गूह लागवडीचे सुधारित तंत्र

0
1256

गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते. गव्हाची जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे केली जाते. महाराष्ट्रातील गव्हाची सरासरी उत्पादकता फारच कमी आहे. उत्पादकता कमी असण्याची कारणे म्हणजे जिरायत लागवड, सुधारित वाणांची लागवड न करणे, पिकसंरक्षणाचा आभाव, इत्यादी करीता उत्पादणाच्या सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ अपेक्षीत आहे.

जमीन : गव्हाची लागवड जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे करण्यात येते. बागायत पिकास चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी म्हणजे 60 ते 90 सें.मी. खोलीच्या जमिनीची आवश्यकता असते. परंतु पाणी व खताचा योग्य पुरवठा झाल्यास हलक्या जमिनीतही पीक बरे येते. जिरायती पिकासाठी 60 ते 70 सें.मी. खोलीची विशेष करून ज्यामध्ये जास्त काळापर्यंत ओलावा टिकून राहीत अशा भारी जमिनीची निवड करावी.

हवामान : गहू हे थंड हवामानास उत्तम प्रतिसाद देणारे पीक होय. गहू पिकास थंड व कोरडे हवामान मानवते. थंडीचे प्रमाण जास्त असेल व ती जास्त दिवस टिकून राहिली तर पिकाची वाढ चांगली होते. गव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता थंडीचे किमान 100 दिवस मिळणे आवश्यक आहे.

पूर्वमशागत : गव्हाच्या पिकाच्या उपयुक्त मुळ्या 60 ते 75 सें.मी. खोलवर जात असल्यामुळे या पिकाकरीता जमीन चांगली भुसभुशीत होण्याकरिता योग्य व पुरेशी मशागत करणे आवश्यक असते. याकरिता खरीपातील पीक निघाल्यानंतर लोखंडी नांगराने 15 ते 20 सें.मी. खोलवर जमीन नांगरवी आणि तीन ते चार वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. ही मशागत करीत असतांना पूर्वीच्या पिकांची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपाच्या पिकासाठी नांगरणी केली असल्यास केवळ वखराच्या तीन ते चार पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी.

पेरणीची वेळ : जिरायत गव्हची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवाड्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरच्या पहिला पंधरवाडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे 15 डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

बियाणे : गव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता शेतात रोपांची संख्या महत्त्वाचे ठरते. म्हणून दरहेक्टरी 20 ते 22 लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी दर हेक्टरी       100 ते 125 किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे वापरावे. जिरायत गव्हासाठी हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

बिजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर 250 ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.

पेरणीचे अंतर : पेरणीच्या वेळी जमिनीत योग्य ओल असणे महत्त्वाचे आहे. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत 22.5 सें.मी. व उशिरा पेरणी आठ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे पाच ते सहा सें.मी. खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत 22.5 सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.

रासायणिक खते : बागायती व कोरडवाहू गव्हासाठी अन्नद्रव्याची गरज ही वेगवेगळी असते. म्हणून रासायनिक खताचे नियोजन महत्त्वाचे ठरते. वेळेवर पेरणीसाठी 50 :50 : 50 किलो नत्र, स्फुरद, पालाश, प्रती हेक्टरी पेरतांना आणि 50 किलो नत्र पेरणीनंतर 21 दिवसांनी द्यावे. तर उशिरापेरणीसाठी 40:40:40 किलो नत्र, स्फुरद पालाश प्रती हेक्टरी द्यावे. पेरणीनंतर 21 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : हवामानाप्रमाणे पाणी हा गहू उत्पादनामध्ये महत्त्वाचा घटक ठरतो. पीक वाढीच्या नाजूक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनामध्ये घट संभवते. म्हणून पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांना पाणी देणे फायद्याचे ठरते.

मुकूटमुळे फुटण्याची आवस्था पेरणीनंतर 18 ते 21 दिवस असते. कांडी धरण्याची अवस्था पेरणीनंतर 40 ते 45 दिवस असते. फुलोरा आणि चीक भरण्याची आवस्था पेरणीनंतर 60 ते 65 दिवस असते. दाणे भरण्याची अवस्था 80 ते 85 दिवस असते.

पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात. एकाच पाणी उपलब्ध असल्यास 40 ते 42 दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दुसरी पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22, दुसरे पाणी 40 ते 42 तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

कीड व्यवस्थापन 

खोडकिडा : पीक ओंबीवर असतांना या किडीचा प्रादुर्भाव आढळूून येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात, परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. या किडींच्या नियंत्रणासाठी किडग्रस्त रोपेमुळांसह उपटून त्यांचा नायनाट करावा. किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास 40 ग्रॅम कार्बोरील 50 टक्के पा.मि.भू. अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.

रोग व्यवस्थापन

तांबेरा : तांबेरा हा गहू पिकावरील महत्त्वाचा रोग होय. काळा, नारंगी व पिवळा या तीन प्रकारच्या तांबेरा रोगापासून गव्हास हानी होते.त्यापैकी काळा व नारंगी तांबेरा हे दोन महत्त्वाचे हाणीकारक रोग होत. हा हवेद्वारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरूरीपूरतेच व बेताचे द्यावे. तांबेर्‍याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम-45) हे बुरशीनाशक 1.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन दहा ते पंधरा दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

काजळी किंवा काणी : काजळी हा रोग बियाण्याद्वारे पसरणारा रोग आहे. रोगट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

करपा : गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपरऑक्सीक्लोराईड (0.2 टक्के) अधिक मॅन्कोझेब (0.2 टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.

कापणी व मळणी : पीक तयार होताच योग्य वेळी पिकाची कापणी करावी. कापणीस उशिर झाल्यास काही वाणांचे दाणे शेतात झडू शकतात. म्हणून पीक पक्व होण्याच्या दोन ते तीन दिवस आगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.

उत्पादन : अधिकाधिक उत्पादनासाठी गहू उत्पादनाच्या सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास बागायती वेळेवर लागवड केलेल्या गव्हापासून प्रतीहेक्टरी 45 ते 50 क्विंटल, बागायती उशीरा लागवड केलेल्या गव्हापासून 35 ते 40 क्विंटल तर जिरायत गव्हापासून 12 ते 14 क्विंटल उत्पादन मिळते.

डॉ. शरद जाधव कृषी विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]