या घरी ठेवता येते. लॅक्टोमीटरवर 0 ते 40 असे आकडे असतात दूध अॅल्युमिनीअमच्या किंवा काचेच्या उभट जारमध्ये तोंडापर्यंत भरून लॅक्टोमीटर त्यामध्ये सोडले जाते. लॅक्टोमीटरवच्या आकड्याची नोंद जर 29 पेक्षा कमी असेल तर पाण्याची भेसळ झाली आहे म्हणून समजावे.
दुधात स्टार्चची भेसळ कशी ओळखावी : पाण्याची भेसळ झाल्यामुळे दूध पातळ होेते आणि ग्राहकाला हे समजू नये म्हणून काही दूध विक्रेते दुधाची घट्टपणा वाढविण्याकरीता आणि त्याचबरोबर दुधाची घनता वाढविण्याकरीता दुधात मैदा, आरारूट, शिंगाड्याची पावडर, स्टार्च इत्यादी पिष्टमय पदार्थांची भेसळ करतात हा दुहेरी भेसळीचा प्रकार आहे. दुधातील पिष्टमय पदार्थांची भेसळ ओळखण्याकरिता काचेच्या परिक्षण नलीकेत थोडे दूध घेवून त्यात आयोडीनचे द्रावण टाका. पिष्टमय पदार्थांची भेसळ असेल तर दुधाचा रंग निळा होतो. हे सुद्धा गृहिणीला घरच्या घरी करता येते.
दुधात साखरेची भेसळ कशी ओळखावी : दुधात साखर टाकणे हे सुद्धा भेसळ आहे. काही मंडळी दुधामध्ये पाणी घालतात व लॅक्टोमीटरवरची नोंद कमी येवून दुधाची प्रत कमी आहे, असे वाटू नये म्हणून दुधामध्ये साखर लॅक्टोमीटर जास्त दाखवून दूध निर्भेख आहे असे भासवता. ही सुद्धा दुहेरी भेसळ आहे याकरिता दुधात साखर घातलेली आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता प्रयोगशाळेत साखर परीक्षेचा उपयोग करतात. एका काचेच्या परीक्षण नलिकेत 10 मिली दूध घेवून त्याच्यात 10 मिली तीव्र हायड्रोक्लोरीक आम्ल टाका, चांगले मिसळून त्याच्यात 0.1 ग्रॅम रीसॉरसीनॉल पावडर टाका. नंतर ही परीक्षण नळी उकळत्या पाण्यात पाच मिनीटे दुधाचा रंग पहा जर दुधास तांबडा रंग आला तर दुधात साखरेची भेसळ इत्यादी केली आहे म्हणून समजावी.
दुधात खाण्याच्या किंवा धुण्याच्या सोड्याची भेसळ कशी ओळखावी : बर्याच वेळस दुधविक्रेत दूध लवकर आंबट होवून नये म्हणून किंवा फुटू नये म्हणून त्याच्यात खाण्याचा किंवा धुण्याचा सोड्याची भेसळ करतात हे ओळखण्याकरीता परीक्षण नलीकेत दहा मिली दूध घेवून त्याच्यात तेवढेच अल्कोहोल टाकून चांगले हलवावे आणि नंतर रोझॅलीक अॅसीडचे तीन थेंब टाकावे दुधाचा लाल रंग आला तर समजावे की, त्याच्यात धुण्याचा सोडा आहे आणि करडा (ब्राऊन) रंग आला तर समजावे की त्याच्यात खाण्याचा सोडा आहे.
दुधात युरियाची भेसळ कशी ओळखावी : एवढ्याच दुधात युरियाची मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. असे युरियायुक्त दूध आरोग्याला फारच हानिकारक आहे. याचा वापर केल्याने पचनक्रियेवर तर वाईट परिणाम होतोच पण सततच्या वापराने किडनीमध्ये सुद्धा बिघाडा होण्याचा संभव असतो. लहान बाळांना हे दूध फारच घातक असते. कधी कधी अन्नविषबधेसारखे लक्षणे दिसू लागतात. काही विक्रेते साखर महाग आहे म्हणून साखरेऐवजी युरीयाची भेसळ करतात. साखर 15 रूपजे किलो आहे तर युरीया चार रूपये किलो आहे. पाण्याची भेसळ दाबण्याकरीता व दुधाला आंबटपणा तयार होवू नये म्हणून युरीयाची भेसळ होत आहे. दुधातील युरीयाची भेसळ सुद्धा ओळखता येते. एका काचेच्या परीक्षण नलीकेत दोन मिली दूध घेवून त्यामध्ये दोन मिली युरीया ओळखण्याचे रसायण द्रावण (दाय मिथील अॅमीनो बेंझल्डीहाईड) टाकून जर मिश्रणाला पिवळा रंग आला तर दुधात युरीयाची भेसळ झाली आहे म्हणून समजावे.
सध्या दुधातील मोठ्याप्रमाणात होणारी भेसळ शोधून काढण्याकरीता राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थान, कर्नाल (हरियाना) यांनी अगदी सुटसुटीत कोणालाही हाताळता येईल अशी कीट तयार केलेली आहे. तिचा वापर घरगुती स्तरावर सुद्धा करता येईल.
प्रा. एम. आर. मुळे नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय, मरखेल, ता. देगलूर, जि. नांदेड. (मो. 7507025409)