‘यास’ चक्रीवादळ हे ‘तौक्ते’ चक्रीवादळापेक्षाही तुफानी असणार आसल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राला याचा धोका नसला तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या वादळांमुले मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘यास’ चक्रीवादळ पश्चिम बंगालमधून ओदिशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळाचं लॅण्डफॉल हे भुवनेश्वर इथं होणार आहे. ‘यास’ चक्रीवादळाचा वेग हा ताशी १८५ की. मी. पर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

चक्रीवादळ ‘यास’ची परिणामकारकता लक्षात घेऊन ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सची ((NDRF) पथके जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी भागात लोकांना वादळाच्या धोक्याविषयी वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांशी विशेषत: मेदनापूर, सुंदरवन आणि आसपासच्या भागातील रहिवाशांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार ३१ मे किंवा १ जूनला मान्सून पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. चक्रीवादळांमुळे मान्सून पोहोचण्यास विलंब झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी खरिप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे.
मान्सून पाऊस विलंबानं झाल्यास पेरणी लांबू शकते परिणामी शेतीतून मिळणार्या उत्पन्नावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतामधील जवळपास ४० टक्के शेतकरी अजूनही मान्सूनच्या पावसाच्या भरवशावर शेती करतो. उत्तर भारतातील राज्यांमध्ये मान्सूनच्या पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची साधन असल्यानं त्यांना याचा काही फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाब, यूपी, हरियाणा, बिहारमधील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यानं त्यांचं मान्सून पावसावरील अवलंबित्व कमी झालं आहे.
‘यास’ चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी ५० किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे ७५० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ४८ तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ मे रोजी उशिरा रात्री किंवा २६ मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitra magazine चे फेसबुक पेज लाईक करा 👇👇