वांगी लागवडीचे क्षेत्र वाढत असले तरी त्याचे एकरी उत्पादन मात्र म्हणावे असे वाढलेले नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी वांग्यावरील कीड हे महत्त्वाचे कारण मानले जाते. वांगी पिकात शेंडा व फळ पोखरणारी अळी ही महत्त्वाची समस्या आहे. त्या पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येते. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे गरजेचे असते.
लागवडीचा हंगाम : महाराष्ट्रातील हवामानात तिन्ही हंगामात लागवड करता येते. खरीप हंगामासाठी रोप वाफ्यावरील पेरणी जूनच्या दुसर्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामात बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करता आणि रोपे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावतात. उन्हाळी हंगामात बी जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात तर रोपांची लागण फेब्रुवारी महिन्यात करता.
बियाणाचे प्रमाण : कमी वाढणार्या जातीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम ‘बी’ पुरेसे होते. जास्त वाढवणार्या व संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम ‘बी’ पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो तीन ग्रॅम थायरम चोळावे.
रोपवाटिका : वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे साधारणत: तीन बाय दोन मिटर आकाराचे करून गादी एक मिटर रूंद व 15 सें.मी. उंच करावी. प्रति वाफ्यात पूर्ण कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकावे 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत घ्यावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्यात समप्रमाणात द्यावे. प्रति वाफ्यात मर रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड वापरावे. वाफ्याच्या रूंदीस समांतर 10 सें.मी. अंतरावर खुरप्याने एक ते दोन सें.मी. खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरूवातीस वाफ्यात झारीने पाणी द्यावे. त्यानंतर पाटाने पाणी द्यावे.
रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरीया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाहून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी 10 दिवसाच्या अंतराने शिफारशीनुसार किडनाशकांची फवारणी करावी. लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोपे कणखर होतील लागवड करण्याआधी एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीसाठी पाच ते सहा आठवड्यांत तयार होते. रोपे 12 ते 15 सें. मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी. किंवा वेळ वाचविण्यासाठी खात्रीच्या रोपवाटिकेतून दर्जेदार रोपांची खरेदी केली तरी चालते.
रोपाची लागवड : लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी आणि शेणखत मिसळावे. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर सर्या-वरंबे पाडावेत. हलक्या जमिनीत 75 बाय 75 सें.मी. लागवडीचे अंतर, तर जास्त वाढणार्या किंवा संकरित जातींसाठी 90 बाय 90 सें.मी. अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणार्या जातींसाठी 90 बाय 75 सें.मी. जास्त वाढणार्या जातींसाठी 120 बाय 90 सें.मी. अंतर ठेवावे.
खत व्यवस्थापन : जमिनीच्या मगदुराप्रमाणे खत मात्रांचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. मध्यम काळ्या जमिनीसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश घ्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
आंतरमशागत : खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. वेळोवेळी खुरपणी करून पाणी नियोजन जमीन व हवामानानुसार करावे. खरीपातील पिकास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोपलावणीनंतर त्वरीत पाणी द्यावे. दुसरे पाणी तीन ते चार दिवसांनी द्यावे. हिवाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याचा काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देऊ नये. वेळच्या वेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.
एकात्मिक कीड नियंत्रण : लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लागवड करू नये. कारण या शेतात सूत्रकृमींची वाढ झालेली असू शकते. रोपांसाठी तयार केलेल्या वाफ्यात फोरेट 10 ग्रॅम टाकावे. (1 बाय 1 मीटर वाफा) तसेच रोपांवर डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मिली किंवा कॉर्बेासल्फान 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून वापरावे. पुनर्लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्लोप्रीड 10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवावीत व नंतर लावावीत. लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमिथोएट 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन अधिक ट्रायझोफॉस हे संयुक्त कीटकनाशक 10 मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.
लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडकेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. तसेच चार टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन (25 टक्के प्रवाही) पाच मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा अशा प्रतिकारक पिकांचा फेरपालट करावा. तसेच उन्हाळ्यात दोन ते तीन वेळा जमिनीची नांगरट करून तापू द्यावी.
वांग्यावरील किडी : वांग्यावर विशेषत: शेंडा व फळे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. ही अळी प्रथमत: झाडावर फळे नसताना कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे व फळे वाळतात. फळे लागल्यावर त्यात शिरून आतील गर खाते आणि मग अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडीमुळे फळांचे 40 ते 50 टक्के नुकसान होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत किडीचे प्रमाण 50 ते 70 टक्के असू शकते. वांग्यावरील पण गुच्छ रोगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि स्थानिक भाषेत बोकडल्यासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा जीवामुळे (मायकोप्लाझा) होतो. त्याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो. काही वेळा विशेषत: पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो.
सुधारीत जाती : महाराष्ट्रासाठी महात्मा फुलेकृषी विद्यापीठाने कृष्णा, प्रगती, वैशाली, मांजरी गोटा आणि फुले अर्जुन या जातींची शिफारस केलेली आहे. तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठाने अरूणा या जातीची शिफारस केलेली आहे. याशिवाय भारतातील इतर ठिकाणच्या अर्का कुसुमाकर, अर्का गिरीश, अर्काशील, पंजाब बहार, क्लस्टर व्हाइट, ब्लॅक ब्युटी, पुसापर्पल राऊंड, पुसापर्पल लाँग, पुसा क्रांती, पुसा अनमोल इत्यादी जाती त्या त्या भागात प्रचलित आहेत. विशिष्ट जातींची किंवा प्रकारची वांगीच लोकांना आवडतात आणि त्याच जातींची बाजारात मागणी जास्त असते. उदा. खानदेशात भारताची वांगी अतिशय लोकप्रिय आहेत. विदर्भात कमी काटे असलेल्या जाती अधिक प्रसिद्ध आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची वांगी पसंत केली जातात. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यात डोरली किंवा काटेरी वांगी जास्त लोकप्रिय आहेत, तर उत्तर भारतात अजिबात काटे नसलेल्या जातीच सर्वांना आवडतात. अशा वांग्याची लागवड करावी.
प्रा. संदीप भागीनाथ विधाते, के के वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक. मोबा. 9923973436