खरीप हंगामत तुरीच्या खालोखाल मूग हे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. हे पीक अत्याल्प म्हणजे ७० ते ७५ दिवसात येते. अत्याल्प पावसावर याचे चांगले उत्पादन मिळू शकते. दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठही हे पीक अतिशय महत्त्वाचे आहे. सुधारीत तंत्राचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते.
मूग हे पीक पाण्याचा निचरा होणार्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. हे पीक जमिनीच्या आम्लविम्ल परिस्थितीतसुद्धा चांगले तग धरू शकते. मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगले येते.
तापमान : या पिकास उष्ण हवामान पोषक असते. सर्वसाधारणत: २१ अंश ते ३५ अंश सेल्सिअस ग्रेट तापमानामध्ये या पिकाची वाढ चांगली होते.
पर्जन्यामान : ५०० ते ६०० मि.मी पाऊस पडणार्या भागात जरी परिणामकारक उत्पादन मिळत असले तरी ७५० ते ९०० मिमी पाऊस पडणार्या भागात त्याचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते. खरीप धान्य पिकविणार्या प्रदेशात धान्याच्या काढणीनंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या ओलाव्यावरसुद्धा मुगाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या भागात पाऊस बरेच दिवस चालू राहतो तेथे मात्र या पिकाची जास्त वाढ होते. पीक फुलोर्यात असताना पाऊस जास्त पडला तर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
पूर्वमशागत : पूर्वीचे पीक काढल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने नांगरून नंतर वखाराच्या दोन ते तीन पाळ्या देवून ती भुसभुशीत करावी.
जीवाणू संवर्धक : पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबीयम जीवाणू संवर्धक लावून पेरणी केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. रब्ंबीमध्ये (भातानंतर) घ्यावयाच्या मुगासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
बीजप्रक्रिया : मूग या पिकास रोपावस्थेत मूळकुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होतोे. या रोगापासून होणारे नुकसान टाळणेकरिता पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम किंवा बाविस्टीन यापैकी एका बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
रासायनिक खते : हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीचे वेळी दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.
सुधारित जाती : महाराष्ट्रात जवळगाव ७८१ व कोपरगाव हे जुने वाण बर्याच वर्षापासून खरीप लागवडीखाली आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला व भा. प. अ. ट्रॉम्बे यांच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे टी.ए.पी-७, हा वाण प्रसारित करण्यात आला. या वाणाचे उत्पादन कोपरगाव पेक्षा २४ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे हा वाण भुरी रोगाससुद्धा इतर वाणांच्या मानाने कमी प्रमाणात बळी पडतो. रब्बी लागवडीच्या क्षेत्रातसुद्धा या वाणांचा प्रसार करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील खरीप हंगामाकरिता फुले मूग-२, हा वाण पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारित करण्यात आला. उन्हाळी मुगाकरिता एस-८ आणि पुसा वैशाखी हे वाण प्रचलित आहेत.
पेरणी : खरीप मुगाची पेरणी शक्यतो पावसाळा सुरू होताच करावी. सर्वसाधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणी करण्यास हरकत नाही. बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ येथील प्रयोगामध्ये हवामानशास्त्राच्या २६ व्या आठवड्यात (२५ जून ते २८ जुलै दरम्यान) केलेल्या पेरणीमुळे कोपरगाव या वाणाचे सर्वाधिक उत्पादन मिळाले. या उलट २७ व्या किंवा २८ व्या आठवड्यात केलेल्या पेरणीमुळे कमी उत्पादन मिळाले. (अनुक्रमे ८७६ व ६४७ किलो हेक्टरी) उत्पादन मिळाले. यावरून स्पष्ट होते की विदर्भात मुगाची पेरणी खरिपात जून अखेरपर्यंत आटोपल्यास चांगले उत्पादन मिळते. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते (४ ते २९ टक्के).
कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील प्रयोगामध्ये १ जुलैच्या पेरणीमुळे जळगाव-७८१ या वाणाचे १,१६२ किलो हेक्टरी उत्पादन मिळाले याउलट १५ जुलै व ३० जुलै रोजी केलेल्या पेरणीमुळे अनुक्रमे ५७५ व ५१० किलो उत्पादन मिळाले. यावरून स्पष्ट होते की, खरीप मुगाची पेरणी शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. पेरणी पाभरीने करावी. बियाणे चार सें. मी. खोलीवर पेरावे. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. ठेवून हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरावे. खरीप मुगाचे पीक ६० ते ७० दिवसात तयार होते. कोपरगाव ६० ते ६५ दिवसात तयार होते. टी.ए. पी. ७, ६५ ते ७० दिवसात तयार होते.
मुगावरील रोग व त्याचे नियंत्रण : महाराष्ट्रात भुरी व केवडा हे महत्त्वाचे रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मोझॅक किंवा केवडा हा रोग अतिसुक्ष्म विषाणूंपासून होतो. रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे पानावर पिवळे व हिरवे चट्टे मोठ्या प्रमाणात पडतात. पानाचा आकार कमी होऊन कर्बग्रहण क्रियेत अडथळा आल्याने उत्पादनात लक्षणीय घट येते. एस-८, फुले-मूग-२ या रोगप्रतिकरक सुधारित वाणांची लागवड केल्यास रोगामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येते. भुरी हा महत्त्वाचा रोग राज्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो, पाने फुले व शेंगावर पांढर्या बुरशीची पावडर डागाच्या स्वरूपात दिसते. कालांतराने हे डाग आकाराने मोठे होऊन संपूर्ण पानाचा पृष्ठभाग व्यापते. रोगामुळे हरितद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने पानांचा रंग तपकिरी तांबूस दिसतो व पाने गळतात. भुरी रोग लवकर आल्यास उत्पादनात फारच घट येते. भुरी रोगाची बुरशी जमिनीत अनेक वर्षे राहू शकते. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. या बुरशीस कोरडे, उष्ण व ढगाळ हवामान मानवते व अशा हवामानात रोगाची झपाट्याने वाढ होते. भुरी रोग खरीप व उन्हाळी हंगामात भरपूर प्रमाणात दिसून येतो.
नियंत्रण : सर्वांत खात्रीशीर रोगमुक्त पीक येण्यासाठी रोगप्रतिकारक वाणांची लागवड करणे हा उत्तम उपाय आहे. तथापि असे वाण उपलब्ध नसल्याने बुरशीनाशकाचा वापर करून पिकाचे या रोगापासून संरक्षण करता येईल. यासाठी ३०० पोताची गंधकाची भुकटी हेक्टरी २० किलो, वारा शांत असताना धुरळावी अथवा पाण्यात विरघळणारे गंधक १००० ते १२०० ग्रॅम ५०० लिटर पाण्याचे द्रावण करून फवारावे. पहिली धुरळणी/फवारणी रोग दिसताच त्वरित करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे केलेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे. की भुरी रोगाचे नियंत्रणासाठी बाविस्टीन (कार्बेन्डेंझिम) हे आंतरप्रवाही बुरशीनाशक २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसल्यानंतर त्वरित फवारल्यास भुरी रोगाचे प्रमाण कमी होऊन चांगले उत्पादन घेता येते. जरूरीनुसार ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
पीक संरक्षण : या पिकावर रोपावस्थेत व वाढीच्या कालावधीत मावा, तुडतुडे यासारख्या रस शोषणार्या किडींपासून तसेच पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, पांढरी माशी आणि भुंगेरे या किडींपासून नुकसान होते. रस शोषणार्या व पाने खाणार्या किडींचे नियंत्रणासाठी मॅलेथिऑन ५० टक्के प्रवाही ५०० मिली अथवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारणी करावी. फवारणी करणे शक्य नसल्यास एन्डोसल्फान चार टक्के, मिथील पॅराथिऑन दोन टक्के, क्विनॉलफॉस १५ टक्के अथवा बी. एच. सी. १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो धुरळणी करावी. शेंगा पोखरणार्या अळीचे नियंत्रणासाठी एंडोसल्फान ३५ टक्के प्रवाही एक लिटर अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ५५० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची काढणी, मळणी आणि साठवण : मुगाचे पीकसाधारणत: ६० ते ६५ दिवसात तयार होते. परिपक्व झालेल्या शेंगाची तोडणी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने करावी. शेंगा तोडण्यास उशीरा झाल्यास शेंगा तडकून पिकाचे नुकसान होते. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी. बियाण्यास उन्हात चांगले वाळवावे. धान्य पोत्यात भरण्यापूर्वी पोत्यास बाहेरच्या बाजूस बी. एच. सी. ५ टक्के भुटकी लावावी. धान्याची साठवण कोरड्या जागेत करावी. शक्य असल्यास साठवणीकरिता पंजाबराव कृषी विद्यापीठाचे तयार केलेली कोठी वापरावी.
डॉ. जीवन रामभाऊ कतोरे, स्वप्नील कोंडे, कृषी विज्ञान केंद्र, अकोला.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा