उन्हाळा म्हटलं की, आंब्याच्या हंगामाची सुरूवात होते. प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा शौकीनांची पहिली पसंत असते ती कोकणच्या ‘हापूस’ आंब्याची. हापूस आंबा असं म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र आंबा व्यापार्यांकडून कोकण हापूसच्या नावाने कोणताही सामान्य हापूस माथी मारला जातो.
मोठ-मोठ्या शहरातील बाजारात कोणताही आंबा ‘कोकण हापूस’ या नावानेच विकला जातो. त्यामुळे ग्राहकांची तर फसवूणक होतेच शिवाय अस्सल कोकणातून येणार्या आंब्याच्या विक्रीवर त्याचा मोठा परिणाम होतो. त्याला हवा तसा दरही मिळत नाही. ही बाब कृषीमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ फर्मान काढून ज्या भागातून आंबा येईल त्याच नावाने त्याची विक्री करावी, असे आदेश संबंधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना नुकतेच दिले आहेत. यामुळे ग्राहकांची फसवणूक थोड्या प्रमाणात थांबेल मात्र ग्राहकांनाही कोकण हापूसच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य ग्राहकाला ओरिजनल कोकण हापूस सहजासहजी ओळखणे कठीण असते. अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होते. काण ओरिजनल हापूस आंब्याची बाह्य व अंतर्गत गुणधर्म सर्वसामान्यांना माहिती नसतात. कोकण हापूस प्रमाणेच दिसणारा कर्नाटक हापूसमुळे बर्याचवेळा ग्राहकाची फसवूणक होते. माहितगाराला साध्या नजरेने हापूस ओळखता येतो. हापूस घेताना आपली फसगत होवू नये म्हणून अस्सल कोकण हापूस ओळखण्याच्या टिप्स् माहिती असणे गरजेचे आहे.
हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. हापूस आंब्याची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही. कोकणातील हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. विशेषत: कोकणा व्याक्तिरिक्त या फळाची इतर कुठेही लागवड केली तर त्याला विशिष्ट चव येत नाही. म्हणून हापूस आंब्याला ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळखतात. बहुतांश घरात अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरूवात केली जाते.
अस्सल चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुगंध असतो. त्या सुगंधामुळे तो दूरवरूनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याचा घमघमाट दूरपर्यंत पसरतो. इतर भागातून येणारे आंबा जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित वास येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करून पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.

नैसर्गिकरित्या पिकवलेले अस्सल हापूस आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिक्कट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांचा रंग एकसारखा असतो.
पिकलेला अस्सल हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो विशेषत: या सालीला आंब्याचा गर लागत नाही. हापूस आंबा त्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखता येऊ शकतो.
एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवावा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला अन् तो पाण्यात तरंगला तर तो रासायनिक पद्धतीने पिकवलेला आहे, या पद्धतीनेही आंबा ओळखला जातो. शिवाय आपली नजर चांगली असेल तर आंब्याचे पेटीत कागद म्हणून कोणते वर्तमानपत्र वापरले यावरूनही आंबा कोणत्या भागातून आला हे ओळखता येते.