कांद्याचे सरासरी उत्पादन इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याची अनेक कारणे आहेत; त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे कांदा या पिकावर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे आहे. विशेषत: कांद्यावरील काही किडीचा परिणाम त्याच्या साठवणीवर होतो. त्यामुळे नुकसान वाढते. मात्र किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास कांदा उत्पादनात चांगलचा फरक पडतो. कांदा पीकावर प्रामुख्याने फुलकिडे, कंद किंवा खोड कुरतडणारी अळी आणि शीर्षछेदक व कांद्यावरील माशी या किडी पडतात.
फुलकिडे (टाक्या) : फुलकिडे, कांदा पिकाचे नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. ही कीड आकाराने लहान असते. पूर्ण वाढलेली कीड सुमारे एक मि. मी. लांबीची असते. तिचा रंग पिवळसर तपकिरी असतो व शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढुरके ठिपके दिसतात. त्यालाच टाक्या नावाने ओळखले जाते. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात व वाळतात. पिकाची कोणतीही अवस्था या किडीस चालते. कांदा तयार होत आला असताना प्रादुर्भाव झाला तर झाडाची प्रवृत्ती नवीन पाने बाहेर टाकण्याकडे होते. त्यामुळे माना जाड होतात. कांदा साठवणीत टिकत नाही.

उपाय : या किडींचा जीवनक्रम तोडणे अवघड होते. कांदा रोपे लावणीनंतर थायमेट 10 जी किंवा कार्बोफ्युरॉन 10 जी ही दाणेदार औषधे एकरी चार किलो या प्रमाणात वाफ्यात वापरावीत. दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने डायमेथोएट (0.03 टक्के) 10 मिली किंवा एन्डोसल्फान (0.07 टक्के) 20 मिली किंवा नुआक्रॉन (0.07 टक्के) 20 मिली किंवा सायपरमेथ्रिन (0.01 टक्के) 10 मिली ही औषधे 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून वापरावीत. कमीत-कमी चार ते पाच फवारण्या आवश्यक असतात. फवारणी करताना त्यातच स्टिकर व बुरशीनाकांचाही वापर करावा.
रोप लागवडीपासून तीन आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 10 मिली., 50 ई.सी. मॅलेथिऑन किंवा 7.5 मिली 25 ई.सी. मेटॉसिस्टॉक्स किंवा 12 मिली फेनिट्रोथिऑन 50 ई.सी. या प्रमाणात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.

थ्रिप्स : कांदा पिकावरील थ्रिप्स खूपच नुकसान करणारी कीड असून पूर्ण देशात कांदा उत्पादन क्षेत्रात याचा प्रादुर्भाव होतो. अनेक वेळा 50 ते 60 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान या किडीमुळे होते. बिजोत्पादनक्षेत्रात उत्पादनावर तसेच उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ही कीड पानांच्या पोंग्यात लपून राहते. आणि पानांमधील रस शोषून घेते. ज्यामुळे पात वाकून रोपे लहान राहतात. पिकाच्या सुरूवातीला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कांदे पोसत नाहीत आणि मरून जाते.
उपाय : फोरेट 10 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 30 किलो प्रति हेक्टरप्रमाणे कांदे लागवडीचे वेळी आणि 30 दिवसांनी मातीमध्ये मिसळून पाणी द्यावे. मोनोक्रोटोफॉस 1.8 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 0.4 मिली प्रतिलिटर प्रमाणे 10 ते 15 दिवसांचे अंतराने फवारणी करावी. बिजोत्पादनक्षेत्रात फुले येण्याच्या अगोदर वरीलप्रमाणे औषधी फवारणी आणि फुले आल्यानंतर इंडोसल्फान दोन ते तीन प्रतिलिटरप्रमाणे फवारावे. निंबोळी पेंड 1250 किलो प्रतिहेक्टरप्रमाणे जमिनीत मिसळून दिल्याने थ्रिप्स किडीचे नियंत्रण होते.
कंद किंवा खोड कुरतडणारी अळी : या किडीची अळी ही अवस्था नुकसान करणारी असते. अळी साधारणपणे 35 मि. मी. लांबीची आणि राखाडी रंगाची असते. या किडीच्या अळ्या कांद्याचा जमिनीखालचा भाग कुरतडतात. झाड पिवळे दिसू लागते व सहज उपटून येते. बरड किंवा हलक्या जमिनीत या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो.
उपाय : पूर्व हंगामातील पिकाची धसकटे वेचून घेणे. बटाटा पिकानंतर कांदा पीक घेऊ नये. फोरेट किंवा थायमेट 10 जी किंवा कार्बोफ्युरॉन 10 जी एकरी चार किलो या प्रमाणात लागवडीनंतर वाफ्यात घालावे. पिकाची फेरपालट करावी.
हेही वाचा :
कांद्यावरील रोगांचे करा असे नियंत्रण
अशी करा कांदा रोपांची जोपासना !
उत्तमप्रतिच्या कांदा बियाण्यासाठी हे वापरा कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
कांद्याच्या जाती आणि किड रोग व्यवस्थापन
हमखास पैसे मिळवून देणारे कांदा उत्पादन तंत्र
कांद्यावरील विषाणूजन्य रोगांचे करा असे नियंत्रण
शीर्षछेदक (हेडबोरर) : हेलिओथिस आर्मिजेरा नावाची कीड. बिजोत्पादनक्षेत्रात या किडीचा प्रादुर्भाव जास्त होता. मध्यप्रदेश आणि उत्तर भारतात या किडीमुळे खूप नुकसान होते. कांदा पिकात ही कीड आक्रमण करते.
उपाय : या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. बिजोत्पादनपिकामध्ये इंडोसल्फान दोन ते तीन मिली या 10 दिवसांचे अंतराने फवारणी करावी. कांदा पिकामध्ये मॅलेथिऑनची प्रतिलिटर एक मिली प्रमाणे फवारणी करावी.
कांद्यावरील माशी (हायलिमिया एन्टीक्युवा) : या किडीचे वयस्क घरातील माश्यांप्रमाणे दिसून येतात. माश्या जुन्या पातीवर अंडी घालतात. कीटग्रस्त रोपे पिवळसर रंगाचे दिसतात व नंतर सुकून जातात. अळी मुळांजवळ कांद्याच्या गाठींना कुरतडते. कीडग्रस्त कांदे साठवणुकीत सडून जातात.
उपाय : या किडीचे नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी. कांदे लागवडीच्याअगोदर फोरेट 10 किलो प्रति हेक्टरप्रमाणे जमिनीत मिसळावे. कार्बारील चार मिली प्रति लिटरप्रमाणे पिकावर फवारावे.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (कांदा विशेषांक)

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा