ऊस, ज्वारी मका, भुईमूग इत्यादी पिकांना उपद्रव करणार्या किडीमध्ये (प्रमुख) हुमणीचा क्रमांक बराच वरचा लागतो. शेतात नांगरणी करताना किंवा खताच्या खड्ड्यात हमखास आढळून येणारी इंग्रजी ‘सी’ आकाराची अळी म्हणजे हुमणी (होलोट्रॉकिया सेरेटा) होय. हुमणीची अळी अवस्था अतिशय हानिकारक असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. एका वर्षात या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. हुमणीची राष्ट्रीय किड म्हणून नोंद झाली असून, महाराष्ट्रात बहुतांश भागात वर्षभर तिचा प्रादुर्भाव आढळतो. महाराष्ट्रातील ऊस, ताग, मका, कपास, भुईमूग, ज्वारी भाजीपाला इत्यादी पिकांचे होलोट्रॅकिया सेरेटा या प्रजातीपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
नुकसानीचा प्रकार : हुमणीच्या अळ्या या अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर काही सेंद्रीय पदार्थांवर कुजलेल्या उपजीवीका करतात व नंतर ऊस व इतर पिकांच्या मुळांवर उपजीविका करतात. त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्यच बंद पडते. प्रादुर्भावग्रस्त पीक निस्तेज दिसते व वाळते. हुमणीचे भुंगेरे बाभुळ, कडूनिंब, बोर, इत्यादी झाडांची पाने खातात.
नियंत्रणाचे उपाय : हुमणीच्या जीवनक्रमातील सर्व अवस्था जमिनीतच असतात. याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरूवातीला सूर्यास्तानंतर जमिनीच्या बाहेर पडणारे भुंगरे होय.
भुगेर्यांचे बंदोबस्त : प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे हा एकमेव पर्याय आहे. पावसाच्या पहिल्या सरीबरोबर भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरूवात होते. हे भुंगेरे कडूनिंबाच्या अथवा बाभळीच्या लहान झाडांवरून गोळा करावेत. मोठ्या झाडाच्या फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. कडूनिंब अथवा झाडांवर कार्बोरील ( 0.1 टक्के) किंवा 15 मिली मोनोक्रोटोफॉस किंवा 20 मिली क्विनॉलफॉस दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आंतरमशागतीच्या वेळी सापडणार्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. खरीप पेरणीपूर्वी दहा टक्के फोरेट अथवा पाच टक्के क्विनॉफॉस ही दानेदार कीटकनाशके हेक्टरी 25 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावी.
योगेश वाघमारे, कृषी विद्याविभाग, व.ना. महात्मा कृषी विद्यापीठ, परभणी.