बांबू लागवडीनंतर कशी घ्यावी काळजी ?

4
2078

बांबूची लागवड करणे तसे पाहिले तर सोपे आहे. मात्र त्याची जोपासणा करण्यामध्ये खरे कौशल्य आहे. लागवडीनंतर बांबू शेतीचे संगोपण व्यवस्थीत केले तरच त्या शेतीतून फायदा मिळू शकतो. अन्यथा रोपांची मर होण्याचा धोका असतो. लागवडीनंतर नांगीभरणे, खुरपणी, पाणी व्यवस्थापन, छाटणी, कीड-रोग व्यवस्थापन, काढणी आणि प्रक्रिया अशी कामे वेळच्या वेळी करावी लागतात. विशेष म्हणजे याचे तंत्र माहिती असावे लागते. यासर्व बाबींचे व्यवस्थापन वेळोवेळी केल्यास नक्कीच बांबू शेतीतून फायदा मिळू शकतो.

नांगीभरणे : बांबू लावल्यानंतर पुढील कारणांमुळे त्याची मर होऊ शकते.

१. रोपाच्या भोवताली माती व्यवस्थित न दाबल्यामुळे

२. कंद काढताना त्यास झालेली इजा

३. वाहतूक करताना रोपांना होणारी इजा

४. रोपाच्या भोवतालची माती निघाल्यामुळे किंवा रोपे उघडी पडल्यामुळे

५. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास.

बांबू लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते. रोपे मेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन रोपे लावावीत.

खुरपणी : बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात. तसेच इतर गवत झुडपे यांची मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हींची स्पर्धा होते. यासाठी वेळो वेळी रोपा भोवतालचे तण काढणे आवश्यक असते. तसेच रोपाच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोड मुळाची वाढ जोमदार होते. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील, यासाठी काळजी घ्यावी. त्यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताच्या धसकटांचा आच्चादन म्हणूनसुद्धा उपयोग होतो.

पाणी : साधारणपणे ७५० ते ८०० मि. मी. पाऊस पडत असलेल्या १ ते २ वर्षे विशेषत: उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. १ ते २ वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही. तरीही पाणी देण्याची सोय असल्यास पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

आंतरपीक : बांबू लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते. तेव्हा सुरवातीच्या २ ते ३ वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्यामध्ये आंतरपिके घेण्यास हरकत नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच; शिवाय जमीन तण विरहित राहण्यास मदत होते.

शाखा छाटणी : प्रत्येक कळकाच्या पेन्यातून फांद्या फुटत असतात व कधी कधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. नवीन येणार्‍या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये, म्हणून या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक ठरते. त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यत करावी.

काढणी : लागवडी नंतर ४ ते ५ वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते. रोगराई पासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दर वर्षी काढणे फायदेशीर ठरते. बांबू तोडताना तो जमिनी लगत न तोडता, दुस-या व तिस-या पेन्याच्या मध्यभागी (३० सें. मी. अंतरावर) धारदार कुर्‍हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोड मुळांच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूची खोड मुळेच मरतात. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबूची काढणी करू नये, कारण त्याकाळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.

रोग व्यवस्थापन : बांबूच्या रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीपासून निरनिराळे रोग पडतात. उदा. मुळेसडणे, पानावरील ठिपके, खोड सडणे, ‘विचेसबूम’या रोगात रोपांची वेडी वाकडी वाढ होते. यामुळे फुले व कोंबावर त्याचा परिणाम होतो. बुरशीमुळे होणार्‍या ‘ब्लाईट’ या रोगामुळे फार नुकसान होते. यासाठी प्रादुर्भाव झालेली रोपे काढून टाकावीत व त्यानंतर बाविस्टिन (०.१५ टक्के), फ्युरॉडॉन (२५ ग्रॅम) ही बुरशीनाशके फवारावीत. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर ही द्रावणे फवारल्यास रोग आटोक्यात येतो. बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी ‘सेरेशन’ या बुरशीनाशकाची (५ ग्रॅम) प्रक्रिया केल्यास बुरशीचा नायनाट करता येतो. तसेच या बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी प्रति जैविकांचाही आज-काल उपयोग केला जातो.

कीड व्यवस्थापन : पानेखाणार्‍या किडींमुळे पानावर छिद्रे पडतात. तसेच पाने गळतात. यांच्या नियंत्रणासाठी बंदोबस्तासाठी पानांवर सायपरमेथ्रीन (०.०२ टक्के) किंवा मॅलिथिऑन ५० ई. सी. (०.०२ टक्के) पाण्यामध्ये मिसळून फवारावे. बीज कृमीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई. सी. या औषधाचा पाण्यात मिसळून फवारा गरजेप्रमाणे मारावा. ज्यावेळेस साठविलेल्या बांबूवर बारीक छिद्रे व पिवळी भुकटी आढळून येते, अशा वेळी या मुंग्याच्या बंदोबस्तासाठी सायपरमेथ्रीन (०.४ टके) डिझेल / ऑईलमध्ये मिसळून फवारावे. वाळवी / उधईच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या ठिकाणी थायमेट आणि तोडलेल्या बांबूवर सी. सी. ए. (कॉपर क्रोमियमअरसेनिक) फवारावे. नवीन कोवळे बांबू, पोखरणार्‍या कीटकांसाठी डायमेथोएट (०.०१ टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (०.२ टक्के) पाण्यात मिसळून फवारावे. बांबू हा पानझडी वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे आगीपासून संरक्षण करावे.

उत्पादन : लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते. बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४० वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणात देखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.

बांबू प्रक्रिया : बांबूवर रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचे आयुष्य अर्धे चिरलेले बांबू ६ ते ८ टक्के सी.सी.ए. किंवा सी.सी.बी. चेद्रावण असलेल्या हौदात बांबूचा ३० ते ४० सें. मी. भाग बुडेल अशा पद्धतीने २४ तास ठेवावेत. नंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच द्रावणात २४ तास बुडवून ठेवावते. त्यानंतर असे प्रक्रिया केलेले बांबू वापरण्या पूर्वी २ ते ३ आठवडे एकत्र साठवून ठेवावेत. अशा पद्धतीने प्रक्रिया केलेल्या बांबूचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढल्याचे आढळून आले आहे व त्यासाठी खर्चसुद्धा फारसा येत नाही.

फायदे : बांबूच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते. बाबू पासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचर आदि उत्पादने तयार होतात. यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेती कामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणी टंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय.

(टीप : मानवेलही बांबूची जात लांबधागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक्षम जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून, साधारण पणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेन्यांच्या जवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जाती विषयी देण्यात येत आहे.)

सविता अजिनाथ करचे सहाय्यक प्राध्यपिका, श्रीराम उद्यान विद्या महाविद्यालय, पाणीव (माळशिरस) जिल्हा – सोलापूर (मोबा. ८४०८९९८९८९)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 9 Average: 3.9]

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here